March 4, 2026

“बौद्ध धम्म हा समतेचा मार्ग” – भिक्खू पय्यानंद थेरो

  • फाल्गुण पौर्णिमा धम्मदेशना व सत्कार समारंभ उत्साहात; महिलांची लक्षणीय उपस्थिती
  • लातूर – “तथागत गौतम बुद्ध यांनी संपूर्ण जगाला करुणा, बंधुभाव आणि शांतीची शिकवण दिली.केवळ करुणा,बंधुता आणि सदाचार यांच्या आधारावरच सामाजिक समानता प्रस्थापित होऊ शकते.मानवी समाजातील दरी नष्ट करण्यासाठी बुद्धांनी समतेची तत्त्वे मांडली.त्यामुळे बौद्ध धम्म हा समतेचा मार्ग आहे,”असे प्रतिपादन पु.भिक्खू पय्यानंद थेरो यांनी केले.
    बौद्ध धम्म संस्कार प्रशिक्षण चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने फाल्गुण पौर्णिमेनिमित्त आयोजित धम्मदेशना तथा सत्कार समारंभात ते प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते.कार्यक्रमाची सुरुवात गौतम बुद्ध तसेच डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस वंदन करून करण्यात आली.त्यानंतर भंते बोधिराज यांनी उपस्थितांना त्रिसरण पंचशील प्रदान केले.
    पुढे बोलताना भिक्खू पय्यानंद थेरो म्हणाले की,बौद्ध धम्म हा केवळ पूजा-अर्चेपुरता मर्यादित नसून तो आचरणाचा धम्म आहे. पंचशील,अष्टांगिक मार्ग आणि प्रज्ञा-शील-समाधी यांच्या माध्यमातून व्यक्तीचा चारित्र्य विकास घडतो.त्यातून समाजपरिवर्तनाची प्रक्रिया सुरू होते.अन्याय,अंधश्रद्धा व भेदभावाचा त्याग करून बुद्धांचा वैज्ञानिक दृष्टिकोन स्वीकारल्यासच खऱ्या अर्थाने समताधिष्ठित समाजाची उभारणी होईल.
    या प्रसंगी दीपाली आदमाने (नवनिर्वाचित जिल्हा परिषद सदस्या),अमोल देडे (पंचायत सदस्य),प्रा.डॉ.प्रदीप सूर्यवंशी (दयानंद महाविद्यालय),भारत आदमाने (माजी संचालक, विकास सहकारी साखर कारखाना),पांडुरंग देशमुख (सरपंच,गोंदेगाव),जयराम येडगे, अरुण गायकवाड(पाटबंधारे अभियंता),नागेश कांबळे (युवा उद्योजक),गोविंद कांबळे (अध्यक्ष,डॉ.बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सव समिती २०२६),ज्योती मोठे (सहशिक्षक), चंद्रशेखर मोठे (सहशिक्षक) तसेच चि.अथर्व मोठे (यूट्यूब स्टार) यांचा विशेष सत्कार करण्यात आला.
    कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य डॉ.दुश्यंत कटारे यांनी केले. सूत्रसंचालन डॉ.अरुण कांबळे यांनी तर आभार प्रदर्शन मिलिंद धावारे यांनी केले.धम्मपालन गाथेनंतर आशीर्वाद गाथेने कार्यक्रमाची सांगता झाली.
    या कार्यक्रमात विविध नगरांतील महिला मंडळांची लक्षणीय उपस्थिती होती.प्राध्यापक, डॉक्टर,वकील,समाजातील प्रतिष्ठित नागरिक तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिती २०२६ चे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. धम्म,समता आणि सामाजिक बांधिलकीचा संदेश देत कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.
    कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी उदय सोनवणे,अनिरुद्ध बनसोडे, धम्मपाल साकळे,विलास अवशंक,आकाश सरवदे,करण ओव्हाळ,राजेश कदम,ज्योतीराम लामतुरे,पंडित सूर्यवंशी,गौतम आदमाने आदींसह महाविहार धम्मसेवक ग्रुपच्या सर्व सदस्यांनी परिश्रम घेतले.
error: Content is protected !!