March 26, 2026

निरोगी गावाकडे वाटचाल;मौजे बोरफडी येथे ‘अनिमिया मुक्त गाव’ उपक्रमाचा भव्य शुभारंभ

  • बीड – बीड तालुक्यातील मौजे बोरफडी येथे मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानांतर्गत ‘अनिमिया मुक्त गाव’ या महत्त्वाकांक्षी उपक्रमाचा शुभारंभ गटविकास अधिकारी अनिरुद्ध सानप यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला.या कार्यक्रमाचे आयोजन सरपंच कैलास घुगे यांच्या वतीने करण्यात आले.
    कार्यक्रमात डॉ.सय्यद यांनी उपस्थितांना अनिमिया (रक्तक्षय) आजाराबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.महिलांमध्ये,बालकांमध्ये व किशोरवयीन मुलींमध्ये अनिमियाचे प्रमाण अधिक असल्याचे नमूद करत योग्य आहार,नियमित तपासणी व वेळेवर औषधोपचार केल्यास हा आजार पूर्णतः नियंत्रणात आणता येतो, असे त्यांनी स्पष्ट केले.
    यावेळी गटविकास अधिकारी अनिरुद्ध सानप यांनी अनिमिया मुक्त गाव उपक्रमाचे महत्त्व विशद करताना सांगितले की,सुदृढ समाजनिर्मितीसाठी आरोग्य हा कळीचा घटक आहे.ग्रामपंचायत, आरोग्य यंत्रणा,आशा स्वयंसेविका व अंगणवाडी सेविका यांनी समन्वयाने कार्य केल्यास गाव अनिमियामुक्त करणे निश्चितच शक्य आहे.
    सरपंच कैलास घुगे यांनी आपल्या मनोगतातून गावातील प्रत्येक नागरिकाची हिमोग्लोबिन तपासणी करून आवश्यक उपचार राबविण्याचा तसेच पोषणविषयक जनजागृती कार्यक्रम सातत्याने घेण्याचा संकल्प व्यक्त केला.
    या कार्यक्रमास विस्तार अधिकारी पारटकर,चांगन,युवा उद्योजक सुनील कुटे,ग्रामपंचायत सदस्य, आरोग्य कर्मचारी,आशा स्वयंसेविका,अंगणवाडी सेविका, ग्रामपंचायत अधिकारी गिते,शालेय विद्यार्थी,महिला,किशोरवयीन मुले-मुली व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.अनिमिया मुक्त गाव उपक्रमाच्या माध्यमातून मौजे बोरफडी हे आदर्श व निरोगी गाव म्हणून विकसित करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.
error: Content is protected !!