September 21, 2026

बहुजन हिताय वसतिगृहात प्रेरणादायी कार्यशाळा

  • “बेटी बचाओ,बेटी पढाओ”चा जागर”
  • उमरगा (अविनाश घोडके) – महिला सक्षमीकरण व बाल संरक्षणाबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी “बेटी बचाओ,बेटी पढाओ” या अभियानांतर्गत बहुजन हिताय विद्यार्थी वसतिगृह,उमरगा येथे दि.१८ मार्च २०२६ रोजी जनजागृती कार्यशाळा उत्साहात पार पडली.समाज कल्याण विभाग,जि.प.धाराशिव यांच्या महाराष्ट्र शासन अनुदानित वसतिगृहात महिला व बालविकास विभाग,धाराशिव यांच्या वतीने हा उपक्रम आयोजित करण्यात आला होता.
    कार्यशाळेत तालुका संरक्षण अधिकारी रवी धनवे,समुपदेशक अनुराधा झुंजारे व प्रणाली पात्रे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
    रवी धनवे यांनी महिला व बालविकास विभागाच्या विविध योजनांची सविस्तर माहिती देताना विद्यार्थ्यांनी किशोरवयात स्वतःची योग्य काळजी घेत व्यक्तिमत्त्व विकास साधावा, शिस्त,स्वावलंबन आणि अभ्यासातील एकाग्रता जोपासून स्पर्धा परीक्षा व करिअरमध्ये यश मिळवावे,असे प्रेरणादायी मार्गदर्शन केले.तसेच शासनाच्या योजनांचा लाभ घेऊन अनाथ व गरजू विद्यार्थ्यांनी आपले भविष्य घडवावे, असे आवाहन करत त्यांनी विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण केला.
    समुपदेशक अनुराधा झुंजारे यांनी शासनाच्या योजनांचा लाभ घेण्यासाठी पात्रता,आवश्यक कागदपत्रे व अर्ज प्रक्रिया याविषयी सविस्तर माहिती दिली. तर प्रणाली पात्रे यांनी बालसंगोपन,बाल संरक्षण आणि बालविकासाशी संबंधित विविध योजनांवर प्रकाश टाकला.
    कार्यक्रमाची सुरुवात क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले,राजमाता जिजाऊ व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमापूजनाने करण्यात आली.यानंतर विद्यार्थ्यांनी मैत्री गीत सादर करून वातावरणात उत्साह निर्माण केला.पाहुण्यांचे स्वागत वसतिगृहातील शान गायकवाड व रवी गायकवाड यांनी पुष्पगुच्छ देऊन केले.
    कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी वक्त्यांना विविध प्रश्न विचारून मार्गदर्शनाचा लाभ घेतला.संघर्ष गायकवाड,संघपाल लोंढे,रघुवीर सूर्यवंशी,सायबाना सास्तुरे आदी विद्यार्थ्यांनी सक्रिय सहभाग नोंदवला.
    सूत्रसंचालन वसतिगृह अधीक्षक धम्मचारी प्रज्ञाजीत यांनी केले,तर आभार प्रदर्शन प्रणालीताई यांनी मानले.प्रास्ताविकात अधीक्षकांनी वसतिगृहातील उपक्रम अधिक सक्षम करण्यासाठी समाज कल्याण विभागाचे अधिकारी वेळोवेळी भेट देऊन मार्गदर्शन करीत असल्याचे सांगितले. विशेषतःसमाज कल्याण अधिकारी सचिन कवले व निरीक्षक अमोल कातांगळे यांचे मोलाचे सहकार्य लाभत असल्याचे त्यांनी नमूद केले.
    या कार्यक्रमाचा लाभ वसतिगृहातील सर्व विद्यार्थी, कर्मचारी व हितचिंतकांनी घेतला असून,“बेटी बचाओ,बेटी पढाओ” अभियानाच्या माध्यमातून समाजात सकारात्मक बदल घडवण्याचा संदेश देण्यात आला.
error: Content is protected !!