August 9, 2025

बुध्द‍ि सामर्थ्य प्रतिभावान : स्वामी विवेकानंद

  • शतकानुशतके आपल्या समाजात असे महान पुरुष निर्माण होत आले आहेत. त्यांच्या पैकी प्रत्येकजण विश्वविचाराच्या क्षितिजावर उदयास आलेला तेजस्वी आणि स्वयंप्रभ असा तारा आहे. केवळ मानवजातीच्या सुख-दुखा:शी नव्हे, तर समस्त चराचर सृष्टीशी तादम्य पावलेले रामकृष्ण परमहंसासारखे अनेक तेजस्वी सत्पुरुष आजही या समाजात निर्माण होत आहेत. एकदा तर एका गाईला चाबकाचे फटके बसत असलेले पाहुन रामकृष्णाच्या तोंडून वेदनेचे चित्कार बाहेर पडले. इतकेच नव्हे तर, त्यांच्या पाठीवर वळही उठले. एकदा तर हिरव्यागार कुरणात चरत असलेल्या बैलाच्या खुराचेही ठसे त्यांच्या छातीवर उमटलेले दिसले. आत्मज्ञानाचा उपदेश करणाऱ्या आपल्या येथील थोर पुरुषांची तादाम्यवृत्ती कोणत्या थरापर्यंत पोचली होती, हे यावरुन स्पष्ट होईल.
    ब्राम्हो समाजाच्या प्रभावामुळे नरेंद्र ब्राम्हो समाजाकडे आकृष्ट झाले. त्यात मूर्तिपूजा नव्हती अंधश्रध्दा नव्हती, कर्मकांड नव्हते, स्त्रीयांना शिक्षण दिले पाहिज. हे विचार ऐकून त्यांच्या मनात गोंधळ माजला ‘‘देव खरच आहे की नाही ? असल्यास कोठे भेटेल ? त्याची भेट कोण घडवू शकेल? अशा नानाविध प्रश्नांनी, विचारांनी त्यांचे मन अस्वस्थ झाले. ब्राम्हो समाजाचे नेते देवेन्द्र यांनी त्यांच्या प्रश्नांचे समाधानकारक उत्तर ही देऊ शकले नाहीत. तेव्हा कॉलेजचे प्राचार्य हेस्टी यांनी त्यांना रामकृष्ण परमहंस यांच्याकडे पाठविले. रामकृष्ण परमहंसानी तीक्ष्ण दृष्टीने त्यांच्या डोळयांकडे पाहिले. ते आपल्या भक्तांना म्हणाले ‘‘हा नरेंद्र मानवजातीच्या उध्दारासाठी जन्मला आहे, तो हिंदु धर्म आणि हिंदुस्थानची मान साऱ्या जगात उंचावेल’’! नरेंद्राला ते खरे वाटेना. त्याने रामकृष्णांना विचारले, ‘‘तुम्ही देव पाहिला आहे का’’? नरेंद्राने विचारले, ‘‘तेव्हा तुझ्या मनाला देवाच्या भेटीची तळमळ लागेल तेव्हा” रामकृष्ण म्हणाले. हयावर त्यांचा विश्वास बसेना, तेव्हा रामकृष्णांनी त्यांच्या हदयाला स्पर्श केला. त्याचबरोबर सर्वत्र तेजाचे लोळ सर्वत्र उठले. प्रकाश पसरला. नरेंद्राच्या हदयातही प्रकाश पसरला. त्यांना सर्वत्र परमेश्वरच दिसू लागला ! तेव्हापासुन नरेंन्द्र रामकृष्णांचे पटशिष्य म्हणुन ओळखल्या जाऊ लागले. त्यांच्या मध्ये असलेल्या बुध्दिचातुर्याने, ओजस्वी वाणीने जनमानसावर प्रभाव पाडु शकले. तेव्हापासुनच जमाव त्यांच्या पाठीमागे असायचा. कारण त्यांनी रामकृष्ण परमहंसाचे शिष्यत्व पत्करले होते.
