August 8, 2025

जिल्हयातील पशुधनास सप्टेंबरपर्यंत पुरेल इतका चारा उपलब्ध

धाराशिव (जिमाका) धाराशिव जिल्हयात पाणी टंचाईची तीव्रता वाढली असली तरी पशुधनास आवश्यक असलेला चारा मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे.जिल्ह्यात 20 व्या पशुगणनेप्रमाणे गायवर्ग व म्हैसवर्ग असे एकूण 5 लाख 50 हजार ऐवढे पशुधन आहे.तसेच शेळ्या-मेंढ्याची संख्या 2 लाख 39 हजार एवढी आहे.जिल्ह्यातील पशुधनास चाऱ्याचा तुटवडा निर्माण होऊ नये,यासाठी पशुसंवर्धन विभाग, जिल्हा परिषद धाराशिव यांचेमार्फत सन 2023-24 मध्ये 56 हजार 815 किलो सुधारीत ज्वारी वैरण बियाणांचे (शुगरग्रेज) वाटप पशुपालकांना करण्यात आले होते. त्यामधून 3 हजार 787 हेक्टर क्षेत्रावरती वैरण बियाणाची पेरणी करण्यात आली होती.त्यातून 3 लाख मेट्रिक टन ऐवढा मुबलक चारा उपलब्ध झाला आहे.तसेच खरीप व रब्बी हंगामात ज्वारी व अन्य पिकांच्या दुय्यम उत्पादनातूनही चारा उपलब्ध होतो.कृषी विभागाकडील पीक पेरानुसार सन 2023-24 मध्ये खरीप हंगामातून (कृषी पिकांची दुय्यम उत्पादने) यामधून 3.80 लाख मेट्रिक टन ऐवढा,रब्बी हंगामातून 2.09 लाख मेट्रिक टन एवढा व उन्हाळी हंगामातून 1.73 लाख मेट्रिक टन एवढा चारा उपलब्ध झाला आहे.

तसेच जिल्ह्याबाहेर चारा वाहतुकीस प्रशासनाने बंदी घातली आहे.त्यामुळे सप्टेंबर 2024 च्या पहिल्या आठवड्यापर्यंत पुरेल इतका चारा जिल्ह्यात उपलब्ध आहे.त्यामुळे जिल्हयातील पशुधनास यावर्षी चारा टंचाई जाणवणार नाही.तसेच येत्या जूनमध्ये पशुसंवर्धन विभाग, जिल्हा परिषद धाराशिव यांचेमार्फत जिल्ह्यात सुधारीत मका वैरण बियाणे वाटप करण्यात येणार आहे.त्यामुळे खरीप 2024 या हंगामात वैरण बियाणाची पेरणी होऊन त्याद्वारेही मुबलक प्रमाणात चारा उपलब्ध होणार आहे.

*दरदिवशी लागतो 3089 मेट्रिक टन चारा*

जिल्ह्यातील लहान-मोठ्या 5 लाख 50 हजार पशुधनांना व 2 लाख 39 हजार शेळ्या-मेंढ्यांसाठी दरदिवशी 3089 मेट्रिक टन चारा लागतो,तर महिन्याकाठी 92 हजार 670 मेट्रिक टन चाऱ्याची गरज आहे.

*जिल्ह्याबाहेर चारा वाहतुकीस बंदी*

जिल्ह्यातील उपलब्ध चारा जिल्ह्याबाहेर गेल्यास तुटवडा निर्माण होण्याची दाट शक्यता असते. त्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून जिल्ह्यात उत्पादित चारा जिल्ह्याबाहेर नेण्यास बंदी घालण्यात आली आहे.

*जिल्ह्यामध्ये मुरघास निर्मितीचे प्रयत्न*

जिल्हयामध्ये पशुधनासाठी टंचाईच्या कालावधीमध्ये चारा,हिरवा चारा उपलब्ध होण्याच्या दृष्टीने मुरघास निर्मिती करण्यात येत आहे.सध्या जिल्हयामध्ये तुळजापुर (मौजे देवशिंगा),भूम (प.वै.द. अंभी व प.वै.द आंतरगाव) व कळंब (मराठवाडा डेअरी कळंब) या तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात मुरघास निर्मिती होत आहे.त्यामुळे उन्हाळ्यामध्येही मुरघासमुळे हिरव्या चाऱ्याची कमतरता भासणार नाही. उत्पादित मुरघासची विक्री 9 रूपये प्रती किलोप्रमाणे होत आहे.

खरीप,रब्बी व उन्हाळी हंगामातील उत्पादित झालेला चारा तसेच पशुसंवर्धन विभागातुन वाटप करण्यात आलेल्या बियाणांपासुन उत्पादित झालेला चारा असे एकंदरीत पाहता सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत चारा टंचाई भासणार नाही.असे जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ.वाय.बी.पुजारी यांनी कळविले आहे.

error: Content is protected !!