August 8, 2025

एक दिवशीय जलद ताप सर्वेक्षण व किटकशास्त्रीय सर्वेक्षण मोहीम

  • धाराशिव (जिमाका) – जिल्ह्यात 2023 मध्ये आजतागायत 10 ठिकाणी किटकजन्य आजाराचा उद्रेक झाला आहे. त्या अनुषंगाने संपूर्ण जिल्ह्यातील सर्व गावांमध्ये 27 सप्टेंबर रोजी एक दिवशीय जलद ताप सर्वेक्षण व किटकशास्त्रीय सर्वेक्षण मोहीम राबविण्यात येणार आहे.
    या मोहिमेचे संनियंत्रण जिल्हास्तरावरुन केले जाणार आहे. या मोहिमेचे नोडल अधिकारी म्हणून वैद्यकीय अधीक्षक व तालुका आरोग्य अधिकारी हे काम पाहणार आहेत. जिल्ह्यातील ग्रामीण व शहरी भागामधील गावांमध्ये मोहिमेचे नियोजन करुन 27 सप्टेंबर रोजी राबविण्याची सूचना दिल्या आहेत.
    या कालावधीमध्ये ग्रामीण भागातील प्रत्येक गावांतील 20 घराचे व शहरी भागामध्ये 100 घरांचा किटकशास्त्रीय सर्वे व ताप सर्वे करण्यात येणार आहे. या सर्वेक्षणात वैद्यकीय अधिकारी, सामुदाय आरोग्य अधिकारी, आरबीएसके आरोग्य कर्मचारी गटप्रवर्तक व आशा तसेच तालुका कार्यालयातील आरोग्य सहाय्यक यांच्या सहभागाने सर्वेक्षण करण्यात येणार आहे.
    ज्या भागामध्ये सर्वेक्षणादरम्यान तापाचे रुग्ण व डास अळी वाढ आढळून आलेल्या कार्यक्षेत्रात प्रतिबंधात्मक कार्यवाही जसे की कोरडा दिवस पाळणे, अबेट कार्यवाही करणे व आवश्यकतेनुसार ग्रामपंचायतमार्फत धूर फवारणी करण्याचे नियोजन आहे.
    तसेच नागरिकांना व शाळेतील विद्यार्थ्यांना किटकजन्य आजाराबाबतचे आरोग्य शिक्षण व जनजागृती कार्यक्षेत्रातील आरोग्य कर्मचारी व आशामार्फत करण्यात येणार आहे. तसेच 2 ऑक्टोबर रोजी ग्रामसभेमध्ये सर्व ग्रामस्थांना किटकाचा प्रतिबंध करण्यासाठी गटारी वाहते करणे, टायर व ट्युब, अडगळीचे सामान रिकामे करणे तसेच संडासच्या व्हेंट पाईपला जाळी बसविणे व डासांपासून बचावासाठी रासायनिक क्वाईल व लिक्वीडचा वापर करणे आदी बाबींची माहिती देण्याबाबत सूचना दिल्या आहेत.
    डेंग्यु, चिकुनगुनिया व मलेरिया या आजार पसरविणाऱ्या डासांबाबत तसेच आजाराबाबत मा‍हिती आरोग्य कर्मचारी व आशामार्फत माहिती देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तरी याप्रमाणे कार्यवाही करुन किटकजन्य आजाराचे प्रतिबंध करण्याचे ध्येय मोहिमेच्या माध्यमांतून साध्य करण्यात येणार आहे. असे जिल्हा हिवताप अधिकारी डॉ.मेंढेकर यांनी कळविले आहे.
error: Content is protected !!