August 8, 2025

कुमारांची मने फुलविणारा मळा-सृजन’

  • जीवन मार्गातील वय वर्षे 12 ते 18 चा टप्पा,म्हणजे एक महत्त्वपूर्ण वळण,थोडे नाजूक – थोडे कठीण. आपण आता मोठ्ठे झालो ही भावावस्था मनाला आवडणारीही आणि तितकीच गोंधळात टाकणारीही! आपल्याला आता सगळंच कळू लागलंयं,असं भासवून, रोज नव्या प्रश्नात टाकणारी. आकाशाला गवसणी घालण्याचे आव्हान स्विकारणारी मनोवस्था, पण रोजच्या प्रश्नात मात्र अडखळणारी…
  • अशाच या मनोवस्थेत कुणीतरी मित्र-मैत्रीण भेटावे, जे सांगतील समजावून,आपल्याला,आपल्याच या वयातील मनाला.तना- मनामध्ये होणारे बदल,बदल समाजातील, आव्हाने पैशाचीही आणि करियरीमधीलही!तर जीवन बहरून जाईल.
  • वयाच्या या वळणाला न घाबरता, बदलांचा आनंदाने स्वीकार करुन, नवीन आव्हानांना तोंड द्यायला मने फुलतील.अशीच मने फुलण्याचा अनुभव घेतला याच वयोगटातील मुला-मुलींनी *’सृजन-२’* शिबिरात.
  • *’श्री.रुद्र वेलफेअर फाउंडेशन’,नागपूर* आणि *’मानवता* *सेवा संस्था’,* तालखेडा,ता.मुक्ताईनगर,जि.जळगावया दोन्ही संस्थांचा संयुक्त उपक्रम म्हणजेच *’सृजन’*
    ‘ग्रामीण भागातील क्षमतासंपन्न, होतकरू व गरजू कुमारवयीन मुला-मुलींना अर्थपूर्ण तारुण्याकडे घेऊन जाण्यासाठी समृद्ध अनुभव व संधींची रचना करणारा नियोजनबद्ध कृती कार्यक्रम म्हणजेच *’सृजन’.* 13 ते 18 या वयोगटातील मुला- मुलींसाठी हे पाच दिवसीय निवासी शिबीर ‘मानवता फार्म’ तालखेडा येथे आयोजित केले होते.
  • जळगाव,जालना,बुलढाणा,ठाणे,पुणे या जिल्ह्यांतील 75 कुमारवयीन मुलगे व मुली यामध्ये सहभागी झाले होते. निम्म्या मुली-निम्मे मुलगे. यातील बहुतांश जण पालकांना सोडून पहिल्यांदाच कुठे तरी जाणारे. शिबिरात भाग घेण्याचा हा पहिलाच अनुभव. त्यामुळे सुरुवातीला थोडे लाजरे-बुजरे वाटणारे. काहींनी शिबिराबद्दल आधीही ऐकले असल्याने,आशादायक उत्सुकता त्यांच्या डोळ्यात चमकत होती.
  • शिबिरात शिकवायला नव्हते कुणीच सर- मँडम;पण होते ताई- दादा. ते म्हटले तर वयोगट 25 ते 60 च्या आसपासच्या घरातले.पण,मुलांमध्ये मुलं होऊन मिसळणारे.हसत खेळत शिकवणारे. केवळ आम्ही सांगू तेच ऐका,असा हेका न ठेवता, मुलांना तुम्ही बोला,तुम्ही व्यक्त व्हा म्हणून प्रोत्साहन देणारे,त्यांना बोलते करणारे.
  • जीवनात वय 11-12 नंतर येणारा टप्पा आणि त्यामध्ये होणारे शरीर- मनातील बदल हे खूप महत्त्वाचे. एकीकडे मनाला सुखावणारेही;पण नीट समजावून नाही घेतले तर गोंधळात टाकणारेही. पण, याच विषयावर बाहुलीच्या माध्यमातून अत्यंत सुंदररितीने माहिती कशी देता येते,याचा आदर्श परिपाठच अलका पावनगडकर यांनी मुलांसमोर ठेवला. शास्त्रीय माहिती देतानाच,मनालाही कसे हळुवारपणे समजून घ्यायचे, हे ही युवांना हसत खेळत शिकता आले.
