August 8, 2025

बिबट्याच्या दहशतीने जिल्ह्यातील शेतकरी पुन्हा एकदा त्रस्त

  • धाराशिव (जयनारायण दरक) –
    जिल्ह्यात पुन्हा एकदा बिबट्याने धुमाकूळ घालायला सुरुवात केली आहे. बार्शी तालुक्यातील काही गावात बिबट्याने दोन दिवसांपूर्वी जनावरांचा फडशा पाडला होता. त्यानंतर आता धाराशिव जिल्ह्यातील कळंब तालुक्यात चोराखळी भागात बिबट्या आढळून आल्याची माहिती असून, वनविभागाने शेतकऱ्यांना काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.
    शेतकऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार कळंब तालुक्यातील चोराखळी भागात दोन दिवसांपासून बिबट्याचा वावर दिसून येत आहे.एका रेडकाचा बिबट्याने बळी घेतल्याची माहिती शेतकऱ्यांनी वनविभागाला दिली. त्यानंतर वनविभागाने काळजी घेण्याचे आवाहन शेतकऱ्यांना केले असून, पांगरी, उक्कडगाव परिसरात कॅमेरे बसवून बिबट्याचा शोध घेतला जात आहे. गेल्या महिन्यात धाराशिव जिल्ह्यातील भूम तसेच वाशी, तुळजापूर तालुक्यात बिबट्या आढळून आल्याची चर्चा होती. आता पुन्हा एकदा जिल्ह्यात बिबट्या धुमाकूळ घालत असल्याने शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सध्या शेतात रब्बीच्या पिकांना पाणी देण्याची कामे सुरू असून, शेतकऱ्यांना रात्री पिकांना पाणी देण्यासाठी शेतात जावे लागते. मात्र बिबट्याच्या दहशतीने शेतकरी त्रस्त झाले आहेत.
error: Content is protected !!