संभाजी नगर – भाजप सरकारचे गेले दहा वर्षाच्या कार्यकाळ पाहिल्यास,भारतीय संविधानास सर्वात जास्त धोका भाजप आघाडी सरकारकडून असल्याने, लोकसभा निवडणुकीत इंडिया – महा विकास आघाडीचे उमेदवार निवडूण आणावेत असे आवाहन, आज महात्मा गांधी भवन येथे झालेल्या संविधान बचाव देश बचाव परिषदेतील सर्वच वक्त्यांनी केले. असंघटित कष्टकऱ्यांचे नेते व जय किसान आंदोलन – स्वराज अभियान चे साथी सुभाष लोमटे यांचे अध्यक्षते खाली दि.५ मे २०२४ पार पडलेल्या परिषदेस , भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे अँड. अभय टाकसाळ, शेतकरी संघटनेचे प्रा. कैलास तवार, मराठा सेवा संघाच्या अड. वैशाली डोळस, अमन कमिटीचे डॉ. शेख इक्बाल मिन्ने, समाजवादी गणतंत्र पार्टीचे प्रा. प्रकाश दाणे, प्रा. झकीउद्दिन सिद्दीकी व ज्येष्ठ साहित्यिक डॉ. ऋषिकेश कांबळे यांनी मार्गदर्शन केले. सर्वच वक्त्यांनी भाजप आघाडीचे सरकारच्या कर्मांचा पंचनामा केला , ज्यास प्रामुख्याने देशाचे पंतप्रधान सर्वस्वी जबाबदार असल्याची टीका करण्यात आली. बिल्कीस बानो व उन्नाव चे बलात्कार्यांचा उदो उदो असो, मुस्लिमांचे मोबलिंचींग कडे पूर्ण डोळेझाक करणे असो, वर्षभरापूर्वी मणिपूर मध्ये कुकी महिलांवर अत्याचार करून नग्न धिंड असो, देशातील हजारो बेरोजगारांना रोजगार देणारे सार्वजनिक उद्योग मूठ भर मर्जीतील लोकांना कवडीमोल किंमतीत विकणे असो, जीवनावश्यक ( पाणी, वीज, शिक्षण, आरोग्य इ…) वस्तू – सुधांचे प्रछंन खाजगीकरण असो, …. या सर्व जन विरोधी कृत्यामुळे सर्वसामान्यांचे जगणे कठिण होवून बसले आहे.आणि म्हणून येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत इंडिया – महा विकास आघाडीचे औरंगाबाद चे शिवसेना (ऊबाठा) चंद्रकांत खैरे आणि जालना लोकसभेचे, काँग्रेस चे उमेदवार डॉ कल्याण काळे यांना प्रचंड मताने निवडूण आणण्यासाठी, सर्वांनी तन – मन – धना ने प्रयत्न करावेत असे आवाहन सर्वच वक्त्यांनी केले.
पुन्हा मनुस्मृती चे राज्य आणण्याचे मनसुभे हाणून पाडा –
दहा वर्षापासून सत्तेत असणाऱ्या आरएसएस – भाजप सरकारला संविधान व त्यातील लोकशाही, समता,स्वातंत्र्य, बंधुता, समाजवाद, धर्मनिरपेक्षता, हे विचार कधीही मान्य नव्हते , उलट मनुस्मृती ( उंच नींचता, स्पृश्य – अस्पृश्य..इ..) मधील विचारांना शिरोधार्य मानत असल्याचे, आज कधी नव्हे एवढा धोका भारतीय संविधानास असल्याचे अध्यक्षीय समारोपात साथी सुभाष लोमटे यांनी आपले विचार व्यक्त केले. आजच्या महत्त्वपूर्ण अशा परिषदेस, प्रा.गीता कोल्हटकर, प्रा.मच्छिंद्र गोरडे, प्रा.पठाण, प्रा. श्रीराम जाधव , सुबेदार मेजर सुखदेव बन, साथी देवीदास कीर्तिशाही, साथी राजेंद्र डबीर इ. सह हमाल कष्टकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. परिषदेच्या सुरुवातीस, दलित पँथरचे नेते व माजी मंत्री गंगाधर जी गाडे आणि भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे राष्ट्रीय नेते कॉ. अतुल कुमार अंजान यांचे दुःखद निधनावर शोक व्यक्त करून, एक मिनिट स्तब्धता पाळून त्यांना आदरांजली वाहिली.
More Stories
शेतकरी संघटन बळकट करण्यासाठी राष्ट्रवादी किसान सभा सज्ज;१५ जानेवारीपर्यंत नवी रचना
वंचित बहुजन आघाडीचा प्रशासनावर सवालांचा भडिमार
धाराशिव जिल्हा अध्यक्षपदी राजाभाऊ गायकवाड यांची पुनर्नियुक्ती