March 9, 2026

अटल टिंकरिंग लॅब प्रकल्प प्रदर्शनात जिजामाता विद्यालयाची चमकदार कामगिरी; जिल्हास्तरावर द्वितीय क्रमांक

  • लातूर – जिल्हास्तरीय अटल टिंकरिंग लॅब (ATL) प्रकल्प प्रदर्शन 2025–26 मध्ये जिजामाता माध्यमिक विद्यालय, एम.आय.डी.सी.,लातूर येथील विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट कामगिरी करत जिल्हास्तरावर द्वितीय क्रमांक पटकावला.विद्यार्थ्यांच्या कल्पकतेचा व वैज्ञानिक दृष्टिकोनाचा उत्कृष्ट आविष्कार या प्रकल्प प्रदर्शनातून पाहायला मिळाला.
    राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद,महाराष्ट्र राज्य, पुणे व जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था,मुरुड (जि.लातूर) यांच्या संयुक्त विद्यमाने दयानंद कला महाविद्यालय,लातूर येथे या जिल्हास्तरीय प्रकल्प प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. जिल्ह्यातील विविध शाळांमधील विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत सहभाग घेत आपल्या नवकल्पना सादर केल्या.
    जिजामाता माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांनीही तीन वेगवेगळ्या विभागांत प्रकल्प सादर करून लक्ष वेधले.कु.मयुरी काळे मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली इलेक्ट्रॉनिक प्रकल्प,शंकर पांचाळ सर यांच्या मार्गदर्शनाखाली मेकॅनिकल प्रकल्प तर श्रीमती भाग्यशाली गुडे मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली डिजिटल लिटरेसी प्रकल्प सादर करण्यात आला. प्रत्येक प्रकल्पासाठी दोन विद्यार्थ्यांचा सहभाग अशा एकूण आठ विद्यार्थ्यांनी स्पर्धेत सहभाग नोंदविला.
    यामध्ये मेकॅनिकल विभागातील प्रकल्पाने विशेष ठसा उमटवत जिल्हास्तरावर द्वितीय क्रमांक पटकावला. या प्रकल्पासाठी चि. मुंडे शुभम,कु.सूर्यवंशी राधिका, शिंदे अधिष्ठा,अलोक वाघमोडे, वैष्णवी सोनवते,सूर्यवंशी राघव, वाघमारे श्रेया आणि चुनचुने शुभम या विद्यार्थ्यांनी परिश्रमपूर्वक काम करत प्रकल्प सादर केला.
    या यशाबद्दल विद्यार्थ्यांचे तसेच मार्गदर्शक शिक्षक शंकर पांचाळ, कु.मयुरी काळे,श्रीमती भाग्यशाली गुडे आणि प्रा.सुधीर बाळापुरे यांचे संस्थेचे सचिव व शिक्षक आमदार विक्रम काळे, प्राचार्य अनिल बापू काळे, प्राचार्या शुभांगीताई काळे, मुख्याध्यापक देविदास कोल्हे,प्रा. बाबासाहेब सोनवणे,राजकुमार शिंदे,गोकुळ मतकंटे,वैशाली वाघमारे आणि अर्जुन कांबळे यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
    या यशामुळे जिजामाता विद्यालयाच्या नावात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला असून विद्यार्थ्यांच्या नवोपक्रमशीलतेला चालना मिळाली आहे.
error: Content is protected !!