August 9, 2025

दुःख मुक्तीचा मार्ग महामानव तथागत भगवान बुद्धांनी सांगितला – प्राचार्य डॉ.संजय गवई

  • लातूर – बोधिसत्व डॉ.बी.आर. आंबेडकर स्मारक व बुद्ध विहार समिती,पूर्णा आणि भारतीय बौद्ध महासभा,पूर्णा जि.परभणी यांच्या संयुक्त विद्यमाने आषाढ पौर्णिमा वर्षावास अधिष्ठान आणि धम्म देसना कार्यक्रम पूर्णा येथील बुद्ध विहारात आयोजित करण्यात आला होता.
    यावेळी ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.
    या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अखिल भारतीय भिक्खू संघाचे कार्याध्यक्ष भदंत डॉ.उपयुक्त महाथेरो हे होते तर प्रमुख उपस्थिती म्हणून भंते पय्यावंश, भंते संघरत्न,डॉ.राजपाल चिखलीकर,बापूराव गजभारे आणि बाबुराव पाईकराव यांची प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती होती.
    सकाळी साडेपाच वाजता बुद्ध विहारांमध्ये त्रीरत्न वंदना पूजा पाठ,परित्राण पाठ व सूत्र पठण घेण्यात आले.
    पुढे बोलताना महात्मा बसवेश्वर महाविद्यालयातील प्राचार्य डॉ. संजय गवई, तथागत भगवान बुद्ध यांच्या मानव मुक्तीच्या विचारावर भाष्य करताना सांगितले की, तथागत भगवान बुद्ध यांनी जगामध्ये प्रथमच २६०० वर्षांपूर्वी दुःखमुक्तीचा मार्ग सांगितला. मानवी दुःखाचे कारण आणि त्या दुःखामधून मुक्ती मिळण्यासाठी उपाय सुद्धा त्यांनी सुचविले. भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी त्यामुळेच बुद्ध धम्म स्वीकारला आपल्या अनुयायांना दिला. या महामानवाच्या शिकवणीमुळेच एका खेड्यातील संजय महाविद्यालयाचा प्राचार्य होऊ शकला. देशातील तरुणाईने वाचन संस्कृतीकडे व बुद्ध विहाराकडे वळले पाहिजे. विहारामधून धम्माचे संस्कार होतात आणि संस्कारातून आदर्श माणूस बनत असतो. या कामी महिला भगिनींनी आपल्या पाल्यांना उच्चशिक्षित करून धम्माचे संस्कार दिले पाहिजे. आपल्या मुला मुलींना विहारात पाठवले पाहिजे असेही ते म्हणाले.
    सुप्रसिद्ध लेखक विचारवंत डॉ. सत्यजित चिखलीकर यांनी महाविद्यालयीन जीवनामध्ये मिलिंद कॉलेजमध्ये शिकत असताना होस्टेलवर तथागत बुद्धांचा सुविचार “आळस” मृत्यू समान आहे” हा सुविचार वाचण्यात आल्यानंतर अभ्यास करताना कधी कंटाळा केला नाही आणि त्यामुळेच मी इंग्रजीचा प्राध्यापक लेखक होऊ शकलो असे ते म्हणाले.
    यावेळी नांदेड येथील पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे महाराष्ट्र सचिव माजी महानगरसेवक बापूराव गजभारे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी बहिष्कृत हितकारणी सभेची स्थापना केली
    आणि या सभेच्या माध्यमातून अस्पृश्य समाजाला शिका, संघटित व्हा, संघर्ष करा हा मूलमंत्र दिला. या घटनेला शंभर वर्षे पूर्ण होत आहे याची आठवण करून दिली. आपल्या मुला-मुलींना उच्च आणि दर्जेदार शिक्षण देऊन महामानव तथागत भगवान बुद्ध व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार मुला-मुलीवर बिंबवले पाहिजे असे सांगून नांदेड येथे गोदावरी नदीमध्ये अतिशय भव्य-दिव्य भगवान बुद्धांची मूर्ती बसवण्याचा त्यांचा संकल्प पूर्णत्वास जात आहे. भदंत डॉ. उपगुप्त महाथेरो हे माझे श्रद्धास्थान आहे. त्यांच्या मार्गदर्शनातूनच मी समाजसेवा व धम्म सेवा समर्पित भावनेने करत आहे.
    अखिल भारतीय भिख्खू संघाचे कार्याध्यक्ष डॉ. उपगुप्त महस्थविर यांनी आषाढ पौर्णिमेचे महत्त्व, वर्षावासाची ऐतिहासिक पार्श्वभूमी विशद करून महामानव तथागत भगवान बुद्धांच्या काळापासून अध्ययन आणि अध्यापनाची जी प्रक्रिया आहे त्याचं अनुकरण आपण केलं पाहिजे असे त्यांनी आपल्या धम्मदेशनेमध्ये सांगितले.
    डॉ.बी.आर.आंबेडकर व बुद्ध विहार समितीच्या वतीने सर्व प्रमुख पाहुण्यांचे शाल पुष्पहार सन्मान चिन्ह बुद्ध विहार स्मरणिका देऊन यथोचित सत्कार करण्यात आला.
    या कार्यक्रमास नगरसेवक अॅड. हर्षवर्धन गायकवाड, नगरसेवक मुकुंद भोळे, उद्योजक गौतम भोळे, सामाजिक कार्यकर्ते दिलीप गायकवाड, साहेबराव सोनवणे, इंजिनियर पी.जी. रणवीर, ज्येष्ठ धम्म उपासक अमृत मोरे, टी. झेड. कांबळे, बाबाराव वाघमारे, पंडित डोंगरे शिवाजी थोरात, शाहीर गौतम कांबळे, गंगाधर कांबळे आदींची उपस्थिती होती.
    कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी किशोर ढकरगे, अतुल गवळी, इंजिनीयर विजय खंडागळे, राजू जोंधळे, बुद्ध विहार समिती भारतीय बौद्ध महासभा धम्म सेवेत कार्यरत असलेल्या महिला मंडळांनी परिश्रम घेतले.
    कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भारतीय बौद्ध महासभेचे माजी तालुकाध्यक्ष श्रीकांत हिवाळे यांनी केले.आशीर्वाद गाथेने कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला.
error: Content is protected !!