February 8, 2026

अहिल्यादेवी होळकरांच्या स्मरणार्थ राज्यातील एकल महिलांचे सर्वेक्षण व्हावे – बाजीराव ढाकणे

  • बीड – महाराष्ट्र राज्यात यावर्षी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची ३०० वी जयंती साजरी होते आहे. राज्य सरकारनेही त्यांना अभिवादन करण्यासाठी मंत्रिमंडळ बैठक त्यांच्या थेट जन्मस्थळी म्हणजे चौंडी येथे घेतली आहे.या बैठकीत अहिल्यादेवी यांच्या जन्मस्थळी विविध विकास योजना राबविण्याचा निर्णय घेतला आहे त्याबद्दल राज्य सरकारचे खुप खुप आभार पण एक खंत यानिमित्ताने सरकारने महाराष्ट्र राज्यातील एकल महिला पुनर्वसन हा कार्यक्रम हाती घ्यायला हवाच असे मत साऊ एकल महिला समितीचे बाजीराव ढाकणे यांनी व्यक्त केले आहे.
    अहिल्यादेवी या एकल महिला होत्या. एक एकल महिला किती मोठे कर्तृत्व गाजवू शकते याचे त्या वस्तुपाठ आहेत.एकल महिलांसाठी त्या प्रेरक आहेत. तेव्हा त्यांच्या स्मरणार्थ राज्यात एकल महिला पुनर्वसन धोरण व्हावे.
    महाराष्ट्रात आज विधवा, परित्यक्ता, घटस्फोटित महिलांची संख्या खूप मोठी आहे. या महिलांचे पुनर्वसन करण्यासाठी, सरकारने धोरण आखण्यासाठी त्यांची संख्या पुढे येणे आवश्यक आहे.
    त्यामुळे राज्यातील एकल महिलांचे सर्वेक्षण होणे आवश्यक आहे. अहिल्यादेवी यांचे स्मरणार्थ त्यानुसार धोरण तयार होऊ शकेल.
    एकल महिलांची संख्या किती असू शकते ?
    देशाच्या २००१ च्या जनगणनेत एकल महिला ५ कोटी तर २०११ साली ७ कोटी ३० लाख होत्या. महाराष्ट्रात आज ही संख्या प्रचंड असू शकते याचा एक पुरावा देत आहे असे साऊ एकल महिला समितीचे बाजीराव ढाकणे यांनी सांगितले
    अहिल्यादेवी यांचे जन्मस्थान ज्या अहिल्यानगर जिल्ह्यात आहे. त्या अहिल्यानगर जिल्हा परिषदेने दोन वर्षापूर्वी ग्रामपंचायत स्तरावर एकल महिलांचे सर्वेक्षण केले. तेव्हा फक्त ग्रामपंचायत स्तरावर या एकल महिलांची संख्या
    १ लाख ७ हजार निघाली. त्यात १५ तालुक्यातील नगरपंचायत,नगरपालिका, महापालिका ही संख्या मिळवली तर ती संख्या २ लाख असू शकते…ही एका जिल्ह्याची स्थिती आहे.
    जर एका जिल्ह्यात दोन लाख एकल महिला असतील तर राज्यात ३६ जिल्ह्यात एकल महिलांची संख्या ७० लाखापेक्षा जास्त असू शकते आणि पुणे,मुंबई,नागपूर,संभाजीनगर सारख्या मोठ्या शहरातील मोठी संख्या बघता एकूण संख्या ८० लाखापेक्षा जास्त असू शकते. त्यांच्यावर अवलंबून असणारी दोन मुले धरली तर राज्याच्या लोकसंख्येत ही खूप लक्षणीय असेल…
    कोरोनात महाराष्ट्रात झालेले सर्वात जास्त मृत्यू आणि दारूने गावोगावी मोठ्या संख्येने मरणारे तरुण बघता ही एकल महिलांची संख्या खूप वाढली आहे.
    त्यामुळे एकल महिलांच्यासाठी धोरण तयार करण्यासाठी शासनाने सुरुवात म्हणून राज्यात एकल महिलांचे सर्वेक्षण करून अहिल्यादेवी यांच्या स्मरणार्थ भरीव आर्थिक तरतूद करावी.
    हे सर्वेक्षण करण्यासाठी फार खर्च ही येणार नाही. ग्रामपंचायत क्षेत्रात त्या छोट्या गावात ग्रामसेवक,अंगणवाडी सेविका,आशा सेविका यांच्याकडे गावातील एकल महिला माहिती असतेच. ती फक्त वयोगटानुसार संकलन करायची आहे. शहरी भागात वॉर्ड ऑफिसर ,अंगणवाडी व स्वयंसेवी संस्था मदत करू शकतील व एकल महिलाना नोंदणीसाठी ऑनलाईन app ( अॅप ) बनवून त्या अॅपद्वारे हि नोंदणी करता येईल.
    त्यामुळे हा कमी खर्चात होणारा सर्व्हे आहे…
    आज आपल्या आजुबाजूला असलेल्या या लाखो भगिनी असूनही लक्षात येत नाहीत…
    अदृश्य असलेला हा प्रश्न संख्या पुढे आली की दृष्यमान होईल व सरकार व समाज यांच्यासाठी नक्कीच काही करू शकेल.
    त्यामुळे अहिल्यादेवी यांच्या ३०० व्या जयंती निमित्त एकल महिलांच्या प्रश्नावर सर्वेक्षणाची घोषणा सरकारने करून कृति कार्यक्रम जाहीर करावा अशी मागणी साऊ एकल महिला समिती करत आहे.तरी राज्य सरकारने तातडीने पुढील कृती आराखडा तयार करावा असे आवाहन बाजीराव ढाकणे यांनी केले आहे.
  • — बाजीराव ढाकणे
    बीड जिल्हा समन्वयक,
    साऊ एकल महिला समिती, महाराष्ट्र राज्य 9421989909
    ईमेल – tuljabhawani.ngo@gmail.com
error: Content is protected !!