लातूर (दिलीप आदमाने) – सध्या संपूर्ण विश्वामध्ये ग्लोबल वार्मिंगमुळे पर्यावरणामध्ये विविध समस्या निर्माण झाल्या. त्यामुळे मानवी जीवन धोक्यात आले आहे. स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड यांच्या परिपत्रकान्वये प्रत्येक महाविद्यालयात ग्रीन क्लबची निर्मिती करण्यात येत आहे. त्यामुळे महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरण जनजागृतीचा हा स्तुत्य उपक्रम असल्याचे प्रतिपादन पर्यावरण तज्ञ तथा सह्याद्री देवराई मराठवाडा विभागीय समन्वयक सुपर्ण जगताप यांनी केले. महात्मा बसवेश्वर महाविद्यालयातील आय.क्यु.ए.सी., पदवी, पदव्युत्तर आणि संशोधन केंद्र आणि सृष्टी ग्रीन क्लब द्वारा जागतिक जल दिनाचे औचित्य साधून दि.२५ मार्च २०२४ रोजी जल जागृती सप्ताह अंतर्गत विस्तार व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. यावेळी ते प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ.संजय गवई हे होते तर प्रमुख उपस्थिती म्हणून उपप्राचार्य डॉ. राजकुमार लखादिवे, उपप्राचार्य प्रा. संजय पवार, प्रा. योगेश रेड्डी, ग्रीन क्लबचे मार्गदर्शक डॉ. बाळासाहेब गोडबोले यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या प्रारंभी जगतज्योती महात्मा बसवेश्वरांच्या प्रतिमेला मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून दीप प्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. पुढे बोलताना सुपर्ण जगताप म्हणाले की, आज देवराई प्रकल्पाच्या माध्यमातून विविध गावांमधून सयाजीराव शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पर्यावरण संवर्धनाचे उत्कृष्ट कार्य सुरू आहे त्याला महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी सहकार्य करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले. यावेळी विद्यार्थ्यांनी जलजागृती विषयी तयार केलेल्या भित्तीपत्रकाचे विमोचन करून त्यांचा सत्कारही करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. बाळासाहेब गोडबोले यांनी केले. अध्यक्षीय समारोप प्रभारी प्राचार्य डॉ. संजय गवई यांनी केला. सूत्रसंचलन कु. यशोदा रासुरे आणि कु. ऋतुजा भिसे यांनी केले तर आभार डॉ. अभयकुमार धाराशीवे यांनी मानले. या कार्यक्रमाला महाविद्यालयातील पदवी, पदव्युत्तर व संशोधन केंद्रातील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
More Stories
जिल्हा परिषद महिला परिचरांच्या न्यायासाठी ठिय्या आंदोलन यशस्वी!
एकशे सात सुरक्षा रक्षक झाले बेरोजगार;लातूरच्या शासकीय रुग्णालयाचा बेभरवशाचा कारभार!
जीवनाच्या परीक्षेत यशस्वी होऊन कुटुंबाचा आधार बना – आमदार विक्रम काळे