लातूर –आजच्या तरुणांमध्ये प्रचंड ऊर्जा शक्ती असते त्यामूळे देशाचा शाश्वत विकास करण्याच्या प्रक्रियेत तरुणांचा सहभाग वाढला पाहिजे असे प्रतिपादन अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे पश्चिम क्षेत्र संघटन मंत्री देवदत्त जोशी यांनी केले. महात्मा बसवेश्वर महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना, राष्ट्रीय छात्र सेना, क्रीडा विभाग, समाजकार्य विभाग आणि विकासार्थ विद्यार्थी लातूर महानगर यांच्या संयुक्त विद्यमाने महात्मा बसवेश्वर घनवन (मियावाकी) प्रकल्पाच्या उद्घाटन प्रसंगी ते उद्घाटक म्हणून बोलत होते. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. संजय गवई हे होते तर विचारपीठावर नगरपालिका प्रशासन विभाग लातूरचे जिल्हा सहआयुक्त रामदास कोकरे, राष्ट्रीय छात्र सेनेचे डॉ. कॅप्टन बाळासाहेब गोडबोले, विकासार्थ विद्यार्थी राज्य समन्वयक पवन बेळकोणे, प्रांत समिती सदस्य अजय स्वामी आदीची उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या प्रारंभी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या गीताने सुरुवात झाली यावेळी मान्यवरांच्या शुभहस्ते प्रतिमा पूजन आणि दीप प्रजनन झाले पुढे बोलताना देवदत्त जोशी म्हणाले की, युवक हे देशाचे शिल्पकार आहेत. त्यांच्या उसळत्या रक्ताला योग्य दिशा आणि गती दिल्यास देशातील विधायक असे कार्य घडू शकते. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना वेळोवेळी मूल्यांची जाणीव करून देऊन जल, जंगल, जमीन, जनावर आणि जन याबाबतीत शाश्वत विकास करण्याकरिता तरुणांचा सहभाग अत्यंत महत्त्वाचा आहे. तरुणांमध्ये आव्हाने स्वीकारण्याची क्षमता असते त्या क्षमतांचा वापर करून स्वतःला आत्मनिर्भर केले पाहिजे असेही ते म्हणाले. यावेळी रामदास कोकरे म्हणाले की, वृक्षारोपण आणि वृक्ष संवर्धन ही काळाची गरज बनली आहे. जैव विविधा टिकून ठेवायचे असेल तर मियावाकी, देवराई, ट्री कॉरिडोर, वृक्ष आच्छादने यासारख्या उपक्रमांची आवश्यकता आहे असे ते म्हणाले. अध्यक्षीय समारोप करताना प्रभारी प्राचार्य डॉ. संजय गवई म्हणाले की, मियावाकी प्रकल्प हा महाविद्यालय आणि परिसरासाठी वरदान आहे. परिसरातील विविध प्रदूषण रोखले जाऊन परिसरातील ऑक्सिजनच्या प्रमाणात वाढ होणार आहे. निसर्गाचे संरक्षण हे प्रत्येक तरुणांचे कर्तव्य आहे. जल, जंगल, जमीन, जनावर यांचे संरक्षण व संवर्धन झाल्यास मानवाचे दैनंदिन जीवन हे अधिक सुखकर होईल त्यासाठी सामूहिक प्रयत्नाची नितांत आवश्यकता आहे असेही ते म्हणाले या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रवण बेळकोने यांनी केले तर सूत्रसंचालन डॉ. मनोहर चपळे यांनी केले तर आभार अजय स्वामी यांनी मानले. या कार्यक्रमाच्या यशस्वीकरिता राष्ट्रीय सेवा योजनेचे डॉ. रत्नाकर बेडगे, डॉ. शिवप्रसाद डोंगरे, प्रा. किसनात कुडके, राष्ट्रीय छात्र सेनेचे डॉ. बाळासाहेब गोडबोले, डॉ. अभय धाराशिवे, छात्रसेनेचे व राष्ट्रीय सेवा योजनेचे विद्यार्थी विद्यार्थिनी यांनी परिश्रम घेतले.
More Stories
अटल टिंकरिंग लॅब प्रकल्प प्रदर्शनात जिजामाता विद्यालयाची चमकदार कामगिरी; जिल्हास्तरावर द्वितीय क्रमांक
सामाजिक कार्यासाठी सुफी सय्यद शमशोद्दीन यांना ‘समाजभूषण’ पुरस्काराने गौरव
“बौद्ध धम्म हा समतेचा मार्ग” – भिक्खू पय्यानंद थेरो