धाराशिव (जिमाका) – महाराष्ट्र राज्यात अवयवदानाची चळवळ बळकट करण्यासाठी दि.३ ते १५ ऑगस्ट २०२५ दरम्यान ‘अवयवदान पंधरवडा’ विविध जनजागृती उपक्रमांनी उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहिम राज्यभर राबविण्यात येणार असून,यामध्ये शाळा,महाविद्यालये,स्वयंसेवी संस्था, धार्मिक संस्था,आरोग्य संस्था व सामाजिक कार्यकर्त्यांचा सक्रिय सहभाग असणार आहे. राज्यस्तरीय नियोजन बैठकीत दिलेल्या सूचनांनुसार,रोट्टो,सोट्टो, झेडटीसीसी (मुंबई, पुणे,नागपूर, छत्रपती संभाजीनगर) यांच्या सहकार्याने ही व्यापक जनजागृती मोहीम हाती घेण्यात आली आहे.या उपक्रमाचा उद्देश समाजामध्ये अवयवदानाबाबत जागरूकता वाढवणे,भीती व अंधश्रद्धा दूर करणे आणि वैज्ञानिक माहिती पोहोचवणे हा आहे. पंधरवड्यादरम्यान विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे.त्यामध्ये सोशल मिडिया जनजागृती मोहीम,ऑनलाइन व्याख्याने, रुग्णालयांमध्ये QR कोड पोस्टर, आरोग्य मार्गदर्शन सत्र,मंदिरे व बाजारात माहितीपत्रक वाटप, शाळा-महाविद्यालयांमध्ये संकल्प भिंत उभारणी,स्पर्धा,पथनाट्य, जनजागृती स्टॉल्स,रॅली यांचा समावेश आहे.१५ ऑगस्ट रोजी जिल्हास्तरावर अवयवदात्यांच्या कुटुंबियांचा सार्वजनिक आरोग्य विभागातर्फे सत्कार करून या मोहिमेला प्रेरणादायी स्वरूप देण्यात येणार आहे. सार्वजनिक आरोग्य विभागाने या अभियानाला जनतेच्या सक्रिय सहभागाने यशस्वी करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.या संदर्भात माहिती देताना जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.सतीश हरिदास यांनी अवयवदानास प्रोत्साहन देण्यासाठी सर्व स्तरांवर सकारात्मक सहभागाची अपेक्षा व्यक्त केली आहे.
More Stories
फॉरेस्टच्या गवतावर तणनाशक फवारणी करून वृक्षलागवडीची नासधूस:वनपालावर कारवाईची मागणी
महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते चॅटबोटचे उद्घाटन
आंतरराष्ट्रीय व्हॉलीबॉल स्पर्धेसाठी जिल्हास्तरीय निवड चाचणी ११ ऑगस्टला