धाराशिव – कळंब तालुक्यातील लोहटा (पूर्व) या नवगठित गावास अखेर महसुली ओळख मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या संदर्भात आमदार कैलास घाडगे पाटील यांनी अधिवेशनात प्रश्न उपस्थित केल्यानंतर महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक पार पडली. या बैठकीत कृषी प्रधान सचिव विकास रस्तोगी,जमाबंदी आयुक्त सुहास दिवसे,महसूलचे उपसचिव संजय बनकर यांच्यासह व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार, निवासी उपजिल्हाधिकारी शोभा जाधव आदी अधिकारी उपस्थित होते. लोहटा (पूर्व) हे गाव बोरगाव (के), लोहटा, हिंगणगाव, सावरगाव (काळे), पिंपळगाव (टो) आणि करंजकल्ला या गावांतील काही घरांच्या समावेशाने तयार झाले असून, शिवारांचे एकत्रीकरण न झाल्यामुळे अद्याप या गावास महसुली दर्जा मिळालेला नव्हता. या समस्येमुळे ग्रामस्थांना शासनाच्या विविध योजना व लाभांपासून वंचित राहावे लागत होते. या प्रश्नाची गांभीर्याने दखल घेत आमदार पाटील यांनी अधिवेशनात आवाज उठवला. परिणामी महसूल विभागाने तत्काळ हालचाल सुरू करत विशेष बैठक बोलावली. यामध्ये महसूल मंत्री बावनकुळे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना लोहटा (पूर्व) गावाचा प्रस्ताव 30 दिवसांच्या आत शासनाकडे सादर करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच व्हिलेज कोड व डिजिटल माहिती प्रणाली कोड (ॲग्रिस्टॅक) तयार करून शेतकऱ्यांना शासकीय योजनांचा लाभ देण्याच्या स्पष्ट सूचना दिल्या आहेत. याची जबाबदारी निवासी उपजिल्हाधिकारी यांच्यावर निश्चित करण्यात आली आहे. आमदार कैलास पाटील म्हणाले, “लोहटा (पूर्व) ग्रामस्थ व शेतकऱ्यांच्या अनेक वर्षांच्या मागणीला आणि माझ्या पाठपुराव्याला आता यश येत असून, महसुली दर्जा मिळण्यासाठीचा मार्ग पूर्णपणे खुला झाला आहे. या निर्णयामुळे गावातील नागरिकांना शासनाच्या योजना,पीकविमा,अनुदान व इतर कृषी सुविधा सुलभपणे मिळू शकतील.”
More Stories
संचालिका सौ.अंजली मोहेकर यांची विद्याभवन प्राथमिक विद्यामंदिरास सदिच्छा भेट
मोहेकर महाविद्यालयात ग्रंथालय शास्त्राच्या राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन
भीमराव दादा सत्यवचनी व्यक्तिमत्व होतं – डॉ. माणिक डिकले