April 27, 2025

Home »ई-पेपर राजमाता जिजाऊ
  • भारतीय संस्कृती ही जगात श्रेष्ठ असून आई ही पहिली शाळा,पहिला गुरु,संस्कारांची शिदोरी,जीवनात एकचं असं नातं जी आपल्यावर नऊ महिने नऊ दिवस गर्भातच संस्कार करीत असते, जन्मापासून ते शेवटच्या श्वासापर्यंत आपल्यावर प्रेम करत असते. आपल्या मुलांना बालपणापासूनच ‘आई माझा गुरू, आई कल्पतरु’ अशी थोरवी विशद केली जाते. आई शब्दच विश्वातील संवेदनशील प्रचंड व्याप्ती असणारा आहे. हिंदवी स्वराज्याची स्वप्न साकार करण्यासाठी छत्रपती शिवरायांवर ज्यांनी अनेक उत्तम संस्कार केले, त्या स्वराज्य संकल्पक राष्ट्रमाता,राजमाता मासाहेब जिजाऊ तसेच सानेगुरूजींना खऱ्या अर्थाने आयुष्यात घडवले ते म्हणजे त्यांच्या आईनेच. खरोखरच आईची ममता हे जगात महान असते, आपल्या मुलाने एक चांगला आदर्श निर्माण करावा, असे प्रत्येक माता ठरवत असते. त्याप्रमाणे कष्टही घेत असते, संतांनी म्हटले, आई- वडील ज्यांचे घरी, त्याने कशाला जावे पंढरी।। विज्ञान युगातसुद्धा याप्रमाणे जो कोणी आई-वडिलांचा कृपाशीर्वाद आणि मार्गदर्शनाने त्यांच्या पायावर डोके ठेवून वाटचाल करेल, त्याला आयुष्यभर इतरत्र शरण जाण्याची वेळ येणार नाही. म्हणजेच आई आपल्या जीवनात ईश्वरापेक्षासुद्धा महान असते. एक कवी म्हणतो, ‘आई तू उन्हात सावली मग दुःखे येऊ देत, कितीही..’
    आपल्या उत्तम संस्कार, ध्येयनिष्ठा आणि प्रभावी ध्येयधोरणांच्या अंमलबजावणीने शत्रूची मते देखील बदलू शकतो. ती कलाकौशल्य निपुण असलेली विद्या ही तळपत्या तलवारीसारखी तेजस्वी आहे. तिचे महत्त्व तिला धारण करणाऱ्यावर अवलंबून असते. शत्रूशी सामना करणे सोपे आणि स्वजनांशी युद्ध करणे अतिशय कठीण, शासनकर्ती जमात बनणे हेच आमचे उद्दिष्ट. जिजाऊंचे व्यक्तिमत्व म्हणजे धैर्य, शौर्य, प्रचंड आत्मविश्वास, इच्छाशक्ती आणि गरीबांप्रती प्रचंड तळमळीने ओतप्रोत भरलेले आहे. जो माणूस मारावयास तयार होतो, तो कधीच मरत नाही, असा प्रेरक विचार देणाऱ्या माता राष्ट्रमाता, राजमाता जिजाऊ या माऊलीने आपल्या कष्टाचा सह्याद्री करून पार गगनाला नेऊन भिडवला, जगाला छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांच्या सारखे पराक्रमी महातेजस्वी रणधुरंदर वीर पिता-पुत्र दिले, अशा थोर माऊली. जागतिक इतिहासात कार्याने अखंड जगाला प्रेरणादायी, मार्गदर्शक असणाऱ्या हिंदवी स्वराज्य निर्मात्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या मातोश्री आणि स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराजांच्या शिल्पकार,मराठी माणसाचा स्वाभिमान, आधुनिक युगात आपल अस्तित्वासाठी सिद्ध धडपडणाऱ्या केवळ महिलाच नव्हे तर पुरुषांचाही अखंड प्रेरणेचा, दैदिप्यमान स्त्रोत राजमाता, राष्ट्रमाता जिजाऊ. शिवजन्मापूर्वीचा काळ आठवला की जिजाऊंच व्यक्तिमत्वाचे पैलू लक्षात येतात.