धाराशिव (जिमाका) – अक्षयतृतीया हा शुभमुहूर्त असल्यामुळे या दिवशी मोठ्या प्रमाणात विवाह होत असतात. यामध्ये बालविवाहाचे प्रमाण असण्याची शक्यता नाकारता येत नाही.त्यामुळे अशा घटनांना वेळीच आळा बसावा यासाठी जिल्हा प्रशासन सतर्क आहे. जिल्हाधिकारी कीर्ती किरण पूजार,यांनी नागरिकांना आवाहन केले आहे की,बालविवाहाच्या संदर्भात कुठलीही माहिती किंवा संशयास्पद घटना आढळल्यास १०९८ या ‘चाईल्ड हेल्पलाईन’ टोल फ्री क्रमांकावर त्वरित संपर्क साधावा. माहिती देणाऱ्या व्यक्तीचे नाव गोपनीय ठेवले जाईल. बालविवाह रोखण्यासाठी ग्रामीण भागात ग्रामसेवक (बालविवाह प्रतिबंध अधिकारी) व अंगणवाडी सेविका (सहाय्यक बालविवाह प्रतिबंध अधिकारी),तसेच शहरी भागात महिला व बाल विकास विभागाच्या पर्यवेक्षिकांनी सजग राहून तातडीने उपाययोजना कराव्यात,असे निर्देश देण्यात आले आहेत. बालविवाह प्रतिबंध अधिनियम २००६ व महाराष्ट्र राज्य नियम २०२२ नुसार, बालविवाह आयोजित करणे हा अजामीनपात्र गुन्हा आहे.अशा प्रकारच्या गुन्ह्यासाठी एक वर्षाचा कारावास व एक लाख रुपयांपर्यंत दंड होऊ शकतो.
More Stories
फॉरेस्टच्या गवतावर तणनाशक फवारणी करून वृक्षलागवडीची नासधूस:वनपालावर कारवाईची मागणी
महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते चॅटबोटचे उद्घाटन
आंतरराष्ट्रीय व्हॉलीबॉल स्पर्धेसाठी जिल्हास्तरीय निवड चाचणी ११ ऑगस्टला