धाराशिव (जिमाका) – राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचा 26 जून हा जन्मदिवस सामाजिक न्याय दिन म्हणून साजरा करण्यात येतो.आज त्या अनुषंगाने जिल्ह्यात जिल्हास्तर, तालुकास्तर आणि गावपातळीवर सामाजिक न्याय दिन कार्यक्रमाचे आयोजन करून हा दिवस साजरा करण्यात आला.
धाराशिव येथे आज 26 जून रोजी सकाळी 8 वाजता समता दिंडीचे उद्घाटन गटशिक्षणाधिकारी सय्यद असरार,पी.एस.काझी,भारत देवगुडे,दत्त्प्रसाद जंगम व श्रीमती हके यांचे हस्ते करण्यात आले.समता दिंडीमध्ये समाज कल्याणचे सहाय्यक आयुक्त बाबासाहेब अरवत यांचेसह समाज कल्याण कार्यालयातील व इतर कार्यालयाचे अधिकारी/कर्मचारी/ शिक्षकवर्ग/विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
समता दिंडी मल्टीपर्पज हायस्कूल, जिल्हा परिषद धाराशिव येथून निघून प्रथम विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे पुतळ्यास व छत्रपती शिवाजी महाराज यांचे पुतळ्यास अभिवादन करुन यशवंतराव चव्हाण सभागृह, जिल्हा परिषद येथे समता दिंडीचा समारोप झाला.समारोप प्रसंगी विद्यार्थ्यांना समता रॅलीतील सहभागी विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आले.
सामाजिक न्याय दिनाचा मुख्य कार्यक्रम डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन सभागृह, धाराशिव येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कार प्राप्त शंकर खुणे यांचे अध्यक्षतेखाली व विजयकुमार गायकवाड व लक्ष्मण वाघमारे, यांचे प्रमुख उपस्थितीत आयोजित करण्यात आला.जिल्हास्तरावरील कार्यक्रमाची सुरुवात राजर्षी शाहू महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून आणि अभिवादन करुन करण्यात आली.कार्यक्रमाचे प्रास्ताविक जवाहार प्राथमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळा,बावीचे प्राचार्य बी.यू.जगताप यांनी केले. प्रमुख वक्ते म्हणून व्यंकटेश महाजन महाविद्यालय,धाराशिव येथील प्रा.डॉ.विनोदकुमार वायचळ यांनी समाज सुधारक शाहू महाराज या विषयावर प्रकाश टाकला.यावेळी समाजभूषण पुरस्कार विजेते,अण्णाभाऊ साठे पुरस्कार विजेते व इतर पुरस्कार प्राप्त मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाला जिल्ह्यातील शासकीय वसतिगृहातील व शासकीय निवासी शाळेतील जवळ-जवळ 200 ते 250 विद्यार्थी व विद्यार्थीनी उपस्थित होते. या कार्यक्रमामध्ये आदर्श लोकजागृती कला मंडळ,गोरेवाडी या पथकाचे प्रमुख शाहीर राणा जोगदंड यांनी राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचे जीवनकार्यावर पोवाडे/गिताचे सादरीकरण केले.यावेळी शहरातील तसेच तालुकास्तरावरील शासकीय वसतिगृहे/निवासी शाळेचे विद्यार्थी, मुख्याध्यापक,गृहपाल,कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमामध्ये समाज कल्याण निरिक्षक जगताप यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना शाहू महाराज यांच्या जीवनकार्याविषयी मार्गदर्शन केले. अध्यक्षीय मार्गदर्शनातून खुणे यांनी विद्यार्थ्यांना त्यांच्या जीवनात यशस्वी होण्यासाठी मोलाचे मार्गदर्शन केले. वरिष्ठ लिपीक सिरसट यांनी उपस्थितांचे आभार मानले.
More Stories
फॉरेस्टच्या गवतावर तणनाशक फवारणी करून वृक्षलागवडीची नासधूस:वनपालावर कारवाईची मागणी
महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते चॅटबोटचे उद्घाटन
आंतरराष्ट्रीय व्हॉलीबॉल स्पर्धेसाठी जिल्हास्तरीय निवड चाचणी ११ ऑगस्टला