  • स्वच्छता,श्रमकार्य हे केवळ अंगमेहनतीचे रटाळ काम न राहता, त्याला सौंदर्याचे कोंदण कसे द्यायचे, हे ही युवा येथे शिकले. रांगोळी ही पारंपरिक कला. बहुतांश घरात रोज काढली जाणारी. पण, हीच रांगोळी विचारांचे माध्यम म्हणून प्रकटली तेव्हा मुलांच्या सर्जनशीलतेला नवे अंकुर फुटू लागले. ‘मी’, ‘आपण’,कुटुंब,शिक्षण,पर्यावरण,
    सृजन आदी विषय रेखाटताना कुणी वारली चित्रातून व्यक्त झाले, तर कुणी तिथेच आजूबाजूला उगीचच पडून राहिलेल्या दगडांना कलात्मक रचून, त्यांनाही सुंदर केले आणि आपल्या मनालाही. चप्पल – बुटही रांगोळीत सहभागी झाल्यावर, त्यांनाही एक सुंदर अर्थ मिळाला.
    प्रशांत ढेंगे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मुले आपली मने जमीनीवर उतरवत होती, वेगवेगळ्या रंगांतून…
  • शिबिरात युवांचा दिवस सुरू व्हायचा तो भल्या पहाटे चारला. प्रार्थना,योगासने,आनापान,ध्यान यांनी दिवसाची सुंदर सुरूवात व्हायची.मुले उत्साहात असायची.संध्याकाळी मनोगत मांडताना मुले सांगायची, घरी आम्ही कधीच इतक्या पहाटे उठलो नाही. त्यामुळे आधी आम्हालाही शंका होती,आम्ही एवढ्या पहाटे कसे उठणार. पण, इथे सगळ्यांबरोबर आम्हांला लवकर उठण्याची सवय कधी लागली,हे आम्हांलाही नाही कळले…..
    एका अर्थाने आयोजकांच्या पाठीवर ही शाब्बासकीची थाप असते,कारण हेच तर उद्देश असते ना शिबिराचे…. मुलांनी अनुभवातून शिकावे, स्वतःला ओळखावे,वाढवावे,अगदी कळत- नकळतं….
  • वाचन- लेखन हाही तसा गंभीर विषय.पण, तोही हसत- खेळत शिकता येतो, याचा अनुभव ही कुमारांनी घेतला.डायरी लिहीण्यासाठी जेव्हा त्यांना विशेष वेळ मिळू लागला तेव्हा भावनांना शब्दांची वाट मिळाली आणि मनं मोकळी होऊ लागली.
  • अशाच भावना मोकळ्या झाल्या पत्रलेखनातून. स्वतःला,कुटुंबियांना व ‘सृजन टीम’ ला लिहिलेल्या पत्रातून प्रेम,आदर व्यक्त झालाच,पण मनात दडलेली खदखद,काही असहमतीचे मुद्दे,काहीजणांची काही कारणांनी होणारी चिडचिड,राग यांनाही मनातून बाहेर पडण्याचा मार्ग मिळाला,हे ही मुलांनी मनमोकळेपणे हसत-खेळत नंतर झालेल्या मनोगतात सांगितले.
  • अर्थशास्त्र हा विषय किती गंभीर आणि बोजड वाटणारा.पण,पैसा मात्र बहुतांशांना हवाहवासा वाटणारा आणि गरजेचाही.याच पैशाविषयी जेव्हा मुलांना म्हणी- सुविचारापासुन नियोजनापर्यंतची माहिती सोप्या पध्दतीने मिळाली तेव्हा हाही विषय सहज झाला.कुठून कुठून मिळवलेल्या माहिती वरून शेअरमार्केट बद्दलही कुमार बोलू लागली.अर्थशास्राविषयीच्या पुस्तकांविषयी माहिती विचारू लागली.एकाने तर त्याच्या या विषयावरील जिज्ञासेमुळे माहिती देणाऱ्या श्यामकांत दादांकडून पुस्तकही जिंकले.
