कळंब – दहावी बोर्ड परीक्षा सुरू असताना कळंब शहरासह तालुक्यातील तब्बल ४५०० वीज ग्राहकांचा पुरवठा खंडित करून महावितरण कंपनीने विद्यार्थ्यांसह सर्वसामान्य नागरिकांना अक्षरशः अंधारात लोटल्याचा संतापजनक प्रकार घडला.या पार्श्वभूमीवर सामाजिक कार्यकर्ते राहुल मुळे यांनी गुढीपाडव्याच्या शुभदिनी महावितरणच्या दारात “स्मार्ट मीटरची गुढी”उभारून प्रशासनाच्या कारभाराचा तीव्र निषेध नोंदवला. यापूर्वीही होळीच्या दिवशी वीज बिलांची होळी करत मुळे यांनी महावितरणविरोधात आवाज उठवला होता.मात्र,कंपनीकडून कोणताही ठोस प्रतिसाद न मिळाल्याने अखेर गुढीपाडव्याच्या दिवशीच अनोख्या आंदोलनाचा मार्ग स्वीकारत त्यांनी संतप्त भावना व्यक्त केल्या. मुळे यांनी महावितरणकडे दाखल केलेल्या तक्रार अर्जात गंभीर प्रश्न उपस्थित केले होते.कळंब शहरातील एकूण घरगुती वीज ग्राहकांची संख्या किती? त्यापैकी किती जणांच्या घरी स्मार्ट मीटर बसवले गेले?स्मार्ट मीटर बसवताना संबंधित ग्राहकांची पूर्वपरवानगी घेण्यात आली होती का?तसेच,थकबाकीमुळे वीजपुरवठा ‘ऑटो डिस्कनेक्ट’ होणार असल्याची पूर्वसूचना ग्राहकांना देण्यात आली होती का? अशा मुद्द्यांवर लेखी खुलासा करण्याची मागणी करण्यात आली होती. परंतु,या सर्व प्रश्नांकडे दुर्लक्ष करत महावितरणने कोणताही खुलासा न करता कारवाई सुरूच ठेवली. यामुळे संतप्त झालेल्या नागरिकांमध्ये रोष उसळला असून, “स्मार्ट मीटर”च्या नावाखाली ग्राहकांची पिळवणूक व आर्थिक लूट सुरू असल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला आहे. गुढीपाडव्याच्या दिवशी उभारण्यात आलेली “स्मार्ट मीटरची गुढी” ही केवळ प्रतीकात्मक कृती नसून, महावितरणच्या मनमानी कारभाराविरोधातील तीव्र जनआक्रोशाचे प्रतीक ठरली आहे. या आंदोलनामुळे प्रशासनाला जाग येणार का,की ग्राहकांची अडचण अशीच कायम राहणार,असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
More Stories
“ज्ञानदीपातून उभा राहिलेला परिवर्तनाचा प्रवास;पाडव्याच्या शुभमुहूर्तावर ‘साक्षी पावनज्योत’चा मानाचा मुजरा”
सभापती राजश्री वरपे यांचा सन्मान; ‘साक्षी पावनज्योत’ अंकाचे सप्रेम प्रदान
विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सवाचे नियोजन;कार्यकारिणी जाहीर