August 8, 2025

” दडपलेलं जीणं ” हा साहित्य क्षेत्रात भर घालणारा कथासंग्रह…

  • दलित समाजातील व्यक्तीवर होणारा अन्याय, त्यांच्या समस्या सडेतोडपणे मांडणारे लेखक म्हणजे रमेश बोर्डेकर होय. ‘दडपलेले जीणं ‘ हा दलित समाजाच्या होणाऱ्या अवहेलना, त्यांना जगताना होणारा त्रास, सामान्य माणसाच्या वेदना, यातना अगदी त्यांच्याच भाषेत एकदम साध्यासोप्या भाषेत मांडलेल्या आहेत.
  • लेखक रमेश बोर्डेकर यांना शालेय जीवनात त्यांच्या शिक्षकीपेशात आलेले अनुभव, व्यवसायातील आलेले अनुभव मांडलेले आहे. जात, धर्म, गरिबी, माणुसकी , अपमान, संघर्ष, स्वाभिमानाला लागणारी ठेच या सर्व गोष्टींचा मागोवा दडपलेलं जीणं..या कथासंग्रहात आपल्याला वाचायला मिळतो.
    लेखक रमेश बोर्डेकर हे दलित चळवळीतील व दलित साहित्यातील एक महत्त्वाचे लेखक म्हणून त्यांची ओळख आहे.
    या कथासंग्रहातील बऱ्याच कथा विविध वर्तमानपत्रातून व दिवाळी अंकातून तसेच अनेक मासिकातून प्रकाशित झालेल्या आहेत.
    दडपलेलं जीणं या कथासंग्रहात सुरुवातीलाच ‘ रूपा ‘ नावाची कथा एका वेश्याव्यवसाय करणाऱ्या स्त्रीची भावना’ तिला होणाऱ्या यातना, त्यांनी काळजाला भिडणारी अशी मांडणी केलेली आहे, तसेच डोस्क चक्रावून गेलतं या कथेतील इंद्रामाय नावाची स्त्री, गावातल्या प्रत्येक व्यक्तीला मदतीसाठी धावून जाते. सगळ्यांची काम करते तसेच बडबड ही करणारी स्त्री. भीम जयंती सारख्या कार्यक्रमाला मात्र मदत करते. अशा या इंद्रामायचा प्रवास,तिथे व्यक्तिमत्व या कथेत लेखक रमेश बोर्डेकर सुंदर पध्दतीने मांडतात.
  • तसेच दडपलेलं जीणं… या कथेत लेखकाला किती अपमान, त्रास सहन करावा लागतो. त्यावेळी होणारी मनाची घालमेल ते मांडतात. या समाजामध्ये होत असलेल्या घटकावर अन्याय, अत्याचार यांचं सविस्तर वर्णन या कथेत आपल्याला वाचायला मिळतं.
    तसंच तू वाघीण हायीस वाघीण या कथेबरोबरच. बोकड…. नावाची कथा त्यांनी देवी देवतांसाठीचे जागरण गोंधळात कशा पद्धतीने बोकडाचा बळी दिला जातो तसेच निवडणूक जवळ आल्यानंतर कसं बोकड कापलं जातं. तसेच या बोकडाच्या कार्यक्रमाला ढवारा म्हणतात. त्यासाठी सगळे कसे नियोजन केलं जातं. त्या ठिकाणी जेवण्याची पद्धत व कशी काही व्यक्तींची अवहेलना केली जाते. याचाही लेखाजोखा त्यांनी त्यांच्या बोकड कथेमध्ये अनोख्या पध्दतीने मांडलेला दिसून येतो.
  • तसेच शेतकऱ्यांना होणारा त्रास त्यांच्या जीवनातील कष्ट, लेखक रमेश बोर्डेकर अगदी बारीक बारीक गोष्टीसह ‘ मुंगसं ‘ या कथेमध्ये मांडतात. बैलाच्या तोंडाला बांधलेलं मुंगसं असतं आणि ते मुंगसं हिरवगार आलेलं धान बैलांनी खाऊ नये. खराब करू नये म्हणून त्याच्या तोंडाला बांधलेलं असतं, याचं सविस्तर वर्णन त्यांनी या मुंगसं या कथेत ग्रामीण भागात बोलली जाणारी गावरान भाषा त्या भाषेतील ठेवणीतले शब्द ते मांडायला विसरत नाहीत.
  • दडपलेलं जीणं या कथासंग्रहात एकूण अकरा कथांचा समावेश त्यांनी केलेला आहे. या पुस्तकासाठी डॉ. सारीपुत्र तुपेरे यांची प्रस्तावना आपल्याला वाचायला मिळते. तसेच या पुस्तकाची पाठराखण ज्येष्ठ ग्रामीण कथाकार, साहित्यिक भास्कर चंदनशिव यांनी केलेली आहे. या पुस्तकाचे प्रकाशन थिंक टँक पब्लिकेशन्स सोलापूर यांनी केलेले असून पुस्तकाचे मुखपृष्ठ अजित अभंग यांनी सुंदर पद्धतीने केलेले दिसते.
    दडपलेला जीणं.. या पुस्तकात दलितच नव्हे तर सर्वच वाचकांना हे पुस्तक विचार करायला लावणारे व परिवर्तन घडवून आणणारे आणि प्रेरणा देणारे ठरणार आहे. त्यासाठी प्रत्येकाने हे पुस्तक आवर्जून वाचावे.
  • पुस्तक परीचय
    आश्रुबा कोठावळे
    कळंब जि.धाराशिव
    मो.९४०३३९१७३४
  • पुस्तकाचे नाव –
    ‘दडपलेलं जीणं ‘ (कथासंग्रह)
    लेखक – रमेश बोर्डेकर
    प्रकाशन- थिंक टँक पब्लिकेशन्स सोलापूर
    किंमत -१००/-
    मो.९६६५६४४६९३
error: Content is protected !!