- धाराशिव (जिमाका) – जिल्हयातील नैसर्गिक आपत्तीमध्ये बाधित झालेल्या शेतकरी बांधवांनी जिल्ह्यात गत दोन वर्षातील विविध नैसर्गिक आपत्तीमध्ये झालेल्या पिकांच्या नुकसानीची मदत मिळविण्यासाठी गावातील तलाठ्याकडून विशिष्ट क्रमांक मिळवून घेत ई-केवायसी करून घेणे अनिवार्य आहे.त्यामुळे शेतकऱ्यांनी तात्काळ आपल्या खात्याची ई-केवायसी करून घेण्यात यावी.
माहे सप्टेंबर-ऑक्टोबर 2022 मध्ये झालेल्या सततच्या पावसामुळे व खरीप हंगाम -2023 दुष्काळामुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे करण्यासाठी तलाठी,ग्रामसेवक व कृषी सहाय्यक यांची त्रिस्तरीय समिती स्थापन करण्यात आली होती.या त्रिस्तरीय समितीकडून जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या पिकांचे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्यात आले होते.आजपर्यंत 3 लाख 13 हजार 831 शेतकऱ्यांना 290 कोटी रुपयांचे अनुदान बँक खात्यावर वितरण करण्याची मान्यता देण्यात आली आहे.त्यापैकी जिल्ह्यातील 40 हजार 838 शेतकऱ्यांनी ई-केवायसी न केल्यामुळे 32 कोटी रुपये नुकसान भरपाईचा निधी प्रलंबित आहे.तरी शेतकऱ्यांकडून विशिष्ट क्रमांकासह लवकरात लवकर ई-केवायसी करून घेण्याची कार्यवाही सर्व तहसीलदारांनी करून घ्यावी.
त्या अनुषंगाने मदत व पुनर्वसन विभाग,मंत्रालय,मुंबई यांच्याकडून निर्गमित करण्यात आलेल्या शासन निर्णयान्वये बाधित शेतकऱ्यांना अनुदानाची रक्कम वितरित करण्याबाबत शासनाच्या पोर्टलवरून यादी अपलोड करण्याची कार्यवाही करण्यात आली आहे.ही यादी अपलोड केल्यानंतर बाधित शेतकऱ्यांना आपल्या गावातील तलाठ्याकडून (विशिष्ट क्रमांक) घेऊन ई-केवायसी करणे बंधनकारक आहे.
त्याबाबत तहसील कार्यालयाकडून तलाठ्यामार्फत संबंधीत ग्रामपंचायतीमध्ये V.K.(विशिष्ट क्रमांक) याद्या प्रसिद्ध करण्यात आल्या असून,बाधित शेतकऱ्यांनी अद्याप ई-केवायसी केली नाही,अशा शेतकऱ्यांनी तात्काळ जवळच्या आपले सरकार सेवा केंद्रावर जाऊन ई-केवायसी करून घ्यावी.असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी शोभा जाधव यांनी केले आहे.
More Stories
इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या पुरस्काराकरिता अर्ज करण्याचे आवाहन
मतदानाचा हक्क बजावण्यासाठी कामगारांना ७ फेब्रुवारी रोजी भरपगारी रजा देणे बंधनकारक
दुखवट्यामुळे जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीचा मतदान दिवस बदलला;आता ७ फेब्रुवारीला मतदान