धाराशिव – धाराशिव जिल्ह्यातील परंडा व भूम तालुक्यातील अतिवृष्टीग्रस्त भागांचा शिवसेना मुख्य नेते आणि उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी दौरा करून शेतकरी व ग्रामस्थांना दिलासा दिला. यावेळी त्यांनी थेट शेतकऱ्यांच्या बांधावर तसेच घरांमध्ये जाऊन परिस्थितीची पाहणी केली आणि लोकांच्या व्यथा जाणून घेतल्या. भूम तालुक्यातील साडेसांगवी गावातील बाणगंगा नदीला आलेल्या पुरामुळे अनेक वाड्या–वस्त्यांचे मोठे नुकसान झाले. घरे चिखलाने भरून गेली असून उभ्या पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. ग्रामस्थांशी संवाद साधताना शिंदे म्हणाले, “सरकार तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे. सरकारी निकष बाजूला ठेवून शेतकऱ्यांना योग्य नुकसान भरपाई दिली जाईल.” यावेळी शिवसेनेच्या वतीने पूरग्रस्तांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटपही करण्यात आले. ग्रामस्थांनी बाणगंगा व रामगंगा नदीवर पूल बांधण्याची, घर व शेतीचे तातडीने पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी केली. यावर तत्काळ प्रतिसाद देत शिंदे यांनी बांधकाम विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी दूरध्वनीवरून संपर्क साधून आवश्यक कार्यवाहीचे आदेश दिले. या दौऱ्यात परिवहन मंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री प्रताप सरनाईक,आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर,माजी आमदार ज्ञानराज चौगुले,जिल्हाधिकारी कीर्ती पुजार,मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.मैनाक घोष,पोलीस अधीक्षक रितू खोखर,अधीक्षक कृषी अधिकारी महादेव आसलकर तसेच जलसंपदा,कृषी,पाटबंधारे व आरोग्य विभागाचे अधिकारी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. या भेटीतून राज्य सरकार शेतकऱ्यांच्या संकट काळात त्यांच्या सोबत खंबीरपणे उभे राहणार असल्याचा ठाम संदेश मिळाला.
More Stories
सख्ख्या भावांची कमाल! महाराष्ट्र केसरी 2026 मध्ये रा.गे.शिंदे महाविद्यालयाचा झेंडा उंचावला
जिल्हा परिषद सदस्य दयानंद ढाले यांचा क्रांती अकॅडमीकडून जंगी सत्कार;विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी संदेश
रोजगार मेळावा विद्यार्थ्यांसाठी नवी संधी,नवी स्वप्ने आणि उज्ज्वल भविष्य घडवणारा – डॉ. सतीश कदम