February 8, 2026

गुरुच्या मार्गदर्शनातूनच यशाचा प्रवास;ज्ञान प्रसार विद्यालयात डेन्मार्कच्या डॉ.शुभांगी राऊत यांचा प्रेरणादायी संवाद

  • मोहा – मूळच्या येरमाळा येथील व सध्या डेन्मार्क येथे सेवा बजावणाऱ्या डॉ.शुभांगी राऊत यांनी ज्ञान प्रसारक मंडळ येरमाळाचे कर्तव्यदक्ष सचिव डॉ.अशोकराव मोहेकर यांच्या प्रेरणेने व प्राचार्य अविनाश मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली ज्ञान प्रसार माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय,मोहा येथे सदिच्छा भेट देत विद्यार्थ्यांशी प्रेरणादायी संवाद साधला.
    याप्रसंगी त्यांच्यासोबत त्यांचे पती, डेन्मार्क येथे केमिकल इंजिनिअर म्हणून कार्यरत असलेले इंजि. बाळकृष्ण सुरवसे हेही उपस्थित होते.विद्यार्थ्यांशी संवाद साधताना डॉ.शुभांगी राऊत यांनी गुरुचे जीवनातील महत्त्व अधोरेखित करताना सांगितले की,“आपले गुरु आपल्यासाठी सर्व काही असतात. गुरुने दाखवलेल्या मार्गावर प्रामाणिकपणे चाललो तर आयुष्यात निश्चित यश मिळते.” प्राचार्य अविनाश मोरे यांच्यासारखे शिक्षक लाभल्यामुळेच आपण प्रगती करू शकलो व आपले ध्येय गाठू शकलो, अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या.
    डॉ.शुभांगी राऊत यांचे माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण ज्ञान प्रसारक मंडळाच्या येरमाळा येथील ज्ञानोद्योग विद्यालयात झाले आहे. शालेय जीवनातील आठवणी सांगताना त्यांनी त्या काळात झालेल्या संस्कारांची जडणघडण आजही जीवनात उपयोगी पडत असल्याचे सांगितले. तसेच त्यांच्या पती इंजि. बाळकृष्ण सुरवसे यांनी डेन्मार्कसह भारताबाहेरील शिक्षण व करिअरच्या विविध संधींबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. डेन्मार्कमधील जीवनशैली, शिक्षण पद्धती व कार्यसंस्कृती याबाबतही त्यांनी सविस्तर माहिती दिली.
    कार्यक्रमाच्या समारोपप्रसंगी मुख्याध्यापक तथा प्राचार्य अविनाश मोरे यांनी डॉ.शुभांगी राऊत यांच्या शैक्षणिक जीवनातील आठवणी सांगून विद्यार्थ्यांनी अशा आदर्शातून प्रेरणा घेऊन आतापासूनच आपल्या ध्येयावर लक्ष केंद्रित करावे, असे आवाहन केले. विद्यार्थी यशस्वी होणे हे शिक्षकांसाठी अभिमानाची बाब असल्याचेही त्यांनी नमूद केले.
    याप्रसंगी प्राचार्य अविनाश मोरे यांच्या हस्ते डॉ.शुभांगी राऊत व त्यांचे पती इंजि.बाळकृष्ण सुरवसे यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शेखर गिरी यांनी केले तर राहुल भिसे यांनी उपस्थितांचे आभार मानले.
error: Content is protected !!