August 8, 2025

देशात क्रांती घडत आहे – केंद्रीय मंत्री भारती पवार

  • धाराशिव (जिमका) विकसित भारत संकल्प यात्रा आणि केंद्र शासनाच्या लोककल्याणकारी निर्णयामुळे देशातील सर्वसामान्य नागरिकांना दैनंदिन जीवनातील अनेक समस्यांपासून मुक्ती मिळाली आहे. पक्के घर,आयुष्यमान भारत योजनेतील आयुष्यमान कार्ड आरोग्य सुविधा , नळाद्वारे स्वच्छ पाणी यासारख्या सुविधा,तसेच तुळजापूर तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी छोटे व्यवसाय करणाऱ्या व्यावसायिकांना प्रधानमंत्री स्वनिधी योजनेतून कर्ज मिळाल्यामुळे त्यांचे व्यवसाय उभे राहू शकले त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे विकसित भारत संकल्प यात्रेतून लाभार्थी आभार मानत आहेत असे प्रतिपादन केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी तुळजापूर येथे केले.
    विकसित भारत संकल्पयात्रेच्या शहरी भागातील जनजागृती संकल्प रथयात्रेचे उद्घाटन डॉ. पवार यांच्या हस्ते दि.१ जाने २०२३ रोजी तुळजापूर येथे श्री.तुळजाभवानी मातेच्या मंदिरासमोरील प्रवेशद्वाराजवळ झाले. यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी जिल्हाधिकारी डॉ.सचिन ओम्बासे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल गुप्ता, जिल्हा ग्रामीण यंत्रणेच्या प्रकल्प संचालक प्रांजल शिंदे,जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रवींद्र माने,जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सतीश कदम यांच्यासह सर्व विभाग प्रमुख उपस्थित होते.
    या यात्रेच्या उद्घाटनानंतर डॉ. भारती पवार यांनी लाभार्थ्यांशी थेट संवाद साधलाआणि त्यांचे अनुभव स्वतः ऐकून घेतले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्याला पक्के घर दिल्यामुळे हक्काचा निवारा मिळाला, महिला सक्षमीकरणासाठी महिला बचत गटांना कमी व्याजदराने कर्ज उपलब्ध करून दिल्यामुळे महिला आत्मनिर्भर होऊन स्वतःच्या पायावर उभ्या राहिल्या तसेच प्रधानमंत्री स्वनिधी योजनेमुळे तुळजापूर सारख्या तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी छोटे व्यावसायिकांना मोठा हातभार मिळाला , आयुष्यमान कार्ड मिळाल्यामुळे आपले जीवन सुखकर झाल्याच्या भावना लाभार्थ्यांनी यावेळी व्यक्त केल्या.
    यावेळी डॉ. भारती पवार यांनी आशा आरोग्य कर्मचाऱ्यांशी संवाद साधला त्यांच्यामुळे देशातील अनेक नागरिकांना कोरोना प्रतिबंधक लस मिळणे सोपे झालेआणि कोरोना सारख्या जागतिक महा संकटावर भारत सक्षमपणे मात करू शकला त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.
    धाराशिव जिल्ह्यातील आठ नगरपालिकांच्या कार्यक्षेत्रात ही विकसित भारत संकल्प रथयात्रा जाणार असून लाभार्थ्यांची “मेरी जुबानी मेरी कहानी” या उपक्रमांतर्गत अनुभव जनतेपर्यंत पोहोचवले जाणार आहेत, तसेच केंद्र सरकारच्या अनेक लोककल्याणकारी योजनांची माहिती नागरिकांना मिळणार आहे त्यामुळे या संकल्प रथयात्रेत धाराशिव जिल्ह्यातील नागरिकांनी सहभागी व्हावे असे आवाहनही डॉ. पवार यांनी यावेळी केले.
    यावेळी तुळजापूर शहरातील केंद्र सरकारच्या वेगवेगळ्या योजनांचा लाभ मिळालेले लाभार्थी तसेच श्री तुळजाभवानी मातेच्या दर्शनासाठी आलेले नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
error: Content is protected !!