परकीय, मुस्लीम, अफगाणी आणि पाश्चिमात्य आक्रमणाने इथली माणस खचली होती. मातीचा पराक्रमाचा इतिहास आणि स्व:त्वाची जाणीव, सगळीकडे हाहाकार, अंध:कार, अन्याय,अत्याचार, देवळातला देव घरातली स्त्री सुरक्षित नव्हती. डोळ्यादेखत बायका-मुली पळवून नेत, जनता अन्यायात होरपळली असता विदर्भाच्या कुशीत, महाराष्ट्राच्या भूमीत राजमाता जिजाऊ यांचा जन्म १२ जानेवारी १५९८ रोजी सिंदखेडराजा (जिल्हा बुलढाणा) येथे इतिहास प्रसिद्ध यादव घराण्यातील म्हाळसाबाई आणि लखुजीराजे जाधव यांच्या पोटी झाला. चार भावंडांच्या पाठीवर जन्मलेल्या या कन्येच लखुजीराव यांनी हत्तीवरून जिलेबी वाटत १५९८ साली स्वागत केले, ही तत्कालीन साधी घटना नव्हती, भविष्यातील अनेक बदलांची ती नांदी होती.लखुजीराव यांनी या अलौकिक कन्येला अनेक विद्यामध्ये पारंगत बनवले अन् बौद्धिक,शारीरिक अन् भावनिक विकासाने जिजाऊंच अष्टपैलू व्यक्तिमत्व काळाची आव्हाने पेलण्यासाठी सज्ज होत, नवव्या वर्षी सात भाषा अवगत असणाऱ्या जिजाऊ, विज्ञान, गणित आणि युद्धकलेतही तितक्याच तरबेज होत्या. १६१० रोजी जिजाऊंचा विवाह वेरूळच्या भोसले घराण्यात मालोजी राजांचे कर्तृत्ववान सुपुत्र शहाजी राजांशी झाला. शंकर पार्वतीची जोडी म्हणूनच लोक यांच्याकडे पाहू लागले.शहाजीराजे कधी निजामाकड तर कधी विजापूरच्या आदिलशहाकडे सरदारकी करायचे, पण प्राणपणाने या सत्तांच रक्षण करूनही पदरी निराशा, अविश्वास,अन् धोका.
    एक घटना घडली हलक्या कानाच्या निजामाने देवगिरीच्या किल्ल्यात भर दरबारात जिजाऊंचे वडील लखुजीराजे आणि त्यांच्या दोन भाऊ व दोन भावांच्या मुलांची हत्या केली अन् पित्याच्या व भावांच्या या हत्येने जिजाऊ पार कोलमडून निघाल्या, पण खचून न जाता पोटात शिवबांचा गर्भ असताना कडाडल्या जिजाऊ माझा मुलगा कोणाची सरदारकी नाही करणार, कोणाची चाकरी नाही करणार, तो स्वत:चे हिंदवी स्वराज्य निर्माण करेल. शिवजन्मापूर्वीच जिजाऊंनी आपल्या मुलाची दिशा ठरवली होती, अन् त्याप्रमाणे शिवबाची जडणघडण करायला सुरुवातही केली. अनेक विद्या, कला,राजकारण, युद्धकला या गुणांनी जिजाऊनी शिवबाना कुठल्याही संकटाशी मुकाबला करण्यासाठी सज्ज बनवलं. पराक्रमी अभिमन्यूच्या कथा सांगून त्यांच्यात सामाजिक जाणीव करून दिली. शिवाजी महाराजांच्या रायरेश्वराच्या मंदिरातील शपथेपासून ते रायगडावरील राज्याभिषेकाच्या सुवर्णमय क्षणाच्या जिजाऊ मार्गदर्शक होत्या. प्रत्येक मोहिमेच्या, संकटाच्या क्षणी शिवबांची ताकद म्हणजे जिजाऊ. आजच्या आधुनिक काळातील स्त्रियांनी राजमाता जिजाऊ यांच्या विचारकार्यातून प्रेरणा घेऊन आपले जीवन समृद्ध करावे. स्वराज्यावर अफझलखान, सिद्धी जौहर, दिलेरखान, मिर्झा राजे, जयसिंग राठोड, शायिस्तेखानासारखी संकटे राजांनी सहज पेलली. इ. याप्रसंगी राजमाता जिजाऊ शिवरायांच्या पाठीशीही खंबीरपणे उभ्या राहिल्या. जिजाऊ या संकटसमयी लढणाऱ्या होत्या, रडणाऱ्या नव्हत्या. शिवरायांमध्ये प्रचंड आत्मविश्वास निर्माण करण्याचे कार्य जिजाऊंनी केले. त्यांच्यामुळेच आग्रा भेट असेल किंवा पन्हाळा किल्ल्यात महाराज अडकलेले असताना कणखरपणे निर्णय घेणाऱ्या जिजाऊ, व्यक्तिगत हितापेक्षा जनतेचे कल्याण, जातपात, धर्म न पाहणाऱ्या,ज्ञान,संस्कार, चारित्र्य,राष्ट्रभक्ती, पराक्रम,नीतिमत्ता,स्वातंत्र्य, समता,बंधुता,दूरदृष्टी आणि निस्वार्थ वृत्तीच्या उपासक असणाऱ्या जिजाऊंनी या देशाला अनेक मूल्यांची देणगी दिली आहे. अवघ्या दोन वर्षाचे असताना आईचे छत्र हरवलेल्या संभाजी महाराज यांना घडविणाऱ्या जिजाऊ म्हणजे राष्ट्रीय चारित्र्य निर्मितीच्या चिरकालीन प्रेरणा होत. सामान्य कुटुंबातील मुलीप्रमाणे जिजाऊंचे शिक्षण आणि संगोपन उत्तम पद्धतीने करण्यात आले. त्यांना राजकारण,ढालीचा वापर करणे, तलवार,दांडपट्टा चालविणे,गनिमीकावा, अश्वारोहन आणि युद्धनीतीचे शिक्षण देखील पारंगत होत्या. जिजाऊंचा विवाह वेरुळचे मालोजीराजे भोसले यांचे चिरंजीव शहाजीराजे भोसले यांच्या सोबत डिसेंबर १६०५ मध्ये येथे झाला. मालोजी निजामशहाकडून पाच हजारी मनसब,शिवनेरी व चाकण हे किल्ले आणि अनुक्रमे पुणे व सुपे हे दोन परगणे जहागीर म्हणून मिळालेली होती. अशा काळात शहाजीराजांनी जिजाऊंना शिवनेरी किल्ल्यावर सुरक्षित ठेवले होते. पुढे याच ठिकाणी १९ फेब्रुवारी १६३० रोजी जिजाऊंनी शिवरायांना जन्म दिला. जिजाबाईंना एकूण आठ अपत्ये होती, त्यात त्यापैकी सहा मुली व दोन मुले. शहाजीराजे भोसले यांनी पुण्याजवळील अहमदनगर व विजापूर प्रदेश काबीज करून स्वतंत्र राज्य स्थापन केले. परंतु विजापूरने ते उदध्वस्त केले पुढे शहाजी राजांनी पुण्यात झांबरे पाटलाकडून जागा विकत घेऊन तेथे लाल महाल बांधला. जिजाऊ व शिवाजी यांचा मुक्काम लाल महालातच होता. जिजाऊंच्या आज्ञेत शिवाजी महाराज सगळ्या सोबत युद्धकला शिकू लागले. तानाजी,सूर्याजी,येसाजी आणि बाजी शेतकऱ्यांची मुले शिवाजींची जिवलग सवंगडी होते आणि पुढे तेच स्वराज्य संरक्षक मावळे झाले. १६ मे १६४० साली जिजाऊंनी शिवाजीचा विवाह निंबाळकरांच्या सईबाईची लावून दिला. यावेळी