महाड सत्याग्रह हा २० मार्च १९२७ रोजी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी रायगड जिल्ह्यातील ‘महाड’ येथील चवदार तळ्यावर अस्पृश्यांना पाणी घेता यावे म्हणून केलेला सत्याग्रह होता.यांतून त्यांचे एक कुशल,प्रेरक आणि दूरदृष्टी असणारे नेतृत्व समाजापुढे आले. त्यांच्या या कल्पक नेतृत्वाची साक्ष देणारे एक आंदोलन म्हणजेच हा महाडचा सत्याग्रह होय.
** सत्याग्रहाची पार्श्वभूमी – हिंदू धर्मात असलेल्या जातिव्यवस्थेमुळे अस्पृश्यांना पाण्याच्या मुख्य स्रोतामधून पाणी घेण्यास परवानगी नव्हती. ऑगस्ट १९२३ मध्ये मुंबई कायदे मंडळाने एक निर्णय पारित केला. त्यानुसार सार्वजनिक खर्चाने बांधलेल्या आणि देखरेख होत असलेल्या किंवा सरकारने नेमलेल्या मंडळांकडून निर्माण केलेल्या सर्व सार्वजनिक पाण्याच्या जागा अस्पृश्यांसाठी खुले करण्याचा निर्णय घेण्यात आला. यात विहिरी,धर्मशाळा, सार्वजनिक शाळा,न्यायालये, कचेऱ्या व दवाखाने यांवर सर्वांना म्हणजेच अस्पृश्यांना परवानगी असावी असे म्हटले गेले. महाडच्या नगरपालिकेनेही जानेवारी १९२४ साली ह्या कायद्याची अंमलबजावणी करणारा निर्णय पारित केला परंतु त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी झालीच नाही. अखेर डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या सहकाऱ्यांशी विचारविनिमय करून दि.१९ व २० मार्च १९२७ रोजी महाड येथे सत्याग्रह करण्याचा निर्णय घेतला.
*** अधिवेशन व पाणी प्राशन –
‘कुलाबा जिल्हा बहिष्कृत परिषद,अधिवेशन पहिले’ या नावाखाली हा सत्याग्रह करण्यात आला.डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्वतःया अधिवेशनाचे अध्यक्ष होते. अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे २० मार्च रोजी महाड येथील चवदार तळ्याचे पाणी पिऊन आपला माणुसकीचा आणि समतेचा हक्क सिद्ध करायचा या निर्धाराने सर्वजण तळ्याकडे गेले.
सत्याग्रहात विश्वरत्न डॉ.बाबासाहेबांना या लोकांनी दिली खंबीर साथ –
महाडचा सत्याग्रह यशस्वी होण्यासाठी अनंतराव विनायक चित्रे,सुरेंद्र गोविंद टिपणीस (सुरबा नाना),गंगाधर नीलकंठ सहस्त्रबुद्धे,कमलाकांत चित्रे यांचे चांगले सहकार्य लाभले.
याशिवाय काही तरुण देखील यांत मनापासून सहभागी झाले. तसेच या अधिवेशनाचे स्वागताध्यक्ष संभाजी तुकाराम गायकवाड,सुभेदार विश्राम गंगाराम सवादकर,रामचंद्र बाबाजी मोरे,शिवराम गोपाळ जाधव,केशवराव आणि गोविंद आद्रेकर या कार्यकर्त्यांचा देखील मोठा वाटा होता.
सत्याग्रहा दरम्यान स्त्रिया आणि पुरुषांसाठी डॉ.बाबासाहेबांचा संदेश ह्या सत्याग्रहासाठी स्त्रियांचा सहभाग लक्षणीय असल्याने, आंबेडकरांनी स्त्रियांना खास आवाहन केले. आपली जात दाखवणारी कोणतीच लक्षणे आपल्या शरीरावर न बाळगण्याविषयी उपस्थित स्त्री-पुरुषांना आवाहन केले. त्यातच पुरुषांनाही हातात कायम काठी ठेवणे सारखी चिन्हे बाळगण्याची आता गरज नाही असे सांगितले. (हातात काठी घेतलेला पुरुष महार असण्याचे चित्र होत) तत्कालिन स्त्रिया गुडघ्या पर्यंतच तोकडे लुगडे नेसत असत.डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी स्त्रियांना इतर उच्च जातीय स्त्रियांसारखे पूर्ण टाच घोळ लुगडे नेसण्याचे सुचवले. त्याची अंमलबजावणी लगेच पुढच्या काही दिवसांतच घडून आली.
पाणी प्राशन केल्यानंतर सनातन्यांचे अत्याचार व अस्पृश्यांचा संयम –
महाड गावात एक अफवा उठली की,तळ्यातील पाणी बाटवल्यानंतर आता जमलेला जमाव वीरेश्वराच्या मंदिरात जाऊन मंदिरही बाटवणार आहे. धर्म धोक्यात आल्याचे सनातन्यांनी सांगत गावभर फिरत हत्यारे,लाठ्या-काठ्या घेऊन सभेच्या ठिकाणी तो घोळका आला. आणि त्यांनी सभेनंतर गावाकडे जाण्यापूर्वी जेवण करत असणाऱ्या अस्पृश्यांना मारहाण केली. हा घोळका नंतर महाड शहरभर फिरून सर्व अस्पृश्यांना धमकावत होता. शिवाय आसपासच्या सर्व गावांमध्ये ह्या सभेला आलेल्या सर्व अस्पृश्यांना धडा शिकवण्याबद्दल संदेश पोहोचवला गेला. त्यामुळे अनेक अस्पृश्यांना स्वतःच्या गावी पोहोचल्यानंतरही हिंसेला सामोरे जावे लागले.मात्र विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी अस्पृश्य सत्याग्रहींना सनातनी हिंदूंविरूद्ध “हिंसा करू नका” असा आदेश दिला होता. त्यामुळे एवढी हिंसा होऊनही आणि प्रत्यक्षात स्थानिक लोकांपेक्षा जास्त संख्येने असूनही काठीधारी अस्पृश्यांनी संयम ठेवला.
*चवदार तळ्याच्या सत्याग्रहानंतर न्यायालयीन लढाई* जरी महाड सत्याग्रह झाला तरी त्याला असलेला सनातन्यांचा विरोध पाहता तळ्यापासून शोषित जनता अजून दूरच होती. सनातनींनी तळे शुद्ध केले होते. चवदार तळ्यावर जाऊ नये म्हणून न्यायालयाचा तात्पुरता आदेश देण्यात आला होता. हा महाड सत्याग्रह समतेच्या लढ्याचा मैलाचा दगड ठरला. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली या सत्याग्रहातून सामाजिक समतेचा आणि मानवतेचा संदेश संपूर्ण देशभर पसरला.
More Stories
जिल्हा परिषद महिला परिचरांच्या न्यायासाठी ठिय्या आंदोलन यशस्वी!
एकशे सात सुरक्षा रक्षक झाले बेरोजगार;लातूरच्या शासकीय रुग्णालयाचा बेभरवशाचा कारभार!
जीवनाच्या परीक्षेत यशस्वी होऊन कुटुंबाचा आधार बना – आमदार विक्रम काळे