    असाच एक विषय म्हणजे मार्केटिंग- जाहिराती.आपल्याला स्वस्त वाटणाऱ्या 5 रूपयांच्या खाऊच्या पँकेटमुळे आपण आपलेच आर्थिक आणि आरोग्य दृष्टीनेही कसे नुकसान करून घेतो, हे शशिकांत दादा यांनी केलेल्या मार्गदर्शनामुळे युवांच्या लक्षात आले.या विषयावर युवा अंतर्मुख झाले.
  • शिक्षण म्हणजे नक्की काय?अक्षर सुंदर कसे काढावे?याचेही धडे युवांनी आनंदाने गिरवले.याबद्दल अनुक्रमे शैलेश पाटील व योगेश जवंजाळ यांनी त्यांना मार्गदर्शन केले.
    मंगेशदादा आणि प्रविण दादा यांची गाणी आणि छोट्या छोट्या अँक्टिव्हिटी कुमारांमध्ये नवा जोष निर्माण करत.हसत-हसत मुरकट वळणे या म्हणीचा प्रत्यक्ष अनुभव कुमार यात घेत होते.
  • स्त्री-पुरुष समानता हा विषय समाजात पेरायला अनेक शतके लागली आहेत.अजूनही हे काम बहुतांश भागात पोहचायचे आहे. पण,मुलांनी हा विषय पाच दिवसांतच मनापासून आत्मसात केला.सर्व कामे सर्वांनी सर्जनशील पद्धतीने केली.
  • मनोगतात मुली सांगत होत्या, आत्तापर्यंत आम्ही कधीच मुलांशी बोललो नाही,पण इथे आम्ही केवळ बोललो नाही तर बरोबर नाटयीकरण केले,खेळलो.
  • मुलींचा हा विश्वास आयोजकांना नक्कीच सुखावणारा असेल,कारण या वयात मुला-मुलींचे नाते नीट समजावून नाही घेतले तर त्याला अनिष्ठ वळण लागू शकते. परस्परांविषयी भीती किंवा एकतर्फी स्वप्नरंजन असे टोकाचे स्वभाव होऊ शकतात.पण,आपण सारेच माणूस आहोत आणि मैत्र ही निखळ भावना आहे, हे खुप सहजतेने मुलांच्या मनावर बिंबल्याचे त्यांच्या वागण्या- बोलण्यातून,वावरण्यातील सहजतेतून,गायन- नृत्यातुन दिसत होते.ते एकमेकांना सहज प्रोत्साहन देत होते.एखादा उभे राहून बोलण्यास घाबरतं असेल तर मित्र- मैत्रिणी त्याला बोलायला प्रोत्साहन देते होते. ‘एकदा बोलं रे…मग,नाही राहत भीती!’ असे एकमेकांना सांगताना दिसतं होती. टाळ्यांच्या कडकडाटात त्यांचा उत्साह दुणावत़ं होते.
    पाच दिवसांपूर्वी एकमेंकाची ओळखही नसणारे जीव मैत्रीच्या गोफाने एकमेंकात गुंफत होते.
  • शिबिरातील आनंदाचे दोन कळससाध्य म्हणजे आदिवासी पाड्यांना भेट देऊन नंतर केलेली वनभ्रमंती, वनराई बांधारा उभारणी आणि रात्री सादर होणारी गाणी,नृत्य, छोट्या नाटिका.
    आदिवासींना भेट म्हणून देण्यासाठी विद्यार्थ्यांनी घरून चिवडा व इतर पदार्थ करून आणले होते. ते घेऊन जाताना,मुले खुश होती.पाड्यावर गेल्यावर मुलांनी अत्यंत बारकाईने त्यांची घरे बघितली.आदिवासी त्यांना वेगवेगळ्या गोष्टी सांगत होते, ते समजावून सांगत होते,शिबीरार्थी जाणून घेत होते.कमी गरजा असणारे जीवन किती आंनदी व सादगीपूर्ण असते हे त्यांनी जवळून बघितले.
  • एक छोटेसे जाळे घराबाहेर लटकावलेले होते.मुल़ांची नजर गेल्यावर,सहज प्रश्न विचारले गेले. त्यावर तिथल्या आदिवासी कुटुंब प्रमुखानेही लगेच या जाळीने मासे कसे पकडतातं, याचे प्रात्यक्षिकचं दाखविले.धान्य साठवणीचे मोठ्ठे भांडे, प्रचंड मोठ्ठे ढोलं,माती-शेणाने सावरून स्वच्छ- तुकतुकीत केलेली मातीची घरे हे पाहून अनेक मुले आश्चर्यचकीत झाली.
