नांदेड (अंकुश पवाडे) – राज्यभर खळबळ उडवून देणाऱ्या सक्षम ताटे खून प्रकरणाला नवे वळण मिळाले असून,पोलिसांवरही गंभीर आरोपांची छाया पडली आहे.संशयित आरोपी अटकेत असतानाही दोषी पोलिसांवर कारवाई न झाल्याच्या निषेधार्थ आचल मामीडवार आणि सक्षमची आई यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अंगावर ज्वलनशील पदार्थ ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला.मात्र, उपस्थित पोलिसांनी आणि कर्मचाऱ्यांनी वेळेत हस्तक्षेप करून दोघींना रोखले. २७ नोव्हेंबर रोजी जुनागंज भागात सक्षम ताटेची निर्घृण हत्या झाली होती.आंतरजातीय प्रेमसंबंधातून ही हत्या झाल्याचा आरोप असून, मुख्य आरोपी अटकेत आहेत. मात्र,आचलने इतवारा पोलीस ठाण्यातील दोन कर्मचाऱ्यांनी तिच्या अल्पवयीन भावाला हत्येसाठी चिथावणी दिल्याचा गंभीर आरोप केल्याने संताप उसळला आहे. यापूर्वीही जिल्हाधिकारी,पोलीस अधीक्षक व विशेष पोलिस महानिरीक्षकांकडे निवेदने देऊन कारवाईची मागणी करण्यात आली होती.परंतु अद्यापही कारवाई न झाल्याने अखेर दोघींनी हा आक्रमक पवित्रा घेतला. “दोषी पोलिसांवर तात्काळ कारवाई न केल्यास पुन्हा आत्मदहनाचा प्रयत्न करू,” असा इशाराही त्यांनी दिला आहे. या प्रकरणावर वरिष्ठ पोलिस अधिकारी कोणती पावले उचलतात,याकडे राज्याचे लक्ष लागले आहे.
More Stories
प्रवीण बागडे यांना ‘प्रबुद्ध साहित्यरत्न’ पुरस्कार – समाजाभिमुख लेखणीचा गौरव
नांदेड- मुंबई ‘वंदे भारत एक्सप्रेस’ ने उघडले मराठवाड्याच्या समृद्धीचे द्वार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
कळंबच्या डॉ.संपदा रणदिवे यांना बीएएमएस पदवी;नांदेड जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते सन्मान