लातूर – लातूर शहर महानगरपालिका होऊ घातलेल्या निवडणुकीत प्रभाग क्रमांक १६ (ड) मधून विनोद श्रीहरी कोल्हे हे अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक रिंगणात उतरले आहेत. प्रभागातील सर्व प्रश्नांची सखोल जाण असलेले कार्यकर्ते म्हणून त्यांची ओळख असून त्यांनी बीएसडब्ल्यू (Bachelor of Social Work) पर्यंत शिक्षण घेतले आहे.त्यामुळे सामाजिक प्रश्न कसे सोडवावेत,याची संपूर्ण जाणीव आपल्याला असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. कोल्हे म्हणाले की,आतापर्यंत निवडून दिलेल्या नगरसेवकांनी आश्वासनांशिवाय नागरिकांना काहीच दिले नाही.निवडणूक आली की आश्वासनांची खैरात केली जाते आणि त्यानंतर पाच वर्षे नगरसेवक ‘मिस्टर इंडिया’प्रमाणे गायब होतात. चित्रपटात अनिल कपूर काही काळासाठी अदृश्य होतो;मात्र आपल्या नगरसेवकांकडे पाच-पाच वर्षे गायब राहण्याची कला असल्याचा टोला त्यांनी लगावला. गेल्या निवडणुकीत निवडून आलेले नगरसेवक कोरोना महामारीच्या काळात पूर्णतः गायब होते.मतदार जिवंत आहेत की नाही,याची साधी विचारपूस करण्यासाठीही कोणी आले नाही. कोरोना ओसरल्यानंतरही प्रभागात फिरून नागरिकांचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न झाला नसल्याचा आरोप कोल्हे यांनी केला. प्रभाग क्रमांक १६ मध्ये पाणीपुरवठा,कचरा,स्वच्छता, आरोग्य,बेरोजगारी,युवकांचे वाढते व्यसन,रस्ते व नाल्यांची दुरवस्था असे अनेक गंभीर प्रश्न असल्याचे त्यांनी सांगितले.विशेषतः कॉईल नगर झोपडपट्टीतील कबाल्याचा प्रश्न, कायमस्वरूपी जागेवर घरे बांधण्याचा प्रश्न प्रलंबित आहे. कॉईल नगरमध्ये मोठी पाण्याची टाकी असूनही नागरिकांना नियमित पाणी मिळत नसल्याची स्थिती आहे.येथील बिल्डिंगमध्येही पाण्याचा प्रश्न तीव्र आहे. याच पाण्याच्या समस्येमुळे गेल्या वर्षी सामाजिक चळवळीत काम करणारा युवक दिलीप नवगिरे हा पाणी येत नसल्याने मोटार बसवण्यासाठी गेला असता विजेचा धक्का लागून त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला.या घटनेनंतरही प्रशासन व लोकप्रतिनिधींनी पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सोडवलेला नाही, अशी खंत कोल्हे यांनी व्यक्त केली.तसेच बिल्डिंग परिसरात मोठ्या प्रमाणावर अस्वच्छता दिसून येत असल्याचेही त्यांनी सांगितले. या सर्व प्रश्नांवर प्रत्यक्ष काम करून प्रभागाचा विकास साधण्याचा निर्धार व्यक्त करत येणाऱ्या १५ तारखेला ‘कॅटली’ या निवडणूक चिन्हासमोरील बटन दाबून मोठ्या मताधिक्याने निवडून द्यावे, असे आवाहन अपक्ष उमेदवार विनोद श्रीहरी कोल्हे यांनी प्रभागातील मतदारांना केले आहे.
More Stories
खरोसा लेणी येथे माघ पौर्णिमा उत्सव उत्साहात साजरा;६५ धम्म अनुयायांचा सहभाग
सिध्देश्वर यात्रा महोत्सवाची गौरवशाली परंपरा वृंध्दिगत करावी – विश्वस्त विक्रम गोजमगुंडे
सरसेनानी नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती साजरी .