    आदिवासींमध्ये मुलगा-मुलगी परस्पर संमंतीने लग्न करतात,हुंडा मुलीकडचे नव्हे तर मुलाकडचे देतात,अशी बरीच माहिती ऐकून मुले अवाक झालेली दिसली.
  • पण,त्याचबरोबर त्यांनी मुलींना शिकवले पाहिजे,व्यसनांच्या आहारी जाऊ नये, हे ही तळमळीने सांगत होती.अंधश्रद्धेला बळी पडू नका,हे सांगणारी नाटिका ही शिबीरार्थ्यांनी स्वतः बनवून सादर केली.सहज चालता बोलता वैचारिक देवाण घेवाण होत होती.
  • त्यानंतर मुले गेली ती जंगल भेटीला. सातपुड्याच्या डोंगररांगांनी जणु निसर्गतःच द्रोण करावा आणि त्यात पाणी साठावे असे जोंधनखेडा येथे तयार झालेले तळे.त्याला गोरक्षगंगा या नदीचे पाणी.पावसाळ्यात धबधब्याचे पाणी येऊन तयार झालेले हे सुंदर तळे.एका छोट्या टेकडीवरून पाहताना तिथेच थांबावे अशी भुरळ घालणारा परिसर.थोडावेळ त्या जागेचा आनंद घेऊन, सगळे जंगलातील अधिक आतल्या भागात शिरले.
    अनेक झाडे न्याहळता न्याहळता समोर आला तो प्रचंड वडवृक्ष.चहु बाजूंनी प्रचंड विस्तारलेला तो वृक्ष अधिक विस्तारण्यासाठी, पुन्हा मातीत रूजण्यासाठी पारंब्या बनून जमीनीकडे झेपावत होता.
  • पहिल्या दृष्टीतच वेड लावणारा तो वटवृक्ष पाहिल्यावर मुले त्याकडे झेपावले नसते तरच नवल.
  • कारण या शिबिरात हे करू नका, ते करु नका हे सांगण्यापेक्षा हे करून बघा,ते करून बघा,पण त्याचबरोबर कसे करालं, काय काळजी घ्याल हे ही शिबीरार्थ्यांना सांगितले जात होते. त्यामुळे पारंब्यांना लटकण्याचा आनंद मुलांनी मनसोक्तपणे घेतला.पण, अति आनंदाच्या भरात झाडावर चढू पाहणाऱ्यांना तसे करू नका, हे सांगताच, एका सुचनेतचं त्याचे तंतोतंत पालन झाले.
  • अशीच खबरदारी कचरा टाकताना दिसली.नाष्ट्यासाठी दिलेल्या कागदी प्लेट व्यवस्थितपणे एके ठिकाणी ग़ोळा झाल्या आणि केळीच्या साली एका ठिकाणी.एवढेच नव्हे तर आजुबाजुला पडलेला कचराही मुलांनी स्वखुशीने उचलला.
  • तिथेच वाहणाऱ्या गोरक्षगंगा नदीच्या धारेत मंजितभाई यांच्या मार्गदर्शनाखाली मुलांनी एक छोटा वनराई बंधारा बांधला.पोत्यात वाळू व माती भरणे,ती पोती शिवणे,नदीच्या धारेत व्यवस्थित रचणे ही कामे शिबीरार्थ्यांनी गटागटाने,शिस्तबध्द पद्धतीने केली.
    श्रमकार्याचे महत्त्व मुलांच्या मनावर बिंबत होतेच,पण आपल्या या कामामुळे पुढील काही महिने तरी पाणी अडून राहिल आणि अनेक जिवांना पाणी मिळेल याचा आनंद मुले शब्दातून व्यक्त करत होती. दगड रचता रचता, त्या पात्रात दिसणारे प्लास्टिकही मुलांचे हात आपसुकच उचलत होते.