    बंगाली व इंग्रजी भाषेवर प्रभुत्व असलेले नरेंद्र अभ्यासूवृत्ती व हिंदु धर्माविषयी चिकित्सक वृत्ती तत्वज्ञान याची सांगड घालतांना ते कधीही विचलित झाले नाहीत. लहानपणापासून पुराण, रामायण-महाभारत सुध्दा ऐकण्याची खुप आवड होती. रामायण-महाभारतातील प्रसंग सांगुन त्यांच्या मनावर कोरीव असे काम केले. त्यामुळे त्यांनी खुप हुशारीने उपरोक्त प्रसंग आत्मसात करुन त्याचा व्याख्यानातून देशोदेशी प्रचार व प्रसार केला. त्यामुळे त्यांची विद्वता किती प्रखर होती, यावरुन सिध्द होते. एका वर्षात त्यांनी अमरकोश पाठ केला. यावरुन त्यांची बुध्दि किती तल्लख होती याची कल्पना येते. जागतिक इतिहास, संस्कृत, तत्त्वज्ञान हा विषयांचा त्यांनी अभ्यास केला. ते नेहमी विवेकवादाचा पुरस्कार करणारे असल्यामुळे विवेकवादाने माणुस समृध्द होतो, अशी त्यांची धारणा होती. कारण माणुस विवेकवादाने सत्यापर्यंत पोचतो ते यावरुन लोक पुढे त्यांना स्वामी विवेकानंद म्हणून लागले. त्यांनी 1890 साली रामकृष्णांच्या पत्नी शारदादेवी यांचा आर्शीवाद घेतला. ते मठातून बाहेर पडले, स्वामी विवेकानंद कन्याकुमारीला पोहचले. तेथील देवालयात त्यांनी ध्यानसाधना सुरु केली. त्यांना रामकृष्णांनी साक्षात दर्शन दिले व अमेरिकेत भरणाऱ्या जागतिक धर्म संसदेस जाण्याची आज्ञा केली.
    नरेंद्राला गुरुकडून योग्य मार्ग मिळाला होता आणि म्हणुन त्या मार्गानेच जाण्याचा पक्का निर्धार केला होता. थोडयाच दिवसांनी रामकृष्ण ला कॅन्सरने ग्रासले. त्यांना उपचारासाठी काशीपूर येथे नेले. त्यांच्या सेवेसाठी नरेंद्रही त्यांच्या सोबत होते. रामकृष्ण त्याला म्हणाले, ‘‘बेटा, माझी सर्व योगशक्ती मी तुला दिली आहे. त्याच्या जोरावर तू हिंदु धर्म आणि तत्त्वज्ञान यांचा जगभर प्रसार कर, आपल्या राष्ट्राचा उध्दार कर” ! एवढे बोलून 15 ऑगस्ट 1886 रोजी रामकृष्णांनी जगाचा निरोप घेतला. सर्व भारत फिरुन बघावा अशी त्यांना इच्छा झाली. त्याप्रमाणे ते प्रवासाला निघाले. काशी, अयोध्या, गया, आग्रा, वृन्दावन असे करत करत सर्व भारतभर त्यांनी पायी भ्रमण केले. आजही त्यांच्या शिष्यांची पायपीट सुरु आहे.
    हिंदुधर्म, तत्वज्ञान यांच्या प्रचारादरम्यान त्यांनी न्यूयॉर्कमध्ये अभ्यासवर्ग सुरु केले. अनेक स्त्री-पुरुष त्यांचे शिष्य झाले. हिंदुधर्म, तत्त्वज्ञान याचा त्यांनी जगभर प्रसार केला. त्यासाठी देशात अनेक ठिकाणी त्यांनी “रामकृष्ण मठ” स्थापन केले. रामकृष्णांची भविष्यवाणी खरी ठरली त्यांचे शिष्य नरेंद्र उर्फ स्वामी विवेकानंद यांनी जगभर वेदान्ताचा प्रसार केला. स्वामी विवेकानंदांची कीर्ती देश-विदेशात पसरली होती. ही एक वेळची गोष्ट आहे. विवेकानंद समारंभासाठी परदेशात गेले होते. आणि त्यांच्या समारंभात अनेक परदेशी उपस्थित होते. त्यांनी दिलेले भाषण ऐकून एक विदेशी महिला खूप प्रभावित झाली. आणि ती विवेकानंदांकडे आली आणि स्वामी विवेकानंदांना म्हणाली की मला तुमच्याशी लग्न करायचे आहे जेणेकरून मला तुमच्यासारखा तेजस्वी पुत्र मिळावा. यावर स्वामी विवेकानंद म्हणाले तुम्हाला माहिती आहे का? की “मी संन्यासी आहे” मी लग्न कसे करू, तुला पाहिजे तर मला तुझा मुलगा बनवा. यामुळे माझी निवृत्ती तुटणार नाही आणि तुलाही माझ्यासारखा मुलगा मिळेल. हे ऐकून ती विदेशी महिला स्वामी विवेकानंदांच्या पाया पडली आणि म्हणाली की तुम्ही धन्य आहात. तुम्ही देवासारखे आहात! जे कोणत्याही परिस्थितीत आपल्या धर्माच्या मार्गापासून दूर जात नाहीत. म्हणजे किती अटळ श्रध्दा असावी विवेकानंद मध्ये जी ढळू देत नाही.
