March 26, 2026

अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याची आमदार राणाजगजितसिंह पाटील यांची अधिकाऱ्यांना सूचना

  • कळंब ( जयनारायण दरक ) —
    जिल्ह्यातील कळंब, धाराशिव, परंडा, तुळजापूर, उमरगा आणि लोहारा या तालुक्यात मागील दोन दिवसांत वादळी वारे व अवकाळी पावसाने थैमान घातले. त्यामुळे शेतकर्‍यांच्या आंबा, डाळिंब, द्राक्ष बागांसह शेततळे, पॉलीहाऊसचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. कळंब तालुक्यातील जवळा येथे भेट देवून आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी नुकसानीची पाहणी करत अधिकार्‍यांना तत्काळ नुकसानीचे पंचनामे करण्याच्या सूचना दिल्या. शेतकर्‍यांशी संवाद साधून भरपाई मिळवून देण्याचे आश्वासन आमदार पाटील यांनी यावेळी दिले
    कळंब तालुक्यातील जवळा येथे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी रविवारी आपल्या भाजप पदाधिकारी, कार्यकर्ते, महसूल विभागातील अधिकार्‍यांसह नुकसानीची पाहणी केली. शेततळे, पॉलीहाऊस आणि आंबा पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. वादळी वार्‍यामुळे अनेकांच्या घरावरील पत्रे उडून गेले, पाड लागलेल्या आंब्याचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अशा पिक, घरे आणि पॉलीहाऊसला पीकविमा संरक्षण नसते. शासनाकडूनच अशा नुकसानग्रस्त शेतकर्‍यांना दिलासा मिळू शकतो. त्यामुळे महसूल अधिकार्‍यांना या नुकसानींचे पंचनामे करून पॉलिहाऊस बाबत खास बाब म्हणून मदत देण्यासाठी प्रस्ताव शासनाकडे पाठवण्याच्या सूचना दिल्याची माहिती आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी दिली आहे.
    नुकसानग्रस्त शेतकर्‍यांशी संवाद साधून आमदार पाटील यांनी शेतकर्‍यांना दिलासा देण्याचा प्रयत्न करत शासनाकडून आर्थिक मदत मिळवून देण्याची ग्वाही आमदार पाटील यांनी यावेळी दिली. याप्रसंगी भाजप नेते नितीन काळे,संजय लोखंडे,नुकसानग्रस्त शेतकरी, भाजपाचे स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते
error: Content is protected !!