मुख्यमंत्री फडणवीस यांचे केंद्राकडे पाठपुराव्याचे आश्वासन
मुंबई (साक्षी पावनज्योत वृत्तसेवा ) – राज्यात ऑनलाईन गेमच्या व्यसनाने तरुण पिढीचे भवितव्य धोक्यात आले असून यावर तातडीने बंदी आणावी, अशी जोरदार मागणी आमदार कैलास पाटील यांनी विधानसभेत लक्ष्यवेधी सूचनेद्वारे मांडली.यास उत्तर देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी,ऑनलाईन गेमवर बंदी घालण्यासाठी राज्य सरकार केंद्र सरकारकडे पाठपुरावा करत असून,यासंदर्भात आवश्यक कायदा करण्याची जबाबदारी केंद्राची असल्याचे स्पष्ट केले. आमदार कैलास पाटील म्हणाले की, ऑनलाईन गेमच्या आहारी जाऊन अनेक तरुणांचे आयुष्य उध्वस्त होत आहे. धाराशिव तालुक्यातील बावी गावातील लक्ष्मण मारुती जाधव या युवकाने ऑनलाईन गेमच्या व्यसनातून शेती व घर गमावले.आर्थिक संकटात सापडून त्याने पत्नी व दोन वर्षांच्या मुलाची हत्या करून आत्महत्या केली.ही अतिशय वेदनादायक घटना असून अशा अनेक घटना राज्यभर घडत आहेत. आमदार पाटील यांनी सांगितले की,ऑनलाईन गेम हे व्यसन इतकं गंभीर झालं आहे की,यावर डान्सबारप्रमाणे कठोर बंदी घालणं गरजेचं आहे.जनजागृती पुरेशी राहिलेली नाही,त्यामुळे आता थेट बंदीचा निर्णय घ्यावा लागेल. तेलंगणा राज्याने यासंदर्भात ठोस निर्णय घेतलेला आहे,तशाच धर्तीवर महाराष्ट्रालाही पाऊल उचलावे लागेल,अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तरात सांगितले की,ऑनलाईन गेम ही एक गंभीर समस्या असून राज्य सरकार याबाबत केंद्र सरकारकडे पत्रव्यवहार करून पाठपुरावा करत आहे.राज्यांना यावर कायदा करण्याचा अधिकार नसल्यामुळे केंद्र पातळीवरच निर्णय अपेक्षित आहे.केंद्र सरकारही याबाबत कायदा करण्याच्या तयारीत आहे,असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.
More Stories
आंबडवे येथील भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारक पुनर्विकासाचा आराखडा तयार करा – राज्यमंत्री योगेश कदम
हीरक महोत्सवी राज्य चित्रपट पुरस्कार सोहळ्याचे मुंबईत आयोजन
अक्षय ढगे यांची शासकीय विधी महाविद्यालय,मुंबई येथे सहायक प्राध्यापकपदी नियुक्ती