धाराशिव (जिमाका) – जिल्ह्यातील अनेक शेतकरी कुटूंबातील कर्ता पुरुष गेल्याने संसाराचा कणा मोडला आहे.त्यांचा आधार नसल्याने ती कुटूंबे विवंचनेत जगत आहेत,अशा कुटूंबाच्या मागे शासन खंबीरपणे उभे राहून त्यांना शासकीय योजनांचा लाभ देण्यासह स्वतःच्या कुटूंबाप्रमाणे सांभाळणार असल्याचे मत कै.वसंतराव नाईक शेतकरी स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष अॅड.निलेश हेलोंडे-पाटील यांनी व्यक्त केले.धाराशिव जिल्ह्याच्या दौर्यावर आले असता त्यांनी तुळजापूर तालुक्यातील आरळी बु.आणि धाराशिव तालुक्यातील शिंगोली येथील आत्महत्या शेतकरी कुटुंबास भेट दिली,त्यावेळी व्यक्त केले. या भेटीदरम्यान धाराशिव तहसीलदार डॉ.मृणाल जाधव,तुळजापूर तहसीलदार अरविंद बोळंगे,प्रभारी महिला व बालविकास अधिकारी किशोर गोरे,सहायक गटविकास अधिकारी संजय ढाकणे,तालुका कृषी अधिकारी व तलाठी आदी उपस्थित होते. हेलोंडे-पाटील म्हणाले की,शासन आत्महत्या शेतकरी कुटुंबाच्या दुःखात सहभागी आहे.आत्महत्याग्रस्त कुटूंबाची प्रत्येक गरज शासकीय योजनांच्या माध्यमातून भागविण्याचा प्रयत्न करण्यात येईल तसेच त्यांच्या मुलांच्या शिक्षणासाठीही मदत करण्यात येईल.अशा कुंटूंबातील अनाथ मुलांना क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले बालसंगोपन योजनेच्या माध्यमातून लाभ मिळवून द्यावा.तसेच शेतकरी कुंटूंबातील महिलेस ज्या व्यवसायाचे प्रशिक्षण हवे त्यांचे प्रशिक्षण देण्याची व्यवस्था करावी.शासनाची प्रत्येक योजना ही अशा कुटूंबापर्यत पोहचविण्याचा प्रयत्न करुन देण्यात यावा अशा सुचनाही त्यांनी यावेळी संबंधित अधिकाऱ्यांना केल्या. शासनाच्या विविध योजनेतून सुरु असलेली रुग्णालये याची माहिती प्रत्येक ग्रामपंचायतीच्या प्रवेशद्वारावर चिकटवण्यात यावीत,असेही त्यांनी सांगितले.आत्महत्याग्रस्त कुटूंबाच्या संवेदना सर्व शासकीय अधिकारी यांनी जाणून घेवून काम करण्याच्या सुचनाही त्यांनी दिल्या.यावेळी ॲड.हेलोंडे यांच्या आरळी बु.आणि शिंगोली गावात भेटदरम्यान ग्रामस्थ उपस्थित होते.
More Stories
फॉरेस्टच्या गवतावर तणनाशक फवारणी करून वृक्षलागवडीची नासधूस:वनपालावर कारवाईची मागणी
महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते चॅटबोटचे उद्घाटन
आंतरराष्ट्रीय व्हॉलीबॉल स्पर्धेसाठी जिल्हास्तरीय निवड चाचणी ११ ऑगस्टला