कळंब – वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे पक्षीही सुस्वरे आळविती।। येणे सुख रुचे एकांताचा वास। नाही गुणदोष। अंगी येत।। संत तुकाराम महाराज यांनी अशा सुंदर शब्दात निसर्गाशी नाते सांगितले आहे. आपण जर वृक्षारोपण केले, त्यांचे पालनपोषण केले तर ते वृक्ष आपल्याला खूप काही देत असतात. त्यामुळे वृक्ष लागवड करणे ही काळाची गरज समजून याकडे दुर्लक्ष करता येणार नाही. वृक्ष लागवडीची प्रक्रिया सातत्याने अविरत आपल्याला जबाबदारी समजून सुरु ठेवावी लागणार आहे. याचेच भान ठेवून कोठाळवाडी गावातील शिवशंभो गणेश मंडळातील युवकांनी यंदा विद्युत रोषणाई व डीजे सिस्टिम ला फाटा देत गावामधे ४० नारळाचे वृक्ष लागवड करण्याचा उपक्रम राबवला आहे. पर्यावरणाचे संतुलन ही काळाची गरज असून निसर्गाची किमया सर्वांनी समजून घेऊन ‘हरित परिसर,सुंदर परिसर’ ही संकल्पना पूर्णत्वास नेण्यासाठी झाडे लावा,झाडे जगवा. पाणी आडवा,पाणी जिरवा. असा पर्यावरणपूर्वक संदेश या निमित्ताने देण्यात आला. गावामधे प्रथमच असा उपक्रम राबवल्यामुळे ग्रामस्थांकडून शिवशंभो गणेश मंडळातील सर्व युवकांचे कौतुक होत आहे. गावातील प्रमुख रस्त्याच्या दुतर्फा बाजूने गावचे उपसरपंच मा.अनंत लंगडे,शाळेचे मुख्याध्यापक दिनेश आडसुळ,जेष्ठ नागरिक शंकर कोठावळे,परमेश्वर कोठावळे,सैन्यपाल लंगडे,दत्ता कोठावळे, तानाजी कोठावळे यांच्या हस्ते वृक्षारोपणाचा कार्यक्रम अतिशय शिस्तबद्ध आणि एकजुटीने पार पडला. यासाठी शिवशंभो गणेश मंडळाचे अध्यक्ष दिपक कोठावळे,उपाध्यक्ष विशाल कोठावळे,सचिव राम नव्हाट, सहसचिव रोहन कोठावळे,ऋषी लंगडे, पंकज मांडवे, सुरज कोठावळे, प्रेम कोठावळे,समर्थ कोठावळे, अनिकेत कोठावळे,विशाल लंगडे,आशु लंगडे, अशोक गव्हाणे, प्रमोद गोडगे, यश कोठावळे,प्रशांत कोठावळे यांनी कष्ट घेतले.
More Stories
संचालिका सौ.अंजली मोहेकर यांची विद्याभवन प्राथमिक विद्यामंदिरास सदिच्छा भेट
मोहेकर महाविद्यालयात ग्रंथालय शास्त्राच्या राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन
भीमराव दादा सत्यवचनी व्यक्तिमत्व होतं – डॉ. माणिक डिकले