February 8, 2026

अणदूरच्या अस्थिबुद्धविहारासाठी खासदार ओमराजे निंबाळकर यांच्याकडून ५० लाखांचा निधी मंजूर

  • अणदूर – अणदूर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर अस्थिबुद्धविहाराला धाराशिव लोकसभा मतदारसंघाचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी ५० लाख रुपयांचा विकास निधी जाहीर केला असून,यामुळे या श्रद्धास्थळाच्या उर्वरित विकासास गती मिळणार आहे.
    बौद्ध समाजासाठी अत्यंत महत्त्वाचे समजले जाणारे हे अस्थिबुद्धविहार म्हणजे सामाजिक,ऐतिहासिक आणि धार्मिक दृष्टीने एक प्रेरणास्थान आहे.याठिकाणी आजवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे सुपुत्र भैय्यासाहेब आंबेडकर,नातू ॲड. बाळासाहेब आंबेडकर, रिपब्लिकन नेते ॲड.बी.सी. कांबळे, कु.शांताबाई दाणी,माजी राज्यपाल आर.डी. भंडारे यांच्यासह अनेक मान्यवरांनी भेट दिली आहे.
    ग्रामीण तीर्थक्षेत्र विकास योजनेअंतर्गत ‘क’ दर्जा प्राप्त असलेल्या या बुद्धविहाराच्या उर्वरित बांधकामासाठी भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक संस्था,अणदूरचे अध्यक्ष मधुकर कांबळे,उपाध्यक्ष हरीभाऊ बनसोडे,श्याम कांबळे, मनोहर बनसोडे,गोरख कांबळे आदी पदाधिकाऱ्यांनी खा. निंबाळकर यांची भेट घेऊन निधीची मागणी केली होती.
    बौद्ध समाजाच्या भावना आणि या ठिकाणाचे महत्त्व लक्षात घेऊन खा.ओमराजे निंबाळकर यांनी एप्रिल २०२५ मध्ये जिल्हाधिकारी, धाराशिव यांना अधिकृत पत्र देत ५० लाखांचा निधी मंजूर करण्याची शिफारस केली होती. त्यानंतर जिल्हा प्रशासन व जिल्हा परिषद,धाराशिव यांच्या संयुक्त पुढाकाराने अणदूर येथील बांधकाम स्थळाची पाहणी करण्यात आली.यावेळी सरपंच रामचंद्र (दादा) आलूरे, उपअभियंता टी.डी.पोळे,कनिष्ठ अभियंता एस.एस.काकडे आदी अधिकारी उपस्थित होते.
    या विकास प्रकल्पासाठी सोलापूर येथील आर्किटेक्ट राजरत्न फडतरे यांनी संकल्पचित्र तयार केले आहे. यासोबतच डॉ.दयानंद कांबळे, सेवानिवृत्त अंबादास कांबळे, हरिभाऊ बनसोडे,आप्पाराव कांबळे आदी मान्यवरांचे मार्गदर्शन लाभले आहे.
    यापूर्वी माजी मंत्री मधुकरराव चव्हाण यांनी १० लाखांचा निधी दिला होता,ज्यामुळे भक्तनिवासाचे बांधकाम पूर्ण झाले आहे.
    या निधीमुळे अस्थिबुद्धविहाराचे विकासकार्य वेगाने पूर्ण होण्यास मदत होणार असून अणदूर व तुळजापूर तालुक्यातील बौद्ध समाजात विशेष आनंदाचे वातावरण असून,त्यांनी खा. ओमराजे निंबाळकर यांचे मनःपूर्वक आभार मानले आहेत.
error: Content is protected !!