March 9, 2026

“घरातील धान्य विकून सुरू केलेली संस्था आज कोट्यवधींची” – हनुमंत मडके

  • सभासदांच्या विश्वासावर मोहेकर मल्टीस्टेटची यशस्वी भरारी
  • कळंब (अविनाश घोडके )–शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर मल्टीस्टेट को–ऑप. क्रेडिट सोसायटी लि.,मोहा येथील सर्व कर्मचाऱ्यांसाठी एक दिवसीय प्रेरणादायी प्रशिक्षण शिबिर शनिवार,दि.७ मार्च २०२६ रोजी कळंब येथील साई मंगलम मंगल कार्यालयात उत्साहात संपन्न झाले.
    संस्थेचे संस्थापक चेअरमन तथा शि.म.ज्ञानदेव मोहेकर उद्योग समूहाचे अध्यक्ष हनुमंत (तात्या) मडके यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित या प्रशिक्षण शिबिरात प्रसिद्ध मोटिव्हेशनल स्पीकर भूषण खैरनार यांनी कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन केले.

  • कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती देवी तसेच शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर गुरुजी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून दीपप्रज्वलनाने करण्यात आली. मार्गदर्शन करताना भूषण खैरनार यांनी संस्थेत काम करताना सकारात्मक दृष्टीकोन ठेवणे अत्यंत आवश्यक असल्याचे सांगितले.कामातील शिस्त,वेळेचे नियोजन,लाभार्थ्यांचे समाधान तसेच स्पर्धक संस्थांचा अभ्यास या बाबी संस्थेच्या प्रगतीसाठी महत्त्वाच्या असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.कर्मचारी जर प्रामाणिकपणे व जबाबदारीने काम करतील तर कोणतीही संस्था प्रगतीच्या शिखरावर पोहोचू शकते,असेही त्यांनी नमूद केले.

  • अध्यक्षीय समारोप करताना हनुमंत मडके यांनी संस्थेच्या स्थापनेची आठवण सांगताना सांगितले की,सेवानिवृत्तीनंतर समाजासाठी काहीतरी वेगळे करण्याची प्रेरणा मनात निर्माण झाली.त्या वेळी सर्वप्रथम आपल्या अर्धांगिनी व संस्थेच्या संचालिका सौ.रुक्मिणी मडके यांना बँकेची संकल्पना सांगितली.त्यांनीही घरातील धान्य विकून पहिल्या सभासदांना कर्ज वाटप करण्यासाठी तत्परता दर्शवली.त्यानंतर कोणताही विलंब न करता शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर गुरुजी यांच्या आशीर्वादाने संस्थेची नोंदणी करण्यात आली आणि समाजासाठी मोठे काम करणारी संस्था उभी करण्याचा निर्धार करण्यात आला.

  • सुरुवातीच्या काळात संस्थेकडे दहा हजार रुपयेही नव्हते.मात्र सहकाराच्या बळावर आणि सभासदांच्या विश्वासावर संस्था आज कोट्यवधी रुपयांच्या व्यवहारापर्यंत पोहोचली आहे.अनेक अडचणींना सामोरे जात एकामागून एक बैठका घेत संस्थेची वाटचाल पुढे नेण्यात आली.आज २८ शाखांच्या माध्यमातून हजारो सभासदांचे आर्थिक स्थैर्य निर्माण करण्याचे काम संस्था करत आहे.
    नोटाबंदीचा काळ असो किंवा कोरोनासारखे संकट असो,संस्थेच्या माध्यमातून सभासद व कर्मचाऱ्यांच्या आर्थिक अडचणी दूर करण्याचा प्रयत्न करण्यात आला.संस्थेच्या प्रगतीमध्ये संचालक मंडळ,कर्मचारी आणि सभासद यांचे मोठे योगदान असल्याचेही त्यांनी नमूद केले.

  • संस्थेला आज निर्व्यसनी,कष्टाळू आणि धडपडी कर्मचारी लाभले असून ते संस्थेच्या यशासाठी तळमळीने काम करत आहेत.त्यांच्या कार्याची दखल घेत संचालक मंडळाने अनेक वेळा पगारवाढीचा निर्णयही घेतला असल्याचे मडके यांनी सांगितले.आयुष्य जगताना समोरच्या व्यक्तीला आपण किती सेवा आणि समाधान देतो हेही महत्त्वाचे असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.
    या कार्यक्रमास व्हॉईस चेअरमन प्रा.डॉ.डी.एस.जाधव,मुख्य कार्यकारी संचालक विशाल (बाबा) मडके,संचालिका सौ.रुक्मणी मडके,शाखा व्यवस्थापक फुलचंद मडके,ऑडिटर माणिक आरकडे, ऑडिटर दत्तात्रय कुंभार तसेच संस्थेचे संचालक मंडळ आणि सर्व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
    कार्यक्रमाचे प्रास्ताविक संचालक भारत जोशी यांनी केले,तर सूत्रसंचालन इम्रान शेख व आभार विशाल मडके यांनी केले.

  • या शिबिराच्या यशस्वीतेसाठी मुख्य शाखेतील कर्मचाऱ्यांनी श्रम घेतले.प्रशिक्षण शिबिरामुळे कर्मचाऱ्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले असून संस्थेच्या प्रगतीसाठी अधिक जोमाने कार्य करण्याची प्रेरणा मिळाल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.

error: Content is protected !!