August 9, 2025

लोकसभा मतदान टक्का वृद्धीमध्ये शाळा आणि महाविद्यालयाची भूमिका महत्त्वाची – आकाश सोनकांबळे

लातूर ( दिलीप आदमाने ) – लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ मतदान टक्का वृद्धीमध्ये शाळा आणि महाविद्यालयातील प्राचार्य, उपप्राचार्य, पर्यवेक्षक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी कार्यालय तथा जिल्हा निवडणूक अधिकारी कार्यालय, लातूर येथील स्वीप कक्षाचे आकाश सोनकांबळे यांनी केले.
श्री महात्मा बसवेश्वर शिक्षण संस्था, लातूर द्वारा संचलित व्याख्यानमाला संयोजन समिती आणि आयक्युएसी, महात्मा बसवेश्वर महाविद्यालय, लातूर यांच्या संयुक्त विद्यमाने महात्मा बसवेश्वर व्याख्यानमालेचा ऑन लाइन समारोप आणि तिसरे पुष्प गुंफताना “रंग लोकशाहीचा मतदार जनजागृती अभियान २०२४” या विषयावर मार्गदर्शन करताना ते बोलत होते.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. संजय गवई हे होते तर विचारमंचावर उपप्राचार्य डॉ. राजकुमार लखादिवे, उपप्राचार्य प्रा. संजय पवार, पर्यवेक्षक प्रा. शिवशरण हावळे, माजी प्राचार्य डॉ. एम. एस. दडगे, डॉ. दिनेश मौने, डॉ. बाळासाहेब गोडबोले, संयोजक डॉ. मनोहर चपळे, सहसंयोजक डॉ. रत्नाकर बेडगे, डॉ. जितेंद्र देशमुख, प्रा. व्यंकट दुडिले, प्रा. किसनाथ कुडके, रत्नेश्वर स्वामी आदीची उपस्थिती होती.
पुढे बोलताना आकाश सोनकांबळे म्हणाले की, लातूर जिल्ह्याच्या मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी जिल्हाधिकारी कार्यालया तर्फे स्वीप हा उपक्रम अत्यंत परिणामकारक पद्धतीने लातूर जिल्ह्यातील शाळा आणि महाविद्यालयांमध्ये आपल्या सर्वांच्या सहकार्याने राबविण्यात येत आहे. या उपक्रमांतर्गत मतदारांमध्ये मतदानाविषयी सकारात्मक जाणीवजागृती निर्माण केली जात आहे. या कार्यासाठी प्रशासकीय अधिकाऱ्यांसोबत शाळा, महाविद्यालय, विविध संघटना आणि समाजसेवी संस्था ह्या सातत्याने सहकार्याच्या भूमिकेत कार्य करीत असल्यामुळे येत्या दि. ०७ मे २०२४ रोजी होणाऱ्या लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीमध्ये लातूरच्या मतदानाची टक्केवारी ही नक्की वाढेल असा आशावादही त्यांनी यावेळी व्यक्त केला.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक सहसंयोजक डॉ. रत्नाकर बेडगे यांनी केले.
यावेळी उपप्राचार्य तथा नोडल ऑफिसर डॉ. राजकुमार लखादिवे यांनी “स्वीप” अंतर्गत राबविण्यात आलेल्या एकूण १० उपक्रमाची आणि सार्वत्रिक लोकसभा निवडणूक २०२४मध्ये महात्मा बसवेश्वर महाविद्यालयाच्या सहभागाविषयी सविस्तर माहिती दिली.
यावेळी अध्यक्षीय समारोप करताना प्रभारी प्राचार्य डॉ. संजय गवई म्हणाले की, महात्मा बसवेश्वर महाविद्यालयात मागील ४४ वर्षापासून अविरतपणे महात्मा बसवेश्वर व्याख्यानमाला सुरू आहे. आज नैसर्गिक आपत्तीमुळे व्याख्यानमालेचा समारोप व तिसरे पुष्प आपल्याला ऑनलाईन पद्धतीने घ्यावे लागत आहे. या ऑनलाइन व्याख्यानमालेमध्ये स्वीपचे आकाश सोनकांबळे यांनी मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी प्रशासनामार्फत केलेल्या विविध उपक्रमांची सविस्तर माहिती दिली. या रंग लोकशाहीच्या उत्सवामध्ये महाविद्यालयातील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी सहभागी होऊन मतदानाची टक्केवारी वाढविण्यात आपण सक्रिय सहभागी व्हावे असा आशावादही त्यांनी यावेळी व्यक्त करून व्याख्यानमालेतील सर्व प्रमुख वक्ते, संयोजन समितीचे सदस्य, महाविद्यालयातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांचे हृदयपूर्वक आभार व्यक्त केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. घनश्याम ताडेवाड यांनी केले तर संपूर्ण तिन्ही दिवसाचे आभार डॉ. मनोहर चपळे यांनी मानले.
या व्याख्यानमालेच्या यशस्वीतेसाठी यशपाल ढोरमारे, राम पाटील, रंगनाथ लांडगे, अजय गायकवाड यांनी परिश्रम घेतले. या कार्यक्रमाला वरिष्ठ व कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी ऑन लाइन उपस्थित होते.

error: Content is protected !!