March 12, 2026

रा.गे. शिंदे महाविद्यालयात १३ मार्चला ‘पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा’; १२ आस्थापनांकडून ३१० पदांसाठी मुलाखती

  • परंडा – येथील शिक्षण महर्षी गुरुवर्य रा.गे.शिंदे महाविद्यालयात नोकरी इच्छुक युवक-युवतींसाठी ‘पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा’चे भव्य आयोजन करण्यात आले आहे.हा रोजगार मेळावा शुक्रवार,दि.१३ मार्च २०२६ रोजी महाविद्यालयाच्या परिसरात आयोजित करण्यात आला असून १२ खाजगी आस्थापनांचे प्रतिनिधी उपस्थित राहून ३१० पदांसाठी पात्र उमेदवारांच्या मुलाखती घेणार आहेत.
    महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य, रोजगार,उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या अंतर्गत जिल्हा कौशल्य विकास,रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, धाराशिव आणि शिक्षण महर्षी गुरुवर्य रा.गे.शिंदे महाविद्यालय, परंडा अंतर्गत आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने हा रोजगार मेळावा आयोजित करण्यात आला आहे.
    या मेळाव्यात विविध क्षेत्रातील कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित राहून पात्र व नोकरीस इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेऊन निवड प्रक्रिया पार पाडणार आहेत.त्यामुळे आजी-माजी विद्यार्थी तसेच परिसरातील बेरोजगार युवक-युवतींनी या संधीचा लाभ घेऊन स्वतःच्या पायावर उभे राहावे,असे आवाहन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुनील जाधव यांनी केले आहे.
    मुलाखतीसाठी येताना उमेदवारांनी शैक्षणिक पात्रतेची सर्व प्रमाणपत्रे,अनुभव प्रमाणपत्र, स्वतःचा बायोडाटा तसेच संबंधित कागदपत्रांच्या झेरॉक्स प्रती सोबत आणाव्यात,असे आवाहन संजय गुरव (सहाय्यक आयुक्त, कौशल्य विकास,रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, धाराशिव) तसेच प्राचार्य डॉ. सुनील जाधव यांनी केले आहे.
    रोजगार मेळाव्याबाबत अधिक माहितीसाठी उपप्राचार्य डॉ. महेशकुमार माने (समन्वयक), वाणिज्य विभाग प्रमुख डॉ.अरुण खर्डे तसेच प्रा.डॉ.किरण देशमुख यांच्याशी संपर्क साधावा,असे आवाहनही महाविद्यालयाच्या वतीने करण्यात आले आहे.
error: Content is protected !!