August 8, 2025

सुमनआई सासू नसून आई होत्या..!

  • सासू आणि सून यांचे नाते नेहमीच एक वेगळ्या नजरेने पाहिले जाते,परंतु सुमनआई मोहेकर यांनी या नात्याला आई-मुलीच्या नात्याचा सुंदर स्पर्श दिला.शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर गुरुजींच्या जीवनातील सहचारिणी असलेल्या सुमनआईंनी केवळ पतीच्या कार्याला साथ दिली नाही,तर कौटुंबिक नात्यांमध्येही त्यांनी मायेचा आणि आधाराचा अद्वितीय आदर्श निर्माण केला.
    सुनेला आईसारखी माया देण्याचा सुमनआईंचा स्वभाव त्यांच्या जीवनातील एका मोठ्या गुणाचे दर्शन घडवतो.त्यांनी केवळ मला सून म्हणून कधीच पाहिले नाही,तर मी त्यांची मुलगीच आहे,या दृष्टिकोनातून माझ्याशी वागल्या.केवळ सासू नव्हे, तर एक मार्गदर्शक,स्नेही, आणि खऱ्या अर्थाने आई होत्या.
    सासूच्या भूमिकेतून त्यांनी मला कधीही जाणीव होऊ दिली नाही की मी वेगळी आहे.कुटुंबातील परंपरा,मूल्ये आणि सुसंस्कृततेचे धडे देतानाच सुमनआईंनी मला स्वतःच्या निर्णयांमध्ये स्वतंत्रता दिली.त्यांनी माझ्या भावनांना नेहमीच आदर दिला आणि कर्तृत्वाला प्रोत्साहन दिले.
    माझ्यासाठी सुमनआई म्हणजे कुटुंबातील भावनिक आधार होत्या.सासूबाईंनी मला कधीही आईची उणीव जाणवू दिली नाही.माझ्या प्रत्येक सुख-दुःखात त्या नेहमीच पाठीशी उभ्या राहिल्या.कौटुंबिक जबाबदाऱ्या सांभाळताना मला नेहमी प्रोत्साहन दिले आणि माझ्या प्रयत्नांची स्तुती केली.
    आईच्या या वागणुकीतून सासू-सुनेच्या नात्यातील समंजसपणाचा आणि प्रेमाचा एक नवीन आदर्श निर्माण झाला. त्यांनी मला आईची माया दिली, तर मी सुद्धा त्यांना सासूऐवजी आईच मानले.त्यांच्या या नात्यातील मोकळेपणा आणि विश्वासाचे बीज केवळ प्रेम, आपुलकी,आणि एकमेकांच्या भावनांचा आदर करण्यामुळे अंकुरले.
    सुमनआई मोहेकर यांचे जीवन केवळ शिक्षणप्रसारासाठीच प्रेरणादायी नाही,तर कुटुंब व्यवस्थेत त्यांनी उभा केलेला प्रेम,माया आणि आदराचा आदर्शदेखील आजच्या पिढीसाठी मार्गदर्शक ठरतो. सासू-सुनेच्या नात्यात ममत्व आणि आपुलकीचे बंध उभे करण्याचा सुमनआईंचा प्रयत्न खऱ्या अर्थाने अनुकरणीय आहे.
    माझे लग्न १० जानेवारी १९८३ ला झाले.मी प्रथम मोहेकर कुटुंबात प्रवेश केला आणि मला प्रथम गृहप्रवेशाच्या वेळी फार मोठा आश्चर्याचा धक्का बसला. दोन खोल्यांचे पत्र्याचे घर त्यात आमचा गृहप्रवेश याचा अर्थ माझ्या सासूबाईंने व मामांनी किती कष्ट केले असतील ते स्वतःसाठी एक घर बांधू शकले नाहीत.म्हणजे या सगळ्या शाळा उभ्या करण्यात सासूबाईचे आयुष्य गेले.त्यांना सुख,समृद्धी, ऐश्वर्य संपन्न जीवन जगता आले नाही.अत्यंत खडतर आयुष्य त्यांनी काढले.
    मी शेतकरी कुटुंबातील.. हुंडा नाही,मानपान नाही तरीही फक्त शिक्षण आणि मला शिक्षणाची असलेली आवड लक्षात घेऊन माझे लग्न ठरवले.
    हा सुद्धा त्यांचा आदर्श समाजाने घेण्यासारखा आहे.डामडोल, हौसमौज ही त्यांच्यात नव्हतीच फक्त शाळेच्या कार्यात आण्णांना मदत करणे एवढेच ध्येय.
    खऱ्या अर्थाने त्या अण्णांच्या पाठीशी खंबीर उभ्या होत्या.त्यामुळे आज एवढे मोठे कार्य होऊ शकले.
    आम्हाला संस्कार देताना त्यांची भूमिका खूप शिस्तप्रिय व कडक होती.त्यांच्या शिस्तीचे धडे घेत असतानाचा एक अनुभव. माझ्याकडून एकदा घरातले पीठ संपले होते.मी दळन करायचे विसरले पण मला कडक शब्दात त्यांनी सुनावले तुला काय काय करायचे ते कर मी विचारात पडले.शेवटी खिचडी बनवून संध्याकाळचे जेवण बनवले आणि तेंव्हापासून स्वयंपाकघरात लागणारी वस्तू अगोदरच आणून ठेवण्याची सवय लागली.
    मी लग्नानंतर एम.ए,लाँ,बीएड,नौकरी केली. संस्थेचे कार्यक्रम केले.प्रत्येक वेळी त्यांची भूमिका प्रोत्साहन देण्याची होती.आणि महत्त्वाचा त्यांचा गुण घेण्यासारखा म्हणजे त्यांनी संपूर्ण जबाबदारी आमच्या दोघांवर टाकली.कुटुंब सांभाळून घेणे,सर्वांचे अगत्य करणे हे त्यांना खूप आवडायचे. कुठल्याही कौटुंबिक बाबीमध्ये त्या ढवळाढवळ करत नसत. आम्ही त्यांच्या तीन सुना.मी मोठी,दोन नंबर निर्मला रमेश मोहेकर आणि तीन नंबर अलका अनिल मोहेकर.आम्हा तिघीनांही त्यांनी स्वातंत्र्य दिले.आम्ही तीघि मिळून कुटुंब व संस्था सांभाळण्यात मदत करतो.आमच्या संपूर्ण कुटुंबात शाळेबद्दल ओढ, आपुलकी,प्रगती दडलेले आहे. संपूर्ण कुटुंब शिक्षणासाठी, प्रगतीसाठी धडपडत असते. कारण त्याचे बीजारोपण आईसाहेबांनीच केलेले आहे. थोडक्यात त्यांच्यामुळेच आम्ही तिघीही घडलो.
    समाजाची प्रगती करणे हा त्यांचा ध्यास असल्यामुळे त्यांनी स्वतःच्या नावे असलेली जमीन साखर कारखान्यासाठी देऊन टाकली.आज मोहा येथे शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर ॲग्रो इंडस्ट्रीज उभी आहे.त्यातही अनेक लोकांना रोजगार मिळाला.संसार उभे राहिले.थोडक्यात आजच्या समाजाची धारणा अशी आहे की,मी जे मिळविल,कमवेल ते माझ्या मुलाबाळासाठी असे दायित्व पाहायला मिळत नाही. अशा माझ्या सासूबाईंना जाऊन एक वर्ष पूर्ण होत आहे.त्यांच्या आत्म्यास चिरशांती मिळो ही परमेश्वरचरणी प्रार्थना करते.

  • — सौ.अंजली अशोक मोहेकर
error: Content is protected !!