August 8, 2025

बाबा नगरच्या रस्त्यावर पाणीच पाणी:नागरिकांची कोंडी,आंदोलनाची चेतावणी

  • कळंब ( साक्षी पावनज्योत वृत्तसेवा ) – बाबा नगर येथील सिद्धिविनायक गणपती मंदिर व देवी मंदिराकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर गेल्या काही दिवसांपासून १ ते २ फूट पाणी साचल्याने परिसरातील नागरिकांचे हाल सुरू आहेत.या गंभीर समस्येमुळे दैनंदिन जीवन विस्कळीत झाले असून,नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
    पावसाळा सुरू झाल्यापासून या रस्त्यावर दररोज पाणी साचत असून,लहान मुले,ज्येष्ठ नागरिक, महिलांना ये-जा करताना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. पावसाचे पाणी रस्त्यावर साचून चिखलाचे साम्राज्य निर्माण झाले आहे.त्यामुळे मुलांना शाळेत, वृद्धांना दवाखान्यात नेणे,किराणा किंवा अत्यावश्यक वस्तू आणणे देखील कठीण बनले आहे.
    स्थानिक रहिवासी सांगतात की, वर्षानुवर्षे ही समस्या कायम आहे. प्रशासनाकडे वारंवार तक्रारी करूनही कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही.यावर्षी स्थिती अधिकच गंभीर असून,रस्त्याच्या मध्यभागी खोल डबके तयार झाले आहेत.
    या पार्श्वभूमीवर स्थानिक नागरिक हर्षद अंबुरे यांनी प्रशासनाला इशारा दिला आहे की, “जर तातडीने योग्य उपाययोजना न केल्यास आम्ही त्या रस्त्यावर साचलेल्या पाण्यात बोट सोडून आंदोलन करू आणि नगर परिषदेचा निषेध करू.”
    या समस्येकडे प्रशासनाने तातडीने लक्ष द्यावे,रस्त्यावरील जलनिकासी यंत्रणा सक्षम करावी आणि नागरिकांची ही मूलभूत समस्या कायमस्वरूपी मार्गी लावावी,अशी मागणी जोर धरू लागली आहे.
error: Content is protected !!