August 8, 2025

१९ फेब्रुवारी रोजी “जय शिवाजी जय भारत” भव्य पदयात्रा

  • धाराशिव – (जिमाका) श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३९५ व्या जयंतीनिमित्त १९ फेब्रुवारी रोजी भव्य “जय शिवाजी जय भारत” पदयात्रेचे आयोजन करण्यात आले आहे.ही पदयात्रा १९ फेब्रुवारी २०२५ रोजी सकाळी ९.३० वाजता श्री तुळजाभवानी जिल्हा क्रीडा संकुल येथून सुरू होणार आहे.
    या पदयात्रेच्या नियोजनासाठी १३ फेब्रुवारी रोजी जिल्हाधिकारी डॉ.सचिन ओंबासे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न झाली.जिल्ह्यातील विविध शासकीय व शैक्षणिक विभागांनी समन्वय साधून नियोजन करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओंबासे यांनी यावेळी दिल्या.बैठकीला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.मैनाक घोष,उपविभागीय पोलीस अधिकारी एम.आर.राठोड,नेहरू युवा समन्वयक धनंजय काळे,जिल्हा क्रीडा अधिकारी श्रीकांत हरनाळे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
    पदयात्रेचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आभासी पद्धतीने करणार असून ते संबोधित करतील.या पदयात्रेत जिल्ह्यातील विविध शाळा-महाविद्यालयांतील सुमारे २५०० विद्यार्थी सहभागी होणार आहेत. यावेळी पालकमंत्री प्रतापराव सरनाईक, खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर, आमदार सर्वश्री विक्रम काळे, राणाजगजितसिंह पाटील, प्रा.डॉ.तानाजीराव सावंत,कैलास पाटील, प्रविण स्वामी,जिल्हाधिकारी डॉ.सचिन ओंबासे,जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मैनाक घोष,पोलीस अधीक्षक संजय जाधव उपस्थित राहणार आहेत.
    विशेष म्हणजे,दिल्ली येथे झालेल्या पहिल्या विश्वचषक खो-खो स्पर्धेत सुवर्णपदक जिंकलेली युथ आयकॉन अश्विनी जिंदे आणि तिचे प्रशिक्षक डॉ.चंद्रजित जाधव यांचा या प्रसंगी सत्कार करण्यात येणार आहे.
    ही पदयात्रा श्री तुळजाभवानी जिल्हा क्रीडा संकुल येथून सुरू होऊन महात्मा ज्योतिबा फुले चौक,सुनिल प्लाझामार्गे,नगरपरिषद रोड,जिल्हा परिषद,शासकीय विश्रामगृह, पोलीस अधीक्षक कार्यालय,कोहिनूर हॉटेल, जुने दूरदर्शन केंद्र,समता नगर,श्री चित्रमंदिर गोरे कॉम्प्लेक्स,डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक मार्गे छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे समाप्त होणार आहे.श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून पदयात्रेचा समारोप होईल.
    या पदयात्रेत विद्यार्थी,शहरातील शैक्षणिक संस्था,एनसीसी,नेहरू युवा केंद्र,राष्ट्रीय सेवा योजना,भारत स्काऊट गाईड, शासकीय तंत्रनिकेतन,औद्योगिक प्रशिक्षण संस्था, खो-खो संघटनेचे खेळाडू सहभागी होणार आहेत.या पदयात्रेत नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे,असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी श्रीकांत हरनाळे यांनी केले आहे.
error: Content is protected !!