धाराशिव – भाजपाच्या धाराशिव जिल्हाध्यक्षपदी दत्ताभाऊ कुलकर्णी यांची दुसऱ्यांदा निवड झाल्यानंतर त्यांच्या सन्मानार्थ एक आगळावेगळा कौतुक सोहळा पार पडला.पत्रकार आणि मित्रपरिवाराच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या सत्कार सोहळ्याचे विशेष वैशिष्ट्य म्हणजे,राजकीय पक्षभेद बाजूला ठेवून विविध पक्षांचे नेते एका व्यासपीठावर एकत्र आले होते. हा महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासात पहिलाच असा कार्यक्रम ठरला,ज्यामध्ये भाजपच्या एका जिल्हाध्यक्षाच्या निवडीनंतर सर्वपक्षीय नेत्यांनी एकत्र येऊन त्यांचा सन्मान केला. या ऐतिहासिक कार्यक्रमात काँग्रेस,राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट),राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट),शिवसेना (उद्धव ठाकरे गट),शिवसेना (शिंदे गट),मनसे,शेतकरी कामगार पक्ष यांच्यासह अनेक विविध राजकीय पक्षांचे मान्यवर नेते आणि स्थानिक प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते.एकता आणि सौहार्दाचे हे दुर्मीळ चित्र राजकीय क्षेत्रात अपवादात्मक ठरले. कार्यक्रमात “मन मोकळ्या गप्पा” या संवाद सत्राच्या माध्यमातून दत्ताभाऊंनी धाराशिव जिल्ह्यातील उद्योजकतेच्या संधी, तरुण नेतृत्वाच्या गरजा आणि आत्मनिर्भरतेसाठी आवश्यक मानसिकता यावर आपले प्रेरणादायी विचार मांडले. व्यासपीठाकडे पाहत दत्ताभाऊ भावुक होत म्हणाले,माझ्या २८ वर्षांच्या राजकीय कारकिर्दीत असा प्रसंग मी प्रथमच अनुभवत आहे.इतक्या विविध पक्षांचे नेते एका व्यासपीठावर उपस्थित राहून मला गौरवतात,हे दृश्य मीच काय,कुणीही याआधी पाहिले नसेल.हा खरंच ऐतिहासिक क्षण आहे.पुढे ते म्हणाले,आपल्याला जिल्ह्यात उद्योजक घडवायचे आहेत.जसे श्वासावर प्रेम असते तसेच उद्योगावरही प्रेम हवे.शेती, सौरऊर्जा,गूळ पावडर यांसारख्या क्षेत्रांमध्ये धाराशिव जिल्हा मोठ्या संधी घेऊन पुढे जात आहे.प्रत्येकाच्या हाताला काम मिळाले पाहिजे.चेहरा,चरित्र आणि मेहनत या त्रिसूत्रीवर विश्वास ठेवला,तर कोणतीही यशाची शिखरं गाठता येतात. कार्यक्रमात विविध माध्यमांचे प्रतिनिधी,समाजातील सर्व स्तरांतील नागरिक व मित्रपरिवार मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.काँग्रेसचे प्रशांत पाटील यांनी आपल्या भावना व्यक्त करताना दत्ताभाऊंच्या उद्योजकतेविषयीच्या दृष्टिकोनाबरोबरच त्यांच्या मैत्रीपूर्ण स्वभावाचेही विशेष कौतुक केले.तसेच विविध सामाजिक कामात अश्याच पद्धतीने एकत्र येऊ असा विश्वास व्यक्त केला.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महेश पोतदार यांनी प्रभावीपणे पार पाडले,तर आभार प्रदर्शन चंद्रसेन देशमुख यांनी केले.संपूर्ण कार्यक्रम उत्साह,आत्मीयता आणि आपुलकीच्या वातावरणात पार पडला.
व्यासपीठावर उपस्थित सर्वपक्षीय नेते – यावेळी व्यासपीठावर काँग्रेस पक्षाचे अग्निवेश शिंदे, प्रशांत पाटील, शिवसेना ठाकरे पक्षाचे रवी वाघमारे, बंडू आदरकर, भाजपा युवा मोर्चाचे राजसिंहा राजेनिंबाळकर,अभय इंगळे, राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे अय्याज शेख,रणवीर इंगळे, राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे सचिन तावडे,शिवसेना शिंदे पक्षाचे सनी पवार,मनसेचे निलेश जाधव,शेकापाचे अमोल दीक्षित यांची उपस्थिती होती.
More Stories
धाराशिव शहरातील कचरा डेपो इतरत्र हलविण्याची शिवसेना (उ.बा.ठा) पक्षाची मागणी
पहिला आयुर्वेदिक हिमोफिलिया संशोधन प्रकल्प ‘रक्तामृत’चा धाराशिवमध्ये दिमाखदार शुभारंभ
फॉरेस्टच्या गवतावर तणनाशक फवारणी करून वृक्षलागवडीची नासधूस:वनपालावर कारवाईची मागणी