March 26, 2026

बोधिसत्त्व डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या संकल्पनेतील धम्मप्रसार भन्ते उर्गेन संघरक्षितांनी जगभर प्रभावीपणे केला – धम्मचारी ज्ञानपालित

  • त्रिरत्न बौद्ध महासंघ जगभरातील ५२ देशांत नियोजनबद्ध पद्धतीने धम्मप्रशिक्षणाचे कार्य

  • उमरगा – विश्वरत्न बोधिसत्व महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाणानंतर भन्ते उर्गेन संघरक्षित यांनी बौद्ध धम्माच्या चळवळीसाठी अत्यंत मोलाचे व ऐतिहासिक कार्य केले आहे.
    डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या दृष्टीकोनातून जागतिक बौद्ध संघाची स्थापना करून त्यांनी धम्मप्रसारासाठी पोषक वातावरण निर्माण केले,असे प्रतिपादन धम्मचारी ज्ञानपालित यांनी केले.
    शहरातील बहुजन हिताय विद्यार्थी वसतिगृहात दि.२७ ऑगस्ट २०२५ वार बुधवार रोजी भन्ते संघरक्षित यांच्या जन्मशताब्दी महोत्सवाचे (२६ ऑगस्ट १९२५ – २६ ऑगस्ट २०२५) आयोजन करण्यात आले होते.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी त्रिरत्न बुद्धिस्ट सेंटर,धाराशिव चे चेअरमन धम्मचारी रत्नपालित होते. यावेळी धम्मचारी प्रज्ञाजित,धम्मचारी विबोध,धम्मचारी जिनघोष, धम्मचारी धम्मभूषण आदींची प्रमुख उपस्थिती होती.
    कार्यक्रमाच्या प्रारंभी तथागत भगवान बुद्ध,प्रज्ञासूर्य डॉ.बाबासाहेब आंबेडकर,भन्ते उर्गेन संघरक्षित व यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.धम्मचारी विबोध व धम्ममित्र जी.एल. कांबळे यांनी गीत सादर केले,तर पाली पूजनही घेण्यात आले.
    पुढे बोलताना धम्मचारी ज्ञानपालित म्हणाले की, “१९५० साली महाबोधी सोसायटीच्या पाक्षिकात प्रकाशित ‘भगवान बुद्ध आणि त्यांच्या धम्माचे भवितव्य’ या लेखात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी स्पष्टपणे नमूद केले होते की,नवे धम्मसेवक निर्माण झाले पाहिजेत,मिशनरी पद्धतीने धम्मकार्य झाले पाहिजे व जागतिक संघाची निर्मिती झाली पाहिजे.”
    या दृष्टीने उर्गेन संघरक्षितांनी धम्म प्रशिक्षण केंद्रे स्थापन करून नवदीक्षितांना धम्माचे शिक्षण दिले. सध्या त्रिरत्न बौद्ध महासंघ जगभरातील ५२ देशांत नियोजनबद्ध पद्धतीने धम्मप्रशिक्षणाचे कार्य करीत आहे.
    भन्ते संघरक्षितांनी बौद्ध शिकवणींचा सखोल अभ्यास करून तो सर्वसामान्यांसाठी सोप्या भाषेत मांडला. त्यांनी ‘सर्व्हे ऑफ बुद्धिझम’, ‘आर्य अष्टांगिक मार्ग’ ही पुस्तके तसेच अनेक कविता लिहिल्या. त्यांनी शरणागमनाला प्रथम स्थान दिले असून, “बुद्ध-धम्म-संघ” आत्मसात करून आचरणात आणणे महत्त्वाचे असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.
    कार्यक्रमाची सांगता ‘राहो सुखाने हा मानव इथे’ या मैत्रीगीताने झाली.

  • या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी केंद्रातील धम्ममित्र अजय गायकवाड,अभिजीत कांबळे, हरिदास कांबळे,प्राचार्य भोसले, तानाजी कांबळे,उत्तमराव गायकवाड,प्रीती मनोहर, तेजस्विनी गायकवाड,मंदा टिळे, प्रा.मनोज गायकवाड,वगरसेन कांबळे,संतोष दलाल आदींनी परिश्रम घेतले.

error: Content is protected !!