शहाजी विजापूर तर्फे बेंगलोर येथेच होते. वजीर मुस्तफाखानने २५ जुलै १६४८ मध्ये येथे शहाजीराजांना कैद केले. १६ मे १६४९ रोजी जिजाऊंच्या मार्गदर्शनाखाली शिवाजी महाराजांनी शहाजीराजांची सुटका केली. पुढे छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खानाचा वध केला. अशा पद्धतीने राजमाता जिजाऊंनी पुत्र शिवाजी यांना आज्ञा करून पतीच्या अपमानाचा सूड घेतला. जिजाऊंचा ज्येष्ठ पुत्र संभाजी विजापूरतर्फे लढताना मरण पावले. २३ जानेवारी १६६४ साली तुंगभद्रेच्या काठी होदेगिरी येथे शहाजी महाराज शिकारीला गेले असता त्यांचा घोडा भर वेगात पाय अडकला आणि घोड्यावरुन पडून शहाजी राजांचा मृत्यू झाला. जिजाऊ विधवा झाल्या, पण त्या सती गेल्या नाहीत. शिवाजी महाराज यांनी जिजामातेचे विचारविनिमय केला. त्यातही धैर्यशाली मातेने आपल्या पुत्रास त्या औरंगजेबाच्या भेटीसाठी येथे जाण्यास संमती दिली. शिवरायांनी जिजाऊंच्या हाती राज्यकारभाराची सूत्रे सोपवली आणि ०५ मार्च १६६६ मध्ये राजगडाहून आग्र्याकडे प्रस्थान केले. सिंहगड स्वराज्यात नाही, याबद्दल खंत जिजाऊ करत त्यांनी शिवाजी यांना सिंहगड घेण्यासाठी आग्रह केला. तानाजीने स्वप्राणांची आहुती देत सिंहगड ०४ फेब्रुवारी १६७० साली काबीज केला. १७ जून १६७४ रोजी बुधवारी रात्री वयाच्या ८० व्या वर्षी जिजामातेने स्वतंत्र हिंदवी स्वराज्यात रायगडाच्या पायथ्याशी असलेल्या पाचाड येथे शेवटचा श्वास घेतला, वृद्धापकाळाने त्यांचे निधन झाले. छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावरचे छत्र हरवले स्वराज्य संस्थापक आईविना पोरके झाले. शिवरायांच्या मोठेपणाचे श्रेय फक्त जिजाऊंना जाते. कारण शिवरायांना जिजाऊंनी बालपणापासूनच “तलवार घ्या. घोड्यावर बसा. गडकिल्ले पायदळी घाला. शत्रूचा निःपात करा. तुम्हाला स्वराज्य निर्माण करायचे आहे. मी तुमच्या पाठीशी आहे” असे सांगितले. आजची आई आत्मकेंद्री बनत चालली आहे, आपल्या मुलांना “तू कोणाच्या भानगडीत पडू नकोस, आपल्याला काय करायचेय” असे सांगते. जिजाऊंनी मात्र उपेक्षित, वंचित, शोषित जनतेचा प्राधान्याने विचार केला. आजदेखील शिवरायांसारखे पराक्रमी, मानवतावादी महापुरुष उदयाला येतील, पण त्या अगोदर जिजाऊंसारखी माता घरोघरी निर्माण झाली पाहिजे, सृजनशीलता, संस्कारसंपन्न धैर्यशील आणि कर्तव्यदक्ष अशा राष्ट्रमाता, राजमाता जिजाऊ माऊलीस मानाचा मुजरा..!

 

  • — प्रा.डॉ.दीपक सुभाषराव सूर्यवंशी 
    मो.९२८४७०७५३२
    शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर 
    महाविद्यालय, कळंब
error: Content is protected !!