लातूर (अविनाश घोडके ) – येथील वीजवितरण कंपनीचे कर्मचारी बिभिषण ढगे यांची मुलगी इंजि.पूनम व आनंत चौधरी यांचा मुलगा संगणक तंत्रज्ञ रितेश यांचा मंगल परिणय सोहळा दिनांक ६ जून २०२५ रोजी ज्ञानदेव मंगल कार्यालय,लातूर येथे मंगलमय वातावरणात पुज्य भन्ते धम्मसार यांच्या मार्गदर्शनाखाली हजारो धम्म बांधवांच्या साक्षीने मोठ्या थाटात संपन्न झाला. सामाजिक समतेचा संदेश देणाऱ्या धम्मपद्धतीच्या बुद्ध वंदना, त्रिसरण पंचशिलाच्या पठणात पार पडलेल्या या नेत्रदिपक मंगल परिणय सोहळ्याने सर्व उपस्थितांचे मने जिंकले.ढगे आणि चौधरी कुटुंबियांनी कोणताही आडंबर न करता संपूर्ण विवाह सोहळा धम्म अनुशासनाचे तंतोतंत पालन करून सामाजिक बांधिलकीचे अनोखे उदाहरण समाजापुढे ठेवले.
बौद्ध धम्म संस्कृतीतील हळदी विरहित, डीजेमुक्त,हाळकुंड-मंडवळे-कट्यार-लिंबू-घोडा मुक्त नियमाचे काटेकोरपणे पालन करत नियोजित वेळेत मंगल परिणय संपन्न होताच क्षणी प्रबुद्ध रंगभूमी बहुउद्देशीय संस्था,कळंबच्या वतीने आयु.कविता बिभीषण ढगे यांचा भन्ते धम्मसार यांच्या हस्ते संस्था अध्यक्ष सुभाष घोडके व लोहटा (पू) कळंब येथील माजी सरपंच आनंत अभंग यांनी शाल, पुष्पगुच्छ आणि सन्मानपत्र देऊन गौरव केला.
या मंगल परिणय सोहळ्याचे उत्कृष्ट आणि भारदस्त असे सूत्रसंचालन सहशिक्षक राजेंद्र क्षीरसागर यांनी केले तर विधीकर्ते नानासाहेब आवाड व दत्तात्रय भोसले यांनी आपल्या मधूर वाणीतून संपूर्ण विधीचे पठण केले.
मंगल परिणयाच्या आदल्या दिवशी पूज्य भंन्ते धम्मसार यांची धम्मदेशना व प्रा.बापूसाहेब गायकवाड यांचे धम्म प्रवचन घेऊन नियोजित वधू-वरास हळदी न लावता स्नेहभोजन कार्यक्रम संपन्न झाला होता. मंगल परिणय सोहळ्याच्या निमित्ताने कोणताही अपव्यय न करता साधेपणाने व सुसंस्कृत धम्म पद्धतीने पार पडलेल्या या सोहळ्यात धम्मबांधव,सामाजिक कार्यकर्ते,नातेवाईक व मित्रपरिवार हजारोंच्या संख्येने उपस्थित होते. समस्त जनांकडून नवविवाहित पूनम व रितेश यांना सुखी,समृद्धी व आनंदी वैवाहिक जीवनाच्या मंगलमय सदिच्छा देण्यात आल्या.
More Stories
त्याग,समर्पण आणि प्रेरणेचा जागर;माता रमाई जयंती उत्साहात साजरी
आई-वडिलांमुळेच आपल्या अस्तित्वाची ओळख –डॉ.सुनील गायकवाड
खरोसा लेणी येथे माघ पौर्णिमा उत्सव उत्साहात साजरा;६५ धम्म अनुयायांचा सहभाग