छत्रपती संभाजीनगर – राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी किसान सभेच्या मराठवाडा विभागातील जिल्हाध्यक्ष व राज्य पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक छत्रपती संभाजीनगर येथील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कार्यालयात उत्साहात संपन्न झाली.या बैठकीच्या अध्यक्षस्थानी किसान सभेचे प्रांताध्यक्ष ॲड. वसंतराव मनकर होते. अध्यक्षस्थानावरून बोलताना ॲड. मनकर यांनी सांगितले की राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा किसान सभा हा अत्यंत महत्त्वपूर्ण व प्रभावी विभाग असून शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर ठोस भूमिका घेऊन त्यांच्या हितासाठी सातत्याने काम करणे हेच आमचे ध्येय आहे.शेतकऱ्यांच्या सर्वांगीण हितासाठी तयार करण्यात आलेल्या ११ कलमी कृती कार्यक्रमाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी त्यांनी संघटन अधिक सबळ करण्याचे आवाहन केले. बैठकीत मार्गदर्शन करताना आत्माचे माजी प्रकल्प संचालक डॉ. मंगेश देशमुख यांनी जिल्हा कृषी अधिकारी व ‘आत्मा’ यंत्रणेमार्फत विविध कृषी योजनांच्या अंमलबजावणीत कार्यकर्त्यांनी सक्रिय भूमिका बजावावी, असे निर्देश दिले. या बैठकीस किसान सभेचे राज्य सरचिटणीस डॉ.मंगेश देशमुख (अमरावती),डॉ.गणेश डोंगरे (ठाणे),श्रीपत पाटील मांजरमकर (नांदेड),बबनराव तिकांडे (अहिल्यानगर),जयदीप झाल्टे, किसान सभा उपाध्यक्ष तथा मराठवाडा विभाग प्रमुख रामभाऊ हाडोळे,रज्जाक शेख यांच्यासह मराठवाड्यातील सर्व जिल्हाध्यक्ष व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. बैठकीदरम्यान सर्व जिल्हाध्यक्षांनी आपल्या जिल्ह्यातील संघटनात्मक कामाचा आढावा सादर करत किसान सभेच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला अधिक बळकट करण्याचा निर्धार व्यक्त केला.येत्या १५ जानेवारीपर्यंत जिल्हा व तालुका समित्या गठित करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय यावेळी घेण्यात आला.शेवटी किसान सभा प्रदेश उपाध्यक्ष तथा मराठवाडा विभाग प्रमुख रज्जाक शेख यांनी उपस्थितांचे आभार मानले.
More Stories
वंचित बहुजन आघाडीचा प्रशासनावर सवालांचा भडिमार
धाराशिव जिल्हा अध्यक्षपदी राजाभाऊ गायकवाड यांची पुनर्नियुक्ती
ऊसतोडणी कामगार महिलांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी आरोग्य मित्र उपक्रम- रुपाली चाकणकर