    त्यानुसार 31 मे 1893 रोजी स्वामी अमेरिकेला निघाले. त्यांनी रामकृष्णांच्या फोटोला वंदन केले, कालीमातेचे स्मरण केले. भगव्या रंगाचा पोषाख, त्याच रंगाचा फेटा बांधला. भगवतगीता हाती घेऊन त्यांनी बोटीवर पाय ठेवला. चीन, जपान ओलांडून स्वामी अमेरिकेतील शिकागो बंदरात उतरले. 11 सप्टेंबर 1893 रोजी जागतिक धर्म संसदेत भारताचे प्रतिनिधीत्व केले. सुरु झाली. सहा-सात हजार प्रतिनिधी जमले होते. देशोदेशीचे ध्वज फडकत होते. ख्रिस्ती धर्माचेच लोक जास्त असल्यामुळे ख्रिस्ती धर्माचेच गुणगान करीत होते. शेवटी स्वामींना पाचारण करण्यात आले. प्रथम ते घाबरले, मग धीर धरुन त्यांनी भाषणाला सुरुवात केली. “माझ्या अमेरिकन बंधु-भगिनींनो”! या त्यांच्या पहिल्या वाक्याला श्रोत्यांनी टाळयांचा कडकडाट केला. तो तब्बल दोन मिनिटे चालला व आपल्या ओजस्वी शैलीत त्यांनी हिंन्दु धर्माची श्रेष्ठता श्रोत्यांना पटवून दिली, अमेरिकेत वास्तव्यात असतांना त्यांनी हिंदू धर्माचा, विश्वबंधुत्वाचा महान संदेश तेथील लोकांपर्यंत पोहचविला. त्यामुळे श्रोते मंत्रमुग्ध झालेत, आणि त्यांचा जयघोष करु लागले.
    भारताचे नाव उज्वल केले ! 1897 साली स्वामी विवेकांनद भारतात परत आले. 1 मे 1897 रोजी त्यांनी “रामकृष्ण मिशनची” स्थापना करुन लोकसेवेला सुरुवात केली, त्यात त्यांनी अनाथालय, धर्मार्थ रुग्णालय, वस्तीगृहाची स्थापना करुन मानवसेवा हाच खरा धर्म आहे हीच शिकवण त्यांनी पुढे रेटली ती आजतागायत सुरु आहे. त्यांच्या शिष्यांनी आणि अनुयायांनी त्यांच्या स्मरणार्थ तेथे एक मंदिर बांधले आणि विवेकानंद त्यांचे गुरु रामकृष्ण यांचा संदेश प्रसारित करण्यासाठी जगभरात 130 हून अधिक केंद्रे स्थापन केली. त्यांची एक सुप्रसिद्ध म्हण होती, “जागे व्हा ! जोपर्यंत ध्येय साध्य होत नाही तोपर्यंत थांबू नका”. 4 जुलै 1902 रोजी ध्यानातच ब्रम्हरंध छेदून महासमाधी घेतली. अशा तत्वज्ञानाच्या गाढ देशभक्ताला विनम्र आदरांजली !
  • — प्रविण बागडे
    नागपूर
    भ्रमणध्वनी : 9923620919
    ई-मेल : pravinbagde@gmail.com
error: Content is protected !!