कळंब – जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेत कळंब येथील संतश्रेष्ठ गोरोबा काका शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेची विविध क्रीडा स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांकाने विभागीयस्तरावर निवड झाली आहे.राज्यात अव्वल येणाऱ्या स्पर्धकांना औद्योगिक क्षेत्रात प्राधान्याने नोकरी मिळणार,आयटीआयचा प्रशिक्षणार्थी कोणत्याच गोष्टीत कमी नसतो,गरज असते फक्त एका संधीची,हरणारा का हरला याचा शोध घेऊन त्यात सुधारणा करावी आणि जिंकनारांनी धाराशिवला राज्यस्तरीय पहिले पारितोषक येत नाही तोपर्यंत हार मानू नये असे प्रतिपादन व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण विभागाचे संचालक सतीश सुर्यवंशी यांनी बक्षीस वितरण कार्यक्रमात केले. कौशल्य विकास मंत्री ना. मंगलप्रभात लोढा यांच्या संकल्पनेतून प्रशिक्षणार्थ्याच्या कलागुणांना वाव मिळावा, त्यांच्यामध्ये खेळाडूवृत्ती निर्माण होऊन खेळामध्ये देखील विशेष कौशल्य मिळवण्याकरिता महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांतील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये जिल्हास्तरीय क्रिडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. त्याचाच एक भाग म्हणून धाराशिव येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये दिनांक २३ आणि २४ रोजी जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये जिल्ह्यातील सर्व शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांनी विविध स्पर्धांमध्ये सहभाग नोंदविला होता या जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेत कळंब संस्थेने क्रिकेट,कॅरम, बुद्धिबळ,१००मीटर व २०० मीटर रनिंग स्पर्धेत भाग घेतला होता.यामध्ये कळंब येथील संतश्रेष्ठ गोरोबाकाका शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेला या जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेत क्रिकेट संघाला प्रथम क्रमांक, कॅरममध्ये जाहेद दखनी ट्रेड वायरमन याचा प्रथम क्रमांक, २०० मीटर रनिंग प्रकारामध्ये रितेश थोरात ट्रेड जोडारी प्रथम क्रमांक, त्याच बरोबर २०० मीटर रनिंग मुलींमध्ये प्रतीक्षा कांबळे ट्रेड वायरमन हीचा प्रथम क्रमांक आणि १०० मीटर रनींग स्पर्धेत सायली चव्हाण हिने द्वितीय क्रमांक पटकावला असून पुढे सर्वांची विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेत सर्वाधिक पारितोषिके मिळवून कळंब येथील संत श्रेष्ठ गोरोबा काका शासकीय औद्योगिक शिक्षण संस्था अव्वल ठरली आहे. प्रशिक्षणार्थी आणि समन्वयकाच्या या यशाबद्दल संस्थेचे प्राचार्य केशव पवार यांनी सर्व कर्मचारी व प्रशिक्षणार्थी यांचे विशेष अभिनंदन केले आहे.
More Stories
संचालिका सौ.अंजली मोहेकर यांची विद्याभवन प्राथमिक विद्यामंदिरास सदिच्छा भेट
मोहेकर महाविद्यालयात ग्रंथालय शास्त्राच्या राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन
भीमराव दादा सत्यवचनी व्यक्तिमत्व होतं – डॉ. माणिक डिकले