February 8, 2026

प्रवीण बागडे यांना ‘प्रबुद्ध साहित्यरत्न’ पुरस्कार – समाजाभिमुख लेखणीचा गौरव

  • नांदेड (अंकुश पोवाडे ) – साहित्य हे केवळ भावनांचे चित्रण नसते,तर समाजाला दिशा देणारे,विचारांना चालना देणारे आणि अन्यायाविरुद्ध आवाज उठवणारे सामर्थ्यवान साधन असते.या सामाजिक जबाबदारीची जाणीव ठेवून गेल्या अनेक वर्षांपासून सातत्याने लेखन करणारे साहित्यिक प्रवीण बागडे यांना यंदाचा ‘प्रबुद्ध साहित्यरत्न पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. हा सन्मान नांदेड येथे झालेल्या दैनिक प्रबुध्द परिवाराच्या १६ व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित सन्मान सोहळ्यात देण्यात आला.
    बागडे यांच्या लेखनात केवळ भाषेची समृद्धी दिसून येत नाही, तर त्यांच्या प्रत्येक लेखात समाजातील वेदना,संघर्ष आणि परिवर्तनाची आर्त हाक ऐकू येते. जात,धर्म,वर्ण यांच्या पलीकडे जाऊन समानतेचा विचार, उपेक्षितांना न्याय मिळवून देण्याची तळमळ,तसेच तरुण पिढीला जागृत करणारे विचार हे त्यांच्या लेखनाचे वैशिष्ट्य आहे.त्यामुळेच त्यांचे लेखन आजच्या काळात अधिक परिणामकारक ठरत आहे.
    आजच्या धावपळीच्या,
    बाजारपेठेच्या आणि स्वार्थाच्या साहित्य प्रवाहातही प्रवीण बागडे यांसारखे साहित्यिक समाजहिताची ज्योत जिवंत ठेवतात, हीच खरी साहित्यिक परंपरेची ताकद आहे.त्यांची लेखणी हा केवळ शब्दांचा खेळ नाही,तर वाचकांच्या मनात परिवर्तनाची ठिणगी पेटवणारा दीपस्तंभ आहे.
    ‘प्रबुद्ध साहित्यरत्न’पुरस्काराने प्रवीण बागडे यांच्या लेखनाचा गौरव झाला तर समाजपरिवर्तनासाठी कार्यरत असलेल्या सर्व लेखकांना नवी ऊर्जा आणि प्रेरणा मिळाली आहे.
    पुरस्कार स्वीकारताना प्रवीण बागडे यांनी भावना व्यक्त करताना म्हटले:”हा पुरस्कार माझ्यासाठी केवळ सन्मान नाही,तर जबाबदारी आहे.लेखणी ही वैयक्तिक अभिव्यक्तीची साधने नाही,ती समाजातील आवाज दाबल्या गेलेल्या लोकांचे प्रतिनिधित्व करणारी ताकद आहे.या ताकदीचा उपयोग परिवर्तनासाठी करण्याचा प्रयत्न पुढेही सुरू राहील.”
    कार्यक्रमाला अनेक नामवंत साहित्यिक,सामाजिक कार्यकर्ते, विद्यार्थी आणि रसिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.टाळ्यांच्या गजरात प्रवीण बागडे यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला. उपस्थितांनी हा सन्मान केवळ एका साहित्यकाराचा नाही,तर संपूर्ण समाजाभिमुख लेखनाचा असल्याची भावना व्यक्त केली.
    याव्यतिरिक्त,कार्यक्रमात विशेषांकाचे प्रकाशन करण्यात आले आणि विविध साहित्यिक, पत्रकार व सामाजिक कार्यकर्त्यांचे सन्मान करण्यात आले.उद्घाटन भदंत शिलरत्न यांच्या हस्ते झाले तर प्रमुख पाहुणे म्हणून जिल्ह्याचे पोलीस अधिक्षक अविनाश कुमार आणि निवासी उपजिल्हाधिकारी किरण अंबेकर उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन दैनिक प्रबुध्द परिवार वृत्तपत्राचे मुख्य संपादक व ऑल इंडिया संपादक संघ, मराठवाडा चे अध्यक्ष संजय खाडे यांनी केले आणि आभार प्रदर्शन उपसंपादक गौतम कदम यांनी केले.
error: Content is protected !!