कळंब – उन्हा-पावसात,थंडीमध्ये अथक परिश्रम करून काळ्या आईची सेवा करणारा शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे.अशा शेतकऱ्यांचे ऋण व्यक्त करण्यासाठी दरवर्षी २३ डिसेंबर रोजी देशाचे पाचवे पंतप्रधान व शेतकरी नेते स्व. चौधरी चरणसिंग यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय शेतकरी दिन साजरा केला जातो. या दिनाचे औचित्य साधून कळंब येथील सामाजिक कार्यकर्ते व ज्येष्ठ नागरिकांनी पिंपळगाव (डोळा) शिवारातील शेतामध्ये प्रत्यक्ष शेतीकामात व्यस्त असलेले शेतकरी पांडुरंग आंबीरकर यांचा शेतातच जाऊन सत्कार केला.पिकाची डुबणी करत असताना ज्येष्ठ नागरिक महासंघाचे जिल्हाध्यक्ष महादेव महाराज अडसूळ यांच्या हस्ते शाल, श्रीफळ व पुष्पहार देऊन त्यांच्या सेवाभावी शेती कार्याचा गौरव करण्यात आला. याप्रसंगी धाराशिव जिल्हा मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष सुरेश टेकाळे,ज्येष्ठ नागरिक माधवसिंग राजपूत,अच्युत उर्फ बाबुराव पौळ, सुनील लाटे,शेतकरी श्रीकांत आंबीरकर,गणेश हाजगुडे,भाग्यश्री हाजगुडे,कविता पाटील,गोपाळ हाजगुडे आदी मान्यवर उपस्थित होते.शेतकऱ्यांच्या कष्टाला मिळालेल्या या सन्मानामुळे परिसरात समाधान व्यक्त करण्यात आले.
More Stories
“जिल्हा परिषद निवडणुकीत मंगरूळ गटाचा अजेंडा:विकास की फक्त राजकारण?”
“स्वप्नातील घर” साकारले : पिंपळगाव (डोळा) येथे सदघर योजनेअंतर्गत सुभाष घोडके यांच्या घराचा भव्य शुभारंभ
पिंपळगावच्या कन्यांचा लौकिक राज्यभर;शाळेत उत्साहात सत्कार