धाराशिव (जिमाका) – केंद्र आणि राज्य सरकारच्या अनेक योजना,उपक्रम,अभियान व मोहिमा आहेत.जिल्ह्यातील नागरिकांचे जीवनमान उंचावण्यासाठी आणि जिल्ह्याचे मागासलेपण दूर करण्यासाठी योजना,उपक्रम,मोहिमा व अभियानाची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यासाठी सूक्ष्म नियोजनातून यंत्रणांनी काम करावे.जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी लोकप्रतिनिधी,अधिकारी- कर्मचारी यासह सर्वांनी एकत्र येऊन काम करूया.असे प्रतिपादन पालकमंत्री प्रा.डॉ. तानाजीराव सावंत यांनी केले. दि.१५ ऑगस्ट रोजी ७८ व्या भारतीय स्वातंत्र्य दिनाचे मुख्य शासकीय ध्वजारोहण जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात पालकमंत्री प्रा.डॉ.सावंत यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी उपस्थितांना संबोधित करताना ते बोलत होते.
या कार्यक्रमाला स्वातंत्र्यसैनिक भास्करराव नायगावकर,बुबासाहेब जाधव,खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर,आमदार कैलास पाटील,जिल्हाधिकारी डॉ.सचिन ओंबासे,जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.मैनाक घोष,पोलीस अधीक्षक संजय जाधव,अपर जिल्हाधिकारी शिरीष यादव,अपर पोलीस अधीक्षक गौहर हसन, निवासी उपजिल्हाधिकारी शोभा जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती.
पालकमंत्री प्रा.डॉ.सावंत पुढे म्हणाले, शिव-शाहू-फुले-आंबेडकरांच्या विचारांचा पुरोगामीत्वाचा वारसा जपत महाराष्ट्राने महिलांना केंद्रस्थानी ठेवून विकासाची वाटचाल सुरू केली आहे.लेक लाडकी योजना आणि आता राज्य सरकारची महत्त्वकांक्षी “मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना “, मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना,पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला स्टार्टअप योजना,मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना,मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना,मुख्यमंत्री वयोश्री योजना यासह अनेक लोककल्याणकारी योजना सुरू केल्या आहे.मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना राज्य सरकारची अतिशय महत्त्वाकांक्षी योजना असून जिल्ह्यातील पात्र महिला या योजनेच्या लाभापासून वंचित राहू नये यासाठी यंत्रणांनी अतिशय काळजीपूर्वक घरोघरी जाऊन सर्वेक्षण केले.त्यामुळे कोणतीही पात्र महिला या योजनेपासून वंचित राहू नये यासाठी जिल्हाधिकारी यांनी अनेक वेळा संबंधित यंत्रणांच्या बैठका घेतल्या.२ लाख ८१ हजार ३२२ महिलांचे १४ ऑगस्टपर्यंत ऑनलाईन अर्ज प्राप्त झाले.जिल्ह्यातील ३ लाख २४ हजारपेक्षा जास्त पात्र महिलांना लाभ देण्याचे नियोजन करण्यात आले आहे.स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला महिलांच्या बँक खात्यात ही रक्कम जमा करण्यास सुरुवात झाली आहे.युवा वर्गासाठी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना राज्य सरकारने सुरू केली आहे. जिल्ह्यातील १०२ शासकीय कार्यालयांनी २२५८ पदे अधीसुचित केले असून आतापर्यंत प्रत्यक्ष ११० पेक्षा जास्त प्रशिक्षणार्थी प्रत्यक्ष प्रशिक्षणासाठी विविध कार्यालयात रुजू झाले आहे.उर्वरीत प्रशिक्षण पदासाठीची प्रक्रिया गतीमानतेने सुरू आहे.असे प्रा.डॉ. सावंत यांनी सांगितले.
जिल्ह्यातील ज्या गावांमध्ये दहनशेड नाही तेथे दहनशेड बांधकामासाठी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून सन २०२३-२४ मध्ये २६ कोटी ७५ लाख रुपये निधी उपलब्ध करून देण्यात आल्याचे सांगून प्रा.डॉ. सावंत म्हणाले,काही बांधकामे पूर्ण झाली आहे,उर्वरित बांधकामे सुरू आहे.३६१ गावांमधून दहन किंवा दफनभूमीसाठी जागा उपलब्ध नसल्याने शासकीय जागा उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहे.त्यापैकी २१० गावांमधून शासकीय जमीन उपलब्ध करून देण्यात आली आहे.खाजगी जागा थेट खरेदी पद्धतीने उपलब्ध करून देण्यासाठी नियोजन समितीतून ४ कोटी रुपये निधी उपलब्ध करून देण्यात आला खरेदी प्रक्रिया काही गावात पूर्ण झाली असून उर्वरित गावातून देखील खरेदीची प्रक्रिया सुरू आहे.जिल्ह्यातील नागरिकांना गुणवत्तापूर्ण आरोग्य सुविधा मिळवून देण्यासाठी विविध आरोग्यविषयक योजना प्रभावीपणे राबविण्यात येत आहे.सर्व आरोग्य संस्थांच्या माध्यमातून ग्रामीण आणि शहरी भागातील नागरिकांची आरोग्यविषयक तपासणी,उपचार व देखभाल करण्यात येत आहे. प्रधानमंत्री आयुष्मान भारत हेल्थ इन्फ्रास्ट्रक्चर मिशन योजनेअंतर्गत ५० खाटांचे क्रिटिकेअर युनिटच्या बांधकामासाठी २३ कोटी ७५ लक्ष रुपये अनुदान प्राप्त झाले आहे.३६१ कोटी रुपये निधीतून ५०० खाटांचे जिल्हा रुग्णालय बांधण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
माता सुरक्षित तर घर सुरक्षित या अभियानांतर्गत जिल्ह्यातील ६ लक्ष ४५ हजार २७ मातांची तपासणी करून त्यांना आवश्यक त्या आरोग्यविषयक सुविधा पुरविण्यात आल्याचे सांगून प्रा.डॉ.सावंत पुढे म्हणाले,निरोगी आरोग्य तरुणाईचे, वैभव महाराष्ट्राचे ही मोहीम जिल्ह्यात राबवून ५ लक्ष ४८ हजार नागरिकांची आरोग्य तपासणी करून उपचार करण्यात आले.जागरूक पालक सुदृढ बालक या अभियानांतर्गत ४ लक्ष २० हजार बालकांची आरोग्य तपासणी करून २३७ बालकांच्या शस्त्रक्रिया करण्यात आल्या. ३० सप्टेंबरपर्यंत जिल्हा संपूर्णतः अभियान राबविण्यात येत आहे.१२ आठवड्याच्या आत नोंदणी करणे,३० वर्षावरील सर्व नागरिकांची मधुमेह,उच्च रक्तदाब तपासणी व उपचार दर शनिवारी सर्व आरोग्य संस्थेत मेळाव्याच्या माध्यमातून करण्यात येत आहे.१ वर्षापर्यंतच्या बालकांचे संपूर्णता लसीकरण करण्यात येत असल्याचे ते म्हणाले.
खरीप हंगाम २०२३ च्या दुष्काळात बाधित १ लाख २२ हजार शेतकऱ्यांना १४५ कोटी १३ लाख रुपयांचा निधी त्यांच्या बँक खात्यात वितरित करण्यात आल्याचे सांगून प्रा.डॉ.सावंत म्हणाले की,ई-पीक पाहणी प्रकल्प जिल्ह्यात राबविला जात आहे.ई- पीक पाहणी प्रत्येक शेतकऱ्यांनी नोंदवून घ्यावी.त्यामुळे कृषी पतपुरवठा करणे सुलभ होणार आहे.पिक विमा आणि पीक पाहणी दावे तात्काळी निकाली काढता येतील.पिकांचे नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झाल्यास त्याची नुकसान भरपाई देताना ही माहिती उपयोगाची ठरणार आहे. जिल्ह्यातील ७०० रस्ते अतिक्रमण मुक्त करण्यात आले.या शेतरस्त्यांचा १७ हजार शेतकऱ्यांना लाभ झाला आहे.आतापर्यंत जिल्ह्यातील ६५३ किलोमीटरचे रस्ते अतिक्रमणमुक्त करण्यात आल्याचे प्रा.डॉ.सावंत यांनी सांगितले.
मराठा समाजातील आर्थिकदृष्ट्या मागास असलेल्या सुशिक्षित बेरोजगार युवक- युवतींसाठी अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या माध्यमातून काम करण्यात येत असल्याचे सांगून प्रा.डॉ.सावंत म्हणाले की,जिल्ह्यातील २७४१ लाभार्थ्यांचे १८० कोटी रुपये कर्ज बँकांनी मंजूर केले.महामंडळाने १८ कोटी ४ लाख रुपये लाभार्थ्यांना व्याज परतावा केला.सन २०२३-२४ या वर्षात प्रधानमंत्री पिक विमा योजनेअंतर्गत नुकसानाकरिता ५ लक्ष ७२ हजार शेतकऱ्यांना २९७ कोटी रुपये विमा भरपाई वितरित करण्यात आली.महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत जिल्ह्यातील ४४ हजार ६६४ शेतकऱ्यांना १३० कोटी ५८ लक्ष रुपयांचा लाभ देण्यात आला.प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत ११ हजार २४९ घरकुले, रमाई आवास योजनेअंतर्गत १३ हजार ३२४ घरकुले,शबरी आदिवासी आवास योजनेअंतर्गत ३०६ घरकुले पूर्ण झाली. मोदी आवास योजनेच्या २२७४ घरकुलांपैकी ४५० घरकुलाची कामे पूर्ण झाल्याचे प्रा.डॉ.सावंत यांनी सांगितले.ध्वजारोहणानंतर पालकमंत्री प्रा.डॉ.सावंत यांनी स्मृतिस्तंभास पुष्पचक्र वाहिली.पोलीस बँड पथकाने राष्ट्रध्वजाला मानवंदना दिली.कार्यक्रमाला स्वातंत्र्य सैनिकांचे नातेवाईक,ज्येष्ठ नागरिक,माजी सैनिक,विविध विभागाचे अधिकारी – कर्मचारी,नागरिक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाचे संचालन श्री. पडवळ यांनी केले.
More Stories
फॉरेस्टच्या गवतावर तणनाशक फवारणी करून वृक्षलागवडीची नासधूस:वनपालावर कारवाईची मागणी
महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते चॅटबोटचे उद्घाटन
आंतरराष्ट्रीय व्हॉलीबॉल स्पर्धेसाठी जिल्हास्तरीय निवड चाचणी ११ ऑगस्टला