  • शिबिरापासून थोड्या दूरवर असलेल्या पाड्यांना व जंगलाला भेट द्यायला युवा गेले ते ट्रॅक्टर व गाड्यांमधून. जाताना मुले ट्रॅक्टरमध्ये.त्यामुळे मनसोक्त धुमाकूळ.मोठ्या आवाजात घोषणा निनादल्या.परत निघताना एक मुलगाच म्हणाला,’आपण स्त्री-पुरुष समानता म्हणतो ना,मग मुलींनाही ट्रॅक्टरमधुन जायची संधी मिळाली पाहिजे.
  • मुलींनीही तितक्याच उत्साहात या सुचनेला प्रतिसाद दिला आणि विनाविलंब आयोजकांनीही होकार भरला.
  • मग, मुलींनीही ही संधी सोडली नाही. ट्रॅक्टरमधुन परतताना रानोमाळ त्यांच्या गीतांच्या गुंजनाने भरून गेला. अनेकींना जणु पहिल्यांदाच कंठ फुटला होता. समुहात मुक्तपणे गाण्याचा आनंद घेण्यात त्या रंगून गेल्या.
  • जवळपास गांव किंवा पाडा आला की गाणी आपसुक बंद होत आणि त्याची जागा छान छान घोषणा घेत. ‘जल,जंगल,जमीन किसकी हैं, हमारी है हमारी हैं।’ ‘हाथ लगे सृजन में, नही मारने, नही मांगने।’ आदी घोषणा ऐकून गावकरीही मुलींकडे कौतुकाने, उत्सुकतेने बघत.
  • शिबीरार्थ्यांसाठी उच्च आनंदाचा आणखी एक कार्यक्रम असायचा तो म्हणजे सायंकाळी होणारा सांस्कृतिक कार्यक्रम.यात बहुतांश युवांनी नाटिका सादर केल्या.यांची वैशिष्ट्ये म्हणजे नाटिकेचा विषय,दिग्दर्शन,संवाद,पात्रे ठरवणे हे सारे ठरवण्यात शिबीरार्थ्यांचाच पुढाकार होता.ताई- दादा मार्गदर्शन करत होते,पण मुख्य अभिव्यक्ती होती ती मुलांचीच.’सृजन टीम’ मधील ताई व दादांचे कार्य हे सुलभकाचे.केवळ अनुभव व संधींची रचना करणारे!
  • आत्तापर्यंत उभे राहून बोलायला घाबरणारेही हिरीरीने पुढे आले. आपल्यापरीने सर्वोच्च देत,स्वतःला व्यक्त करू लागले.
    काहींनी आपले गायन कौशल्य दाखवले तर काहींनी कोडी घालून, समोरच्यांना डोके चालवायचे आव्हान दिले.
  • शिबिराचे पाच दिवस कसे संपले,हे शिबीरार्थ्यांना कळलेच नाही.म्हणून शिबीर संपता-संपता त्यांच्यातूनच मागणी उठली,शिबीर अजून काही दिवस वाढवा.मुलांची ही मागणी म्हणजे आयोजकांसाठी शाबासकीची थाप होती.
  • शिबीर संपूच नये,असे कितीही वाटले तरी ते संपणे हे ही अपरिहार्य होतेच. शेवटच्या दिवशी पालक घ्यायला आले तेव्हाही या सर्व कुमारांचा पाय निघत नव्हता.अनेकांचे डोळे पाणावले.काहींना ते अनावर झाले.
  • शिबीर हे तात्पुरते संपले आहे.इथे जे शिकलात ते कधी विसरू नका आणि तुमच्या इतर मित्र-मैत्रिणींनाही द्या, म्हणजे शिबिर मनात सतत सुरूच राहिल असा आश्वासक शब्द देत, ताई- दादा सर्वांना निरोप देत होते.
  • युवांच्या मनात सृजनतेचे पेरलेले हे बी असेच बहरत राहो या सदिच्छांसह ताई- दादांनी सगळ्यांना निरोप दिला. आणि एका अल्पविरामासाठी शिबीर संपले.
  • पुढच्या वर्षी पुन्हा असेच पक्षी अंगणात येतील.चिवचिवाट करतील, बहरतील आणि सृजनशिलतेचा हा दिवा अखंड तेवत राहिल या निश्चयाने पुढच्या शिबिराची आखणी ताई – दादांच्या मनात सुरूही झाली.
  • – वसुधा जोशी,पुणे.
error: Content is protected !!