August 8, 2025

महात्मा बसवेश्वरमध्ये ‘मराठी भाषा गौरव दिन’ उत्साहात संपन्न

  • लातूर (दिलीप आदमाने ) –
    महात्मा बसवेश्वर महाविद्यालयात मराठी भाषा वाङमय विभागाच्यावतीने ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त कविश्रेष्ठ वि. वा. शिरवाडकर ऊर्फ कुसुमाग्रज यांचा जन्म दिवस मराठी भाषा गौरव दिन म्हणून उत्साहात साजरा करण्यात आला.
    या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय गवई होते तर उपप्राचार्य डॉ.राजकुमार लखादिवे, प्रा. व्यंकट दुडिले, प्रा.मारुती माळी, प्रा. शिवगीता तुपकरी, रत्नेश्र्वर स्वामी आणि नामदेव बेंदरगे यांची उपस्थिती होती.
    या कार्यक्रमाची सुरुवात कविश्रेष्ठ वि.वा.शिरवाडकर ऊर्फ कुसुमाग्रज यांच्या प्रतिमापूजनाने झाली.उपस्थित सर्व मान्यवरांच्या शुभ हस्ते महाराष्ट्राची लोकधारा, लोकसंस्कृती दर्शविणाऱ्या ‘अस्मिता’ या भित्तीपत्रिकेचे विमोचन करण्यात आले.
    यावेळी प्रास्ताविक करताना उपप्राचार्य डॉ.राजकुमार लखादिवे म्हणाले की, कुसुमाग्रज हे मराठी साहित्यात चौफेर लेखन करणारे ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त साहित्यिक होते. त्यांचे एकूण साहित्य मानवी जीवनाच्या प्रत्येक अंगाला स्पर्श करणारे आहे. त्यांनी मराठी साहित्याचा गोडवा सर्वसामान्यांपर्यंत नेला अशा महान साहित्यिकाच्या साहित्याचे आपण सतत वाचन करायला हवे असेही ते म्हणाले.
    यावेळी कु.शिवाली मुकडे यांनी ‘माणूस हरवलाय’ स्व कविता सादर केली.
    यावेळी प्रा. व्यंकट दुडिले म्हणाले की, भाषा ही मानवास लाभलेली सर्वांत मोठी देणगी आहे. भाषेशिवाय माणसाची प्रगती खुंटते. आपल्याला प्रगती करायची असेल, व्यक्तिमत्त्वाचा विकास करायचा असेल तर आपली मातृभाषा जपली व जोपासली पाहिजे असे सांगून कविश्रेष्ठ कुसुमाग्रज यांची ‘कणा’ ही कविता सादर केली.
    प्रा. मारुती माळी म्हणाले की, मराठी भाषा ही संस्कृतीचे वाहन आणि संवर्धन करणारी भाषा आहे. संस्कृती आणि संस्कार यांचा अजोड संगम साधणारी आणि मानवी जीवनाला संस्कारित करणारी भाषा आहे असे ते म्हणाले.
    अध्यक्षीय समारोप करताना प्रभारी प्राचार्य डॉ.संजय गवई म्हणाले की,मराठी भाषेचे संवर्धन करणे,जतन करणे,दर्जा जोपासणे आणि सन्मान करणे हाच खरा मराठी भाषेचा गौरव आहे. कुसुमाग्रजांच्या जयंतीनिमित्त मराठी भाषेचा गौरव होणे म्हणजे कुसुमाग्रजांच्या साहित्यिक श्रेष्ठत्वाची पावतीच आहे. आज साहित्य क्षेत्र ते कला क्षेत्रापर्यंत मराठी भाषा सर्वांना आपलीशी झाली आहे असेही ते म्हणाले.
    या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. शंकर भोसले यांनी केले तर आभार प्रा. शिवगीता तुपकरी यांनी मानले.
    या कार्यक्रमास संदीप मोरे, संतोष येंचेवाड, भीमाशंकर सुगरे आदींचे सहकार्य लाभले.
    या कार्यक्रमास प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी – विद्यार्थीनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
error: Content is protected !!