संभाजीनगर – नामांतराचा लढा हा समाजात सामाजिक न्याय प्रस्थापित करण्याच्याच एक भाग होता असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य हमाल मापाडी महामंडळाचे सरचिटणीस व स्वराज अभियानचे नेते साथी सुभाष लोमटे यांनी नामविस्तार दिनाचे कार्यक्रमात केले. नारळी बाग येथील संघटनेच्या संविधान भवन येथे नामविस्तार दिनानिमित्त झालेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी औरंगाबाद कृषि उत्पन्न बाजार समितीचे संचालक साथी देविदास किर्तीशाही हे होते. विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी आपले संपूर्ण आयुष्य,फक्त दलितच नव्हे तर, समाजातील सर्वच शोषित, पीडित घटकांना सामाजिक न्याय मिळावा यासाठी खर्ची घातले , म्हणून विद्यापीठाला त्यांचे नांव देणे हा विद्यापीठाचा बहुमान मानला पाहिजे असेही त्यांनी सांगीतले. नामांतराच्या लढ्यात, सर्व जाती – धर्मातील व विविध परिवर्तन पक्ष – संघटनातील कार्यकर्त्यांनी एकत्र येवून स्थापन केलेल्या,नामांतरवादी विद्यार्थी नागरिक कृती समितीने महत्त्वाची भूमिका बजावल्याची माहिती त्यांनी दिली. साथी लोमटे यांनी पुढें असेही सांगीतले की,नामांतराच्या मागणी साठी, दि.६ सप्टेंबर १९८३ रोजी मुंबईत राज्यव्यापी सत्यागृह झाला.तेंव्हा पोलिसांनी अटक केलेल्या सत्यागृहींना ठेवण्यासाठी राज्यातील जेल ही अपुरे पडले होते. आज तरुणांच्या शिक्षण व रोजगाराचे प्रश्न अतिशय गंभीर अशा वळणावर आहेत, कामगार – कष्टकऱ्यांच्या संरक्षणाचे कायदे पातळ केले जात आहेत, शेतकऱ्यांचे शेतीमालासाठी हमी भावाचा कायदा करणे असो वा दुप्पट उत्पन्न देण्याच्या घोषणा कधीच हवेत विरल्या असून, निवडणुका डोळ्यासमोर ठेवून कांहीं मंडळी जाणीवपूर्वक जाती – धर्मावरून पुन्हा समाजात वादंग माजविण्याचा प्रयत्न होतो आहे , या पासून कष्टकऱ्यानी सावध राहिले पाहिजे असेही आवाहन केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी साथी प्रवीण सरकटे, देविदास कीर्तिशाही,साथी सर्जेराव जाधव, साथी किशोर मगरे,अशोक वाघमारे,प्रवीण मगरे,गणेश तरटे,गौतम बनकर,सतीश मगरे,मुखतार शेख इ. नी विशेष प्रयत्न केले.
More Stories
शेतकरी संघटन बळकट करण्यासाठी राष्ट्रवादी किसान सभा सज्ज;१५ जानेवारीपर्यंत नवी रचना
वंचित बहुजन आघाडीचा प्रशासनावर सवालांचा भडिमार
धाराशिव जिल्हा अध्यक्षपदी राजाभाऊ गायकवाड यांची पुनर्नियुक्ती