August 9, 2025

विशेष अतिसार नियंत्रण पंधरवडा

  • धाराशिव (जिमाका) – नवजात अर्भक आणि पाच वर्षाच्या आतील लहान मुलांच्या होणाऱ्या मृत्यूस कारणीभूत असलेल्या कारणांपैकी अतिसार हे कारण असल्याने बालकातील मृत्यूचे प्रमाण रोखण्यासाठी विशेष अतिसार नियंत्रण पंधरवड्याचे विशेष महत्त्व आहे.
    6 जून ते 21 जून दरम्यान या कालावधीत हा पंधरवाडा दरवर्षी आरोग्य विभागाच्या वतीने आयोजित करण्यात येतो. 6 जून 2024 रोजी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.मैनाक घोष यांच्या मार्गदर्शनाखाली तुळजापूर तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र मंगरूळ येथे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.सतीश हरिदास यांच्या हस्ते आणि जिल्हा माता बालसंगोपन अधिकारी डॉ.के.के. मिटकरी यांच्या प्रमुख उपस्थितीत विशेष अतिसार नियंत्रण पंधरवड्याचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.हरिदास यांनी विशेष अतिसार पंधरवडा हा कार्यक्रम राबविण्याची कारणे विशद केली. अर्भक व बाल मृत्यूमुळे पाच ते सात टक्के बालके हे अतिसरामुळे मृत्यू पावतात. मृत्यूचे हे प्रमाण रोखण्यासाठी या पंधरवड्याला विशेष महत्त्व असल्याचे त्यांनी सांगितले. या पंधरवड्यादरम्यान प्रत्येक घरोघरी भेटी देऊन आरोग्य कर्मचारी व आशा स्वयंसेविका यांच्यामार्फत क्षार संजीवनी अर्थात ओआरएसचे द्रावण तयार करणे, त्याचे महत्त्व समजावून सांगणे,त्याचा वापर करणे तसेच अतिसार टाळण्यासाठी स्वच्छतेचे महत्त्व सांगणे,जसे की पिण्याचे स्वच्छ पाणी,परिसर स्वच्छता, जेवणापूर्वी, स्वयंपाक करण्यापूर्वी,बाळाला जेवण भरवण्यापूर्वी हाच साबणाने स्वच्छ धुणे या बाबीचा प्रचार प्रसार करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
    जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य उपकेंद्र, प्राथमिक आरोग्य केंद्र, नागरी आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय आणि जिल्हा रुग्णालय इत्यादी ठिकाणी क्षार संजीवनी अर्थात ओआरएस कॉर्नर तयार करण्यात आले असल्याचे देखील डॉ. हरिदास यांनी सांगितले.
    जिल्हा माता व बालसंगोपन अधिकारी डॉ.मिटकरी यांनी क्षार संजीवनी सोबतच झिंक गोळ्याचे महत्त्व विशद करून बाळाचा अतिसारापासून बचाव करण्यासाठी पहिले सहा महिने निव्वळ स्तनपानाचे महत्व तसेच अ- जीवनसत्वाची पूरक मात्रा देणे याबाबतची माहिती उपस्थितांना दिली.
    सर्व आरोग्य कर्मचारी आणि आशा स्वयंसेविका आणि अतिसार पंधरवड्याच्या केलेल्या नियोजनानुसार सर्व पूर्ण घरास भेटी देऊन मोहीम यशस्वीपणे पार पाडण्याच्या सूचना दिल्या. कार्यक्रमाच्या शेवटी तालुका आरोग्य अधिकारी डॉ.किशोर घाडगे यांनी प्राथमिक आरोग्य केंद्रासह तालुक्यामध्ये ही मोहीम यशस्वीपणे राबविण्यात येणार असल्याचे सांगितले.या कार्यक्रमाला वैद्यकीय अधिकारी डॉ. यत्नाळकर यांच्यासह डॉ.सचिन गायकवाड व प्राथमिक आरोग्य केंद्रातील सर्व कर्मचारी उपस्थित होते.
error: